Hingoli : नोकरीचं आमिष, 20 जणांना गंडवलं, 1.14 कोटींचा गंडा; हिंगोलीतील तोतया जिल्हाधिकाऱ्याचा भांडाफोड
Hingoli News Update : इतकेच काय तर त्या तोतया अधिकाऱ्यानं हिंगोलीमध्ये बोगस बँकेची स्थापनाही केली होती.
Hingoli News Update : हिंगोलीत एक फिल्मी घटना घडली आहे. एका तोतया अधिकाऱ्यानं नोकरीचं आमिष दाखवत 20 जणांना फसवलं. इतकेच काय तर त्यानं तिथं बोगस बँकेची स्थापनाही केली होती. तो व्यक्ती अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचं लोकांना सांगून फसवणूक करत होता. त्यानं 20 जणांना एक कोटी 16 लाख रुपयांना गंडवलं होतं. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हिंगोलीत हा प्रकार घडला. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या तोतया अधिकाऱ्याचा पर्दाफाश केलाय.
अमोल पजई असे या तोतया जिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. पजई आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर पजई आणि त्याच्या साथीदारांनी आतापर्यंत एक कोटी 16 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय बोगस बँकेमार्फत 14 लाख रुपयांना फसवलेय.
स्वत:च अडकला पोलिासंच्या जाळ्यात -
हिंगोलीच्या पोलिस अधीक्षकांना खासगी शाळेतील स्नेह संमेलनात एक युवक भेटला. त्याने आपण अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचे सांगितले. इतकेच नाही तर तो पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या कॅबिनमध्ये बसून अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचे सांगत त्यांच्यासोबत बोलत होता. यावेळी संबंधित व्यक्तीचा संवाद आणि वर्तणूक पाहिल्यानंतर पोलिस अधीक्षकांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना अधिक माहिती घेण्याचे कळवले. यावेळी पोलिसांना तोतया अतिरिक्त जिल्हाधिकारी याच्या आलिशान कारमधून पाच लाख रूपयांची रोख रक्कम आणि अनेक उत्तर पत्रिकांसह अन्य दस्तऐवज आढळून आले. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता संबंधित अतिरिक्त जिल्हाधिकारी बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शाळेची फसवणूक केल्याप्रकरणी त्या तोतया अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल पजई आणि त्याच्या अन्य साथीदारांविरोधात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली. यावेळी त्याने नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
आमोल पजई जिल्ह्यातील अनेक गावात आलिशान कारने तर कधी लाल दिव्याच्या गाडीतून फिरत जिल्हाधिकारी असल्याचे सांगून नोकरीचे आमिष देत लाखो रुपयांना गंडा घालत असे. जिल्ह्यातील शिंदगी येथील 20 बेरोजगार युवकांना वनविभागात आणि आरोग्य विभागात नोकरीला लावण्याचे आमिष देत तब्बल 1 कोटी 16 लाख रूपयांना गंडवल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या आव्हाना नंतर फसवणूक झालेल्या युवकांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावरून त्याच्यावर 1 कोटी 16 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल पजई इतक्यावरच थांबला नाही तर त्याने निधी अर्बन नावाने एक बोगस बँक देखील सुरू केली आहे. या बँकेची कोणतीही नोंदणी नसताना लोकांकडून बँकेत पैसे ठेवी ठेवण्यासाठी आमिष दिले जायचे. परंतु तोतया अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे बिंग फुटल्याने बँकेचीही नोंदणीच नसल्याची माहिती समोर आली. त्यावरून 14 लाख रुपये ठेवी स्वरूपात घेतल्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार एका व्यापाऱ्याने दिली. या तक्रारीवरूनही अमोल पजई याच्याविरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.