अंबाजोगाई पोलीस ठाण्यातून सराईत दरोडेखोराचे पलायन, पोलीस खात्यात खळबळ!
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई पोलीस ठाण्यातून सराईत दरोडेखोराने पलायन केलं आहे. यामुळे पोलीस खात्यात खळबळ माजली आहे.

बीड : सहा वर्षापूर्वी घडलेल्या दरोड्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांच्या हाती लागला. मात्र, पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेल्या दरोडेखोराने मोठ्या शिताफीने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. ही घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बीडच्या अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे.
बत्तीस वर्षाचा समाधान वैरागे याने 2016 मध्ये एका पेट्रोल पंपावर दरोडा घातला होता. या गुन्ह्यात त्याचा सहभाग पोलीस तपासात आढळून आला होता. समाधान हा मूळचा केज तालुक्यातील जवळबन मधला राहणारा आहे. मागच्या अनेक महिन्यापासून पोलीस दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास करत असताना समाधानचा शोध घेत होते. अशातच 1 सप्टेंबर रोजी तो जवळबन येथे असल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना केले.
या पथकाने दिवसभर पाळत ठेऊन सायंकाळी समाधान वैरागे याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, वैद्यकीय तपासणी करुन त्यास अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पथक निघून आले. ठाणे अंमलदाराच्या खुर्चीजवळ बसलेल्या समाधान वैरागे याने पोलीस कामात व्यस्त असल्याची संधी साधत रात्री साडेआठ वाजता ठाण्यातून पलायन केले. तो पळून गेल्याने ठाण्यात एकच गोंधळ उडाला. गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने पकडलेला आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यातून पळाल्याने खळबळ उडाली आहे. समाधान वैरागे हा हिस्ट्रीशीटर असून त्याच्यावर दरोड्यासारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
समाधान पोलीस स्टेशनमधून पळून गेल्याची माहिती कळताच बीड जिल्ह्यातील पोलिस खडबडून जागे झालं आहे. दोन पथकाद्वारे समाधानचा शोध घेण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत. मात्र, अद्याप तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.























