WPI Inflation: महागाईपासून दिलासा; ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाई दरात घट
WPI Inflation Rate: सलग 18 महिन्यानंतर घाऊक महागाईचा दर हा 10 टक्क्यांपेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाई दर हा 8.39 टक्के इतका नोंदवण्यात आला.
WPI Inflation Rate: ऑक्टोबर महिन्यात घाऊक महगाई दरात घट झाली (WPI Inflation) असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत हा ऑक्टोबरमध्ये घट दिसून आली आहे. मागील काही महिन्यांपासून महागाईचा सामना करणाऱ्या भारतीयांना आणि केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर महिन्यात घाऊक महागाईचा दर (October WPI Inflation) 8.39 टक्क्यांवर आला आहे.
सलग 18 महिने घाऊक महागाईचा दर हा दोन आकड्यांमध्ये होता. त्यानंतर आता 19 व्या महिन्यात हा आकडा 10 टक्क्यांहून कमी झाला आहे. याआधी मार्च 2021 मध्ये सर्वात कमी महागाई दर आढळला होता.
सप्टेंबर महिन्यात महागाई दरात 10.7 टक्क्यांवर होता. त्याआधी ऑगस्ट महिन्यात 12.41 टक्के होता. सप्टेंबर महिन्यातही घाऊक महागाईचा दर सलग 18 व्या महिन्यात दुहेरी आकड्यात होता.
घाऊक महागाईचा दर अनेक क्षेत्रात घसरण झाल्याचे दिसून आले. मॅन्युफॅक्चर्ड प्रॉडक्टचा महागाई दर घटून 4.42 टक्क्यांवर आला. मागील महिन्यात हा दर 6.34 टक्के इतका होता. त्याशिवाय फ्यूल अॅण्ड पॉवर सेक्टरमधील महागाईचा दर 23.17 टक्क्यांवर आला. त्याआधी हा महागाई दर 32.61 टक्के इतका होता.
घाऊक महागाई दरात घट होण्याचे मुख्य कारण हे खाद्यपदार्थांच्या किंमती कमी झाल्याचे म्हटले जाते. खाद्य महागाई दरात घट झाली असून हा दर 6.48 टक्क्यांवर आला आहे. मागील महिन्यात सप्टेंबर महिन्यात खाद्य महागाई दर 8.058 टक्के इतका होता.
कोअर महागाई दरात (Core Inflation Rate) घट झाली आहे. Core Inflation Rate ऑक्टोबर महिन्यात 4.6 टक्के इतका होता. त्याआधी सप्टेंबर महिन्यात हा दर 7 टक्क्यांवर होता.
प्रायमरी आर्टिकल्सच्या महागाई दरातही घट झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात हा दर 11.04 टक्के इतका होता. मागील महिन्यात सप्टेंबर महिन्यात हा दर 11.73 टक्के इतका होता.
सप्टेंबर महिन्यात खाद्य महागाई दर कमी झाला होता. हा दर 8.08 टक्क्यांवर आला होता. ऑगस्ट महिन्यात हा दर 9.93 टक्क्यांवर होता. भाज्यांच्या महागाई दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सप्टेंबर महिन्यात महागाई दर 39.66 टक्के इतका होता. तर, ऑगस्टमध्ये हा दर 22.29 टक्के इतका होता. सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने भाज्यांचे दर वाढले होते.