30000 लोकांची फसवणूक, 500 कोटींचा घोटाळा, एल्विश यादव, रिया चक्रवर्तीला नोटीस आलेला HIBOX Scam काय आहे?
ऑनालाईन पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. आता HIBOX Scam नावाचा नवा घोटाळा समोर आला आहे. या स्कॅमअंतर्गत 30 हजार लोकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
HIBOX Scam: सध्या देशात ऑनलाईन फुसवणुकीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आता 30 वर्षांच्या एका व्यक्तीने तब्बल 30 हजार लोकांची फसवणूक केली आहे. या व्यक्तीने HIBOX Scam अंतर्गत एकूण 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे या प्रकरणात यूट्यूबर्स तसेच सिनेकलाकारांना नोटिशी आल्या आहेत. हा कथित घोटाळा समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल IFSO (इन्टेलिजेन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेसन्स ) विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकणातील मास्टरमाईंड सिवाराम या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मुळचा चेन्नईचा रहिवासी आहे. याच सिवाराम याने 2016 साली सवरूल्ला एक्स्प्रेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन करून फेब्रुवारी 2024 मध्ये HIBOX नावाचे अॅप लॉन्च केले होते.
नेमका घोटाळा कसा झाला?
HIBOX अॅप म्हणजे एक गुंतवणूक योजना आहे, असा तेव्हा प्रचार करण्यात आला होता. या अॅपमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दररोज 1 ते 5 टक्के म्हणजेच महिन्याला 30 ते 90 टक्के व्याज मिळेल, असा प्रचार केला जाऊ लागला. या अॅपच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानंतर अनेक लोकांनी या अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक केली होती. सुरुवातीला या अॅपमाध्यमातून लोकांना परतावा देण्यात आला, त्यामुळे लोकांचा या अॅपवर विश्वास बसू लागला. मात्र जुलै 2024 नंतर या अॅपने लोकांना परतावा देणे थांबवले. तांत्रिक अडचण तसेच कायदेशीर वैधतेचे कारण देत लोकांना परतावा देणे थांबवण्यात आले.
अनेक स्टार्सची नावे आली समोर
हा घोटाळा समोर आल्यानंतर अनेक इन्फ्लुएन्सर्स तसेच सिनेकलाकारांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. यामध्ये एल्विश यादव, लक्ष्य चौधरी, अभिषेक मल्हान, कॉमेडियन भारती सिंह आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे. या सर्वांनी HIBOX अॅपचे प्रमोशन केले होते. पोलिसांकडून या सर्वांची चौकशी केली जाणार आहे.
बँक खाते गोठवले
दिल्ली पोलिसांच्या IFSO विभागाने सिवारामची चार बँक खाते गोठवली आहेत. यातील 18 कोटी रुपये रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणात Easebuzz आणि Phonepe यासारख्या पेमेंट कपन्यांच्या भूमिकेचीही चौकशी करणार आहेत. पोलिसांना या अॅपशी संबंधित एकूण 127 पेक्षा अधिक वेगवेगळ्या तक्रार प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींत आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सक्रीय होऊन या प्रकरणाची चौकशी चालू केली होती.
हेही वाचा :
'लाडकी बहीण'चा चौथा आणि पाचवा हप्ता एकदम जमा होणार, जाणून घ्या पैसे मिळण्यासाठी किती दिवस राहिले?