(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Baba Siddique: बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपींनी सलमान खानच्या घराचीही केली होती रेकी; धक्कादायक माहिती आली समोर
Baba Siddique Murder Case: गोळीबारनंतर गार्डनमध्ये आरोपी गुरुनेल सिंगचा मोबाईल डिसप्लेही तोडल्याची माहिती मिळत आहे.
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी प्रकरणातील (Baba Siddiqui Murder Case) आरोपींनी अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराचीही रेखी केली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी गुरमेल सिंह याने गेल्या महिन्यात सलमान खानच्या घराची रेखी केली होती. गोळीबारनंतर गार्डनमध्ये आरोपी गुरुमेल सिंहचा मोबाईल डिसप्लेही तोडल्याची माहिती मिळत आहे.
बाबा सिद्दीकी प्रकरणातील (Baba Siddiqui Murder Case) आरोपींना येणारी सर्व महिती ही 'स्नॅपचॅट' या अॅपद्वारे येत होती. तसेच आलेले मेसेज वाचून आरोपी ते मेसेज डिलिट करत होते. या आरोपींना घरासाठी बनवण्यात आलेले आधारकार्डही स्नॅपचार्टवर पाठवण्यात आले होते. या बनावट आधारकार्डचा स्क्रीनशॉर्ट काढून ते डिलिट करण्याच्या सूचना होत्या, अशी कबूली आरोपींनी दिली. तसेच या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल हे शिवाने घाटकोपरहून आणले, ते आणण्यासाठी शिवा एकटाच गेला होता. या संपूर्ण प्रकरणात शिवकुमार, गुरमेल सिंह आणि मोहम्मद जिशान अख्तर हे मुख्य आरोपी असून या तिघांनीच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट पुण्यातच रचल्याची माहिती सूत्रांनी दिली.
10 पोलिसांच्या नावाची रिवॉर्डसाठी शिफारस-
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पिस्तुलासह दोन शूटर्सला पकडणाऱ्या 10 पोलिसांच्या नावाची रिवॉर्डसाठी शिफारस करण्यात आली आहे. सहाय्यक निरीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलीस शिपाई संदीप आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बनकर, हवालदार अमोल पवार,पोलीस शिपाई अमोल वाकडे, सागर कोयंडे, एमएसएफ गार्ड पवार, महिला शिपाई माने, आणि हवालदार सुहास नलावडे यांचा यात समावेश आहे. गोळीबारानंतर एक आरोपी पळून गेला, तर गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोन आरोपींना पकडण्यात आले. यातील धर्मराज हा जवळील चिल्ड्रेन कॉम्प्लेक्सच्या बागेत झुडपात लपून बसला होता. त्यावेळी आव्हाड यांना झुडपांच्या आत एक व्यक्ती हालचाल करत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ त्याला सहकाऱ्यांच्यासह पकडले. पोलिसांना गुरनेलकडे पिस्तूल, एक जिवंत काडतुस, आणि एक बॅग सापडली. त्या बॅगमध्ये आणखी तीन गोळ्या सापडल्या. दोघांनी हे शस्त्र आणि गोळ्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक बनकर यांच्याकडे सुपूर्त केले. याप्रकरणी 10 पोलिसांनी जीवाची पर्वा न करता आरोपींना पकडले. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक त्यांना रिवॉर्ड देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
तिन्ही आरोपी कुर्ला येथून वांद्रे येथे जात होते-
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी कुर्ला येथून दररोज वांद्रे येथे जात होते. ते कुर्ला इथं भाड्याने रुम करुन राहत होते. हे सर्व आरोपी ऑटो रिक्षाचा वापर करत होते. आरोपी बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या मुलाशी संबंधित ठिकाणे, त्यांचे घर, कार्यालय आणि कार्यक्रमांवर पाळत ठेवत होते. गोळीबार करणाऱ्यांना झीशानलाही लक्ष्य करण्याचे आदेश मिळाल्याचा संशय पोलिसांना आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी दोघेही एकाच ठिकाणी होते. याबाबतची माहिती आरोपींना देण्यात आली होती.