Kalyan Crime : कल्याणमध्ये डान्स शिक्षकाकडून पाच वर्षाच्या विद्यार्थ्याचा लैंगिक छळ; वाढत्या गुन्ह्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर
Kalyan Crime : कल्याण कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दहा दिवसात सहा मोठ्या गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी चार घटना एकापाठोपाठ घडल्याने कल्याण डोंबिवली शहर हादरले आहे.
ठाणे: कल्याण पूर्वमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये दोन खुनाच्या घटनांबरोबरच दोन जीवघेण्या हल्ल्याच्या आणि बलात्काराच्या प्रयत्नाच्या घडना घडल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा एका घटनेमुळे कल्याण शहर हादरले आहे. कल्याण पूर्वेत एका डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने पाच वर्षीय मुलाचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने कल्याण पूर्वेत चाललंय तरी काय असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
कल्याण पूर्व मध्ये एका नामांकित इंग्रजी शाळेमध्ये पाच वर्षीय विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्याचा त्याच्या शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचं उघड झालं आहे. यामुळे तो विद्यार्थी भयभीत झाला असून त्याची माहिती त्याने आई आणि वडिलांना दिली. विद्यार्थ्याने सांगितलेल्या प्रकारानंतर त्याच्या आई आणि वडिलांनाही मोठा धक्का बसला. आई-वडिलांनी शाळा प्रशासनाला या बाबतीत माहिती देऊन सदर घटनेची चौकशी करून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर शाळा प्रशासनाने माहिती घेतल्यानंतर पीडित विद्यार्थासोबत शाळेच्या शौचालयात लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे शाळा प्रशासनाच्या लक्षात आले. धक्कादायक बाब म्हणजे घृणास्पद कृत्य दुसरे कोणी नाही तर शाळेच्या डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने केले.
या प्रकरणी नराधम शिक्षकावर कोळसेवाडी पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक करुन पुढील तपास सुरु केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली.
कल्याण पूर्वेत चाललंय तरी काय?
- कल्याण पूर्व भागात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. एका अल्पवीयन मुलीवर भर रस्त्यात बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला.
- कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात कोयत्याने एका तरुणावर हल्ला.
- कल्याण पूर्व येथील कैलासनगरमध्ये तलवारीने तरुणावर हल्ला.
- कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात एका 12 वर्षीय मुलीची एकतर्फी प्रेमातून हत्या.
- कल्याण पूर्वेतील खडेगोलवली परिसरामध्ये एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या.
- कल्याण पूर्वेत एका पाच वर्षीय शाळकरी विद्यार्थ्यावर संगीत शिकवणाऱ्या शिक्षकांने लैंगिक अत्याचार केल्याची घटना.
गेल्या दहा दिवसांमध्ये अशा वेगवेगळ्या सहा घटना घडल्याने कल्याण शहर हादरून गेले आहे. या घटनांमुळे नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली. तर दुसरीकडे कल्याण पूर्वमध्ये सुरू असलेले अवैध धंदे थांबवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये काही नागरिकांनी पोलिसांसमोरच भाषण करून कल्याण पूर्वेत अफू, गांजा, चरस यासारख्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी कोळशेवाडी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. यावेळी नागरिकांनी पोलिसांसमोरच अवैध धंद्याचा पाढाच वाचला. त्यामुळे कल्याण पूर्वे घडत असलेल्या घटना पोलिसांच्या मदतीनेच घडत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.
ही बातमी वाचा: