आमदार संतोष बांगरांच्या कार्यकर्त्यांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण, पंढरपुरातील विश्रामगृहावरील प्रकार
Solapur News Update : आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून पंढरपूरमधील विश्राम गृहावरील सुरक्षा रक्षकाला मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Solapur News Update : पंढरपूरमधील (Pandharpur) विश्रामगृहातील सुरक्षा रक्षकाला आमदार संतोष बांगर (Hingoli Mla Santosh Bangar) यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आलीय. सौरभ कदम असे मारहाण झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. आमदार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्यानंतर कदम यांना शिवीगाळ देखील केली आहे.
शनिवारी रात्री हिंगोलीतील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे काही कार्यकर्ते पंढरपुरातील विश्रामगृहावर आले होते. यावेळी त्यांनी रूमबाबत चौकीदार सौरभ कदम यांना विचारणा केली. यावेळी त्यांनी आधी बुकिंग करावे लागते,आता वरिष्ठांसोबत संपर्क साधा असे सांगितले. या कारणावरून आमदार बांगर यांच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षक सौरभ कदम या तरुणाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला मारहाण देखील करण्यात आली आहे. मारहाण केल्यानंतर संबंधित कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावरून पळ काढला. सुरक्षा रक्षक कदम यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की नाही, याबाबतची माहिती मिळू शकली नाही. परंतु, त्यांनी याबाबत आपल्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.
या मारहाणीच्या प्रकरामुळे पंढरपूरच्या शासकीय विश्राम गृहावर सीसीटीव्ही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान बांगर यांच्या या तथाकथित कार्यकर्त्यांवर आता पोलिसात गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, आमदार बांगर यांच्याकडून देखील गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळा शिवीगाळ केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात बांगर यांनी पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना ताजीच असताना आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केली आहे. 27 ऑक्टोबर रोजी आमदार संतोष बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह गार्डन गेटवरून मंत्रालयात जात असताना त्यांच्यासोबत 15 कार्यकर्ते देखील होते. मात्र यावेळी गेटवर ड्युटीला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने पासबाबत विचारपूस केल्याने आमदार बांगर यांनी त्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली होती. या कर्मचाऱ्याने घडलेल्या घटनेची नोंद पोलिस डायरीत केली होती. त्यानंतर याबाबत 'एबीपी माझा'ने बातमी दाखवली होती. त्यामुळे अखेर या घटनेचा अहवाल अप्पर मुख्य सचिव गृह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या