(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोट्यवधीचा गंडा घालणारं नवं जामतारा! सख्या भावांचा प्लॅन, 800 पेक्षा जास्त जणांचा सहभाग, 1000 गुन्हे
गावातील सख्ख्या भावंडांनी सुरू केलेल्या या टोळीत गावातील 800 हून अधिक रहिवासी ओएलएक्स फसवणुकीत गुंतल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांना मिळाली आहे.
Jamtara Crime latest News Update: झारखंडमधील जामतारा या गावातील गुन्हेगारीवर ओटीपी प्लॅटफॉर्मवर आलेली वेब सिरिज अल्पावधीत प्रसिद्ध झाली. यामध्ये सर्वसामान्यांना कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या टोळीवर सिरीज आली होती. यामध्ये देशभरात अनेकांची फसवणूक करणारी ही टोळी प्रकाशझोतात आली होती. जामतारातील या टोळीनंतर आता राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यामधील गावात कोट्यावधीचा गंडा घालणार नवीन टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. आरोपींवर भारतातील विविध राज्यांमध्ये 1000 गुन्हे दाखल आहेत. ही टोळी कशी चालते आणि त्यांनी अशी फसवणूक करून गावात बंगले कसे बांधले, यावर एबीपी माझाचे प्रतिनिधी फैसल तांडेल यांनी स्पेशल रिपोर्ट तयार केला आहे.
राजस्थानातील भरतपूरजवळील खोह चौराहा गाव हे देशातील सर्वच तपास यंत्रणांची डोकेदुखी ठरलेय. झारखंडमधील जामताराप्रमाणेच हे दुसरे जामातारा ठरण्याआधीच मुंबई सायबर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गावातील सख्ख्या भावंडांनी सुरू केलेल्या या टोळीत गावातील 800 हून अधिक रहिवासी ओएलएक्स फसवणुकीत गुंतल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांना मिळाली आहे.
कशाप्रकारे केलीय फसवणूक ?
या छोट्याशा गावातील नागरिकांचे ओएलएक्स फसवणूक हे उत्पन्नाची वाट बनल्याचे कारवाईतून दिसून आले. ओएलएक्सवरून बरोबरच सेक्सटॉर्शन गुन्ह्यातही त्यांचा सहभाग दिसून आला आहे. या गावातील फरार असलेल्या उमेर, जुनी आणि अब्बास या भावंडँनी ओएलएक्सवरून फसवणूक करण्यास सुरुवात केली. पुढे, या टोळीच्या म्होरक्यांपैकी एक असलेल्या सवसुख उर्फ सर्वसुख खुटटा रूजदार उर्फ समशू ( ३७)च्या संपर्कात आला. समशूविरोधात राजस्थानमध्ये हत्येचा प्रयत्न यासारख्या 17 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यानेच, दहावी, बारावी बेरोजगार तरुणांना हाताशी घेत फसवणुकीचे जाळे विणले आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या विरोधातील तक्रारीचा सूर 269 पर्यंत पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी महाराष्ट्रासह 19 राज्यांतील नागरिकांना टार्गेट केले आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण यामध्ये अडकला आहे. रात्री आठ ते नऊ नंतर ही मंडळी आलेल्या माहितीच्या आधारे फसवणुकीसाठी सज्ज होतात. रात्रभर सर्व कामकाज झाल्यानंतर पहाटे गावापासून लांब जात आलेल्या रकमेचे ठरल्याप्रमाणे वाटप करायचे. हा त्यांचा दिनक्रम होता. प्रत्येकवेळी नवीन सिमकार्ड, नवीन मोबाइल आणि नवीन ठिकाणांचा आधार घेत असल्याचे तपासात समोर आले.
राजस्थानमधील या भरतपूर टोळीत अल्पवयीन मुलांचाही समावेश या टोळीतील 12 वर्षांच्या मुलाने आतापर्यंत दोन कोटींची फसवणूक केल्याची माहितीही समोर येत आहे. त्यांच्या टोळीतील तो हुकमी एक्का असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत सायबर पोलिस अधिक तपास करत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलेदेखील यामध्ये गुंतत असल्याची चिंताजनक बाब यातून दिसून आली. तसेच महत्त्वाचे म्हणजे या मिळालेल्या फसवणुकीतील पैशातून यांनी आपल्या गावाकडे मोठे मोठे बंगले बांधले आणि रिअल इस्टेट मध्ये देखील पैसे गुंतवले आहेत. कोट्यावधीचा गंडा घालणारी झारखंडमधील जामतारा टोळीनंतर भरतपूरमधील ही टोळी सध्या सर्वत्र हैदोस घालत होती. त्यामध्ये महाराष्ट्र सायबर विभागांनी या टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत.