दीर भावजयच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या
मयताची पत्नी ताई आणि भाऊ गणेश यांच्यात गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. भाऊ रामदासचा त्यांच्यात अडथळा येत होता.

बारामती : दीर भावजयच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बारामती तालुक्यात घडली आहे. दीर भावजयच्या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना बारामती तालुक्यातील कुतवळवाडीत घडली आहे.
रामदास महानवर 25 नोव्हेंबरपासून घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार गणेश महानवर यांनी 27 नोव्हेंबर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात दिली. बेपत्ता रामदास महानवर यांचा तपास सुरू असताना 28 नोव्हेंबरला त्याचा मृतदेह कुतवळवाडीच्या हद्दीतील सकटवाडी येथील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला. मृतदेह बाहेर काढला असता मयताच्या पोटाला अंदाजे 20 ते 25 किलो वजनाचा दगड बांधल्याचे आढळून आले. रामदासच्या डोक्यावर इजा झाल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यावरून रामदासच्या वडिलांना घातपात झाल्याची शंका आली. म्हणून त्यांनी वडगाव निंबाळकर येथील पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
पोलीस या घटनेचा तापस करत असताना त्यांना मयत रामदासचा भाऊ गणेश आणि रामदासची पत्नी ताई महानवर यांच्या माहितीत विसंगती आढळून आली. त्यावरून संशयाची सुई त्यांच्या दिशेने फिरली कसून चौकशी केली असता मयताची पत्नी ताई आणि भाऊ गणेश यांच्यात गेल्या 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. भाऊ रामदासचा त्यांच्यात अडथळा येत होता. ताई आणि गणेश यांनी पूर्व नियोजन कट रचून रामदासच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आणि पुरावे नष्ट व्हावेत, या उद्देशाने रामदासच्या पोटाला 20 ते 25 किलोचा दगड इलेक्ट्रिक वायरने बांधून विहिरीत फेकला अशी 1 डिसेंबरला कबुली दिली. त्यावर पोलिसांनी ताई महानवर आणि गणेश यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
