Kalyan News : अल्पवयीन प्रेयसीचं रेल्वेतून अपहरण करणाऱ्या प्रियकराला अटक, कल्याणमधील धक्कादायक घटना
कल्याण : रेल्वेतून अल्पवयीन प्रेयसीचं अपहरण करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.
कल्याण : रेल्वेतून अल्पवयीन प्रेयसीचं अपहरण (Kidnap) करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. कल्याण (Kalyan) लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. कुणाल रविंद्र रातांबे (वय 23 वर्षे) असं अटक केलेल्या प्रियकराचं नाव आहे. तर संबंधित मुलीला पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिलं आहे.
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं
संबंधित मुलीची आणि आरोपी तरुणाची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली, मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं. त्यातच ही तरुणी आपल्या कुटुंबासह रेल्वेने प्रवास करत असतानाच आरोपी प्रियकराने तिचं अपहरण केलं. त्यानंतर कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे तरुणाचा शोध घेतला आणि त्याला 48 तासातच बेड्या ठोकल्या.
रेल्वे प्रवासादरम्यान मुलगी बेपत्ता झाली
17 वर्षीय मुलगी मुंबईतील धारावी परिसरात कुटुंबासह तर आरोपी कुणाल हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एका गावात राहतो. त्यातच काही महिन्यापूर्वी इन्स्टाग्रामवर दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघात मैत्री होऊन त्याचं रुपांतर प्रेमात झालं. त्यातच 19 ऑगस्ट रोजी मुलगी कुटुंबासह सोलापूरहून कल्याणला जाणाऱ्या गदक एक्सप्रेसने आरक्षित बोगीतून प्रवास करत होती. याच दरम्यान पीडित प्रेयसीशी रेल्वे प्रवासात बेपत्ता झाल्याची तिच्या पालकांना माहिती मिळाली. त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली.
सापळा रचून तरुणाच्या घरातून मुलीला ताब्यात घेतलं
त्यानंतर लोहमार्ग पथकासह रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांनी गुन्हे शाखेचे पथक घेऊन कर्जत आणि कल्याण रेल्वे स्थानकातील घटनेच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी एका फुटेजमध्ये मुलगी एकटीच कल्याण रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसमधून खाली उतरुन जाताना दिसली. त्यावेळी तिच्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास केला. यात मुलगी ही कर्जत तालुक्यातील प्रियकर कुणालच्या घरी असल्याची माहिती मिळाली. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून कुणालचं घर गाठलं. त्यानंतर त्याच्या घरातून पीडित मुलीसह ताब्यात घेऊन कल्याणमध्ये आणलं.
मुलीला कुटुंबाकडे सुपूर्द केलं, तरुणाविरोधात गुन्हा
गुन्हे शाखेचे पथकाने कुणालकडे अधिक चौकशी केली असता, त्याने इन्स्टाग्रामवर आमची ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाल्याने तिचं अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दोघांना दिलं. पोलिसांनी तिला कुटुंबाकडे सुपूर्द केलं तर तरुणाविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा