Multiplex Popcorn Price : 10 रुपयाला मिळणारे पॉपकॉर्न मल्टिप्लेक्समध्ये महाग का? पीव्हीआरच्या सीएमडींनी स्पष्टच सांगितले
Multiplex Popcorn Price : मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये पॉपकॉर्नसह इतर खाद्य पदार्थ महाग का, असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. यावर पीव्हीआरच्या सीएमडींनी उत्तर दिले आहे.
Multiplex Popcorn Price : चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण टीव्हीपेक्षा चित्रपटगृहाला प्राधान्य देतात. मात्र, मागील काही वर्षांत चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे खर्चिक होऊ लागले आहे. चित्रपटांच्या शोची तिकिटे आणि खाद्य पदार्थांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे हे खर्चिक बाब ठरू लागली आहे. एखाद्या खाद्यपदार्थाच्या दुकानात 10 ते 20 रुपयांपर्यंत मिळणारे पॉपकॉर्न मल्टिप्लेक्समध्ये 200 रुपयांहून अधिक दराने मिळतात. त्यामुळे अनेकजण नाराजी व्यक्त करतात. मल्टिप्लेक्समध्ये एवढे दर का, याबाबत पीव्हीआरच्या सीएमडींनी भाष्य केले आहे.
मल्टिप्लेक्समधील महागड्या खाद्यपदार्थांवर अनेकजण नाराजी व्यक्त करतात. साधारणपणे चार जणांच्या एका कुटुंबाला मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी किमान दोन ते अडीच हजारांचा खर्च येतो. महागड्या दराबाबत पीव्हीआरचे सीएमडी अजय बिजली यांनी भाष्य केले आहे. 'इकॉनॉमिक्स टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केले. अजय बिजली यांनी सांगितले की, मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या दराबाबत ग्राहकांनी नाराजी व्यक्त करणे हे योग्य नाही.
मल्टिप्लेक्सची अडचण काय?
अजय बिजली यांनी सांगितले की, भारतात आता सिंगल स्क्रिन चित्रपटगृहावरून मल्टिप्लेक्सकडे लोकांचा ओढा वाढत आहे. सिंगल स्क्रिन थिएटरची संख्या कमी होत आहे. सध्या या बदलाचा टप्पा सुरू आहे. सिंगल स्क्रिन थिएटरच्या तुलनेत मल्टिप्लेक्स थिएटर चालवणे अधिक खर्चिक असल्याचा मुद्दा बिजली यांनी उपस्थित केला. मल्टिप्लेक्स थिएटर चालवण्यासाठीची ऑपरेशनल कॉस्ट वसूल करण्यासाठी खाद्यपदार्थांचे दर अधिक असतात. सध्या तरी मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांचे दर वाढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजय बिजली यांनी मुलाखतीत सांगितले की, देशातील फूड अॅण्ड बेव्हरेज व्यवसाय सध्या 1500 कोटींच्या घरात आहे. मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये अधिक स्क्रिन असतात. त्यामुळे सिंगल स्क्रिन थिएटरच्या तुलनेत खर्च चार ते सहा पटीने वाढतो. मल्टिप्लेक्समधील प्रोजक्शन रुम, साउंड सिस्टिम आदींमुळे या खर्चात वाढ होते. त्याशिवाय वातानुकूलित व्यवस्थाही करावी लागते. या सगळ्यांसाठी मोठा खर्च येतो.
मल्टिप्लेक्ससमोर आव्हाने काय?
या वर्षाच्या सुरुवातीला पीव्हीआर आणि आयनॉक्सने विलिनीकरण करण्याची घोषणा केली. हा निर्णय गेमचेंजर राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विलिनीकरणामुळे प्रेक्षकांना तिकीट दर आणि अन्य सेवेत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, चित्रपटांसाठी 1500 स्क्रिन उपलब्ध होणार आहे. कोरोना महासाथीच्या काळात ओटीटीमुळे मल्टिप्लेक्स थिएटरसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत.