Indias Biggest Car Thief : भारतातला सर्वात मोठा कार चोर, 24 वर्षात 5000 कार केल्या लंपास
Indias Biggest Car Thief : कार, गाड्या चोरणाऱ्या अनेक आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण आता दिल्ली पोलिसांनी देशातील सर्वात मोठ्या कार चोराला अटक केली आहे.
Indias Biggest Car Thief : कार, गाड्या चोरणाऱ्या अनेक आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पण आता दिल्ली पोलिसांनी देशातील सर्वात मोठ्या कार चोराला अटक केली आहे. अनिल चौहान असं बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी अनिल चौहानकडून अनेक गाड्या जप्त केल्या आहेत. तपास केला असता अनिल चौहान मागील 24 ते 25 वर्षांपासून गाड्या चोरत असल्याचं समोर आले आहे. अनिल चौहान याने आतापर्यत तब्बल 5000 कार चोरल्या असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालेय.
अनिल चौहान याने चोरीच्या गाड्या विकून मोठी संपत्ती जमा केली आहे. तो तब्बल दहा कोटींच्या घरात राहतो. त्याला तीन पत्नी आहेत. त्याशिवाय सोने आणि चांदी मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे आहे. तो उच्चदर्जाची कपडेही परिधान करत असल्याचे तपासात समोर आले आहे. अनिल अनिल चौहान याने आतापर्यंत अनेकांना गंडा लावला आहे. त्याने पाच हजार गाड्या चोरल्याची नोंद आहे. इतक्या मोठ्या गाड्या चोरल्याचं ऐकूण अनेकांना धक्का बसला.
राजधानी दिल्लीच्या मध्यवर्ती जिल्हा पोलिसांनी अनिल चौहान याला बेड्या ठोकल्या आहेत. अनिल चौहान हा मूळचा आसामचा रहिवासी असून तो 1990 पासून चोर्या करत आहे. आतापर्यंत त्यान पाच हजारांपेक्षा जास्त महागड्या गाड्यांची चोरी केली आहे.
नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि आसामसह इतर राज्यामध्ये अनिल चौहान याच्याविरोधात तब्बल 181 गुन्ह्याची नोंद आहे. यामधील 146 गुन्हे दिल्लीमध्ये दाखल आहेत. गाड्याशिवाय अनिल शस्त्र आणि गेंड्याच्या शिंगाची तस्करीही करत असल्याचे समोर आलेय. 52 वर्षीय अनिल चौहान चोरलेल्या कार गंतोक, आसाम आणि नेपाळसह 25 ठिकाणी विकत असल्याचं तपासात समोर आले आहे. अनिल चौहान याला अटक करणे मोठं टास्क होतं, अशी प्रतिक्रिया दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांतील डीसीपी श्वेता चौहान यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला देशबंधू गुप्ता रोड परिसरातून अटक करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी अनिल चौहान याच्याकडून पाच पिस्तूलसह चोरीची कारही जप्त केल्या आहेत.
1990 मध्ये अनिल चौहान दिल्लीमध्ये रिक्षा चालक म्हणून काम करत होता. त्यानंतर पैशांच्या हव्यासापोठी तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. आतापर्यंत अनिलने 5000 पेक्षा जास्त महागड्या गाड्यांची चोरी केली आहे. चोरीतून अनिलने कोट्यवधींची संपत्ती गोळा केली आहे. त्याच्याकडे तब्बल दहा कोटी रुपयांचा बंगलाही आहे. त्याची तीन लग्ने झाली आहेत. तो ऐसपैस जगत होता. सोनं-चांदीसह महागडी कपडे परिधान करत होता. पण अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच. अनिल चौहान देशातील सर्वात मोठा कार चोर असल्याची चर्चा सुरु आहे.