Beed Online Fraud : WhatsApp ग्रुपमध्ये अॅड केलं, लॉटरी आणि कारचं आमिष दाखवलं; शिक्षकाला 29 लाखांना गंडा
केबीसी नावाच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करुन बीड शहरातील एका शिक्षकाला भामट्यांनी लॉटरी आणि कारचे आमिष दाखवून तब्बल 29 लाख 23 हजार रुपयांना गंडा घातला.
बीड : ऑनलाईन फ्रॉड करुन लाखो रुपयांचे गंडा घालणारे भामटे रोज नवीन शक्कल लढवून लोकांना लुबाडण्याचे फंडे शोधून काढत असतात. बीडमधल्या एका शिक्षकाला तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली आहे शिवाय कार सुद्धा मिळणार आहे असे आमिष दाखवून एका भामट्याने चक्क 29 लाख 23 हजार रुपयाला गंडवले.
केबीसी नावाच्या व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करुन बीड शहरातील एका शिक्षकाला भामट्यांनी लॉटरी आणि कारचे आमिष दाखवून तब्बल 29 लाख 23 हजार रुपयांना गंडा घातला. कार अन् लॉटरीच्या मोहात अडकलेल्या शिक्षकाला हे भामटे 30 वेळेस कॉल करुन विविध प्रक्रिया शुल्क, टॅक्स,जीएसटी, सेवाशुल्क, वाहतूक खर्च आदीच्या नावाखाली पैसे भरावे लागतील असे सांगून वेगवेगळे बँक खाते नंबर देऊन लुटत राहिले.
अखेर आपली फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर या सार्या ऑनलाईन फ्रॉडचा पर्दाफाश झाला. शिक्षकाच्या फिर्यादीवरुन बीड शहर पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे.
मोहम्मद फहीमोद्दीन अब्दुल रहीम असे फसवणूक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. शहरातील झमझम कॉलनीत ते राहतात. त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद शिक्षिका असून ते बीडमध्ये उर्दू प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.
व्हॉट्सअॅपवरील केबीसी ग्रुपमध्ये अॅड केले
या फसवणुकीला सुरुवात झाली ती या शिक्षकाला व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमध्ये ॲड करुन. या ग्रुपचं नाव होतं केबीसी. 11 डिसेंबर 2021 रोजी घरी मोहम्मद फहीमोद्दीन अब्दुल रहीम हे घरी असताना अनोळखी व्यक्तीने त्यांना एका व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये समाविष्ट केले. केबीसी नावाच्या या ग्रुपवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात 25 लाखांची लॉटरी आणि आलिशान कार बक्षीस म्हणून दिल्याचे दाखवंले होते. हे पाहून 13 डिसेंबर रोजी शिक्षक मोहम्मद रहीम यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. त्याने मोहम्मद यांना बोलण्यात गुंतवून ठेवत 30 टप्प्यांत वेगवेगळ्या थापा मारल्या.
प्रक्रिया शुल्क, टॅक्स, जीएसटी, सेवाशुल्क, वाहतूक खर्चाच्या नावावर पैसे काढले
ऑनलाईन फ्रॉड करणार्या मनीष कुमार अन् आकाश वर्मा असे स्वत:चे नाव सांगणार्या भामट्यांनी बीडमधील शिक्षक मोहम्मद रहीम यांना सातत्याने कारचा मोह दाखवला. तुमच्यासाठी दुबईहून कार येत असून त्या कारचे काही फोटोही त्यांनी मोहम्मद रहीम यांना पाठवले अन् त्यांचा विश्वास संपादन केला. म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेऊन वेगवेगळ्या खात्यात ते पैसे भरत राहिले. याचाच फायदा घेत भामट्यांनी त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली तब्बल 29 लाख 23 हजार रुपये उकळले.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये मनीष कुमार, आकाश वर्मा यांच्यावर गुन्हा नोंद झाला. तपास पोलीस निरीक्षक रवी सानप करत आहेत. अमिषाला भुलून नागरिकांनी अशा अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करुन स्वत:ची आर्थिक फसवणूक करुन घेऊ नये असे आवाहन बीड शहर पोलिसांनी केलं आहे.