सोन्याच्या दरानं मोडले सर्व विक्रम, सणासुदीच्या काळात खरेदीदारांना मोठा झटका, 10 ग्रॅम सोन्याचा दर काय?
नवरात्रीच्या उत्सवापासूनच देशात सणांचा हंगाम सुरु होतो. या सणासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या दराला (Gold Silver Price) मोठी झळाळी आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
Gold Price : देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. नवरात्रीच्या उत्सवापासूनच देशात सणांचा हंगाम सुरु होतो. या सणासुदीच्या काळात सोन्या चांदीच्या दराला (Gold Silver Price) मोठी झळाळी आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवारी रात्री पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झालीय. सोने सुमारे 150 रुपयांनी महागले असून, प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी 78,450 रुपये मोजावे लागत आहेत. हा सोन्याचा आत्तापर्यंतचा विक्री दर आहे. दुसरीकडे या शर्यतीत चांदी देखील मागे नाही. काल चांदीच्या दरात 1035 रुपयांची वाढ झालीय. त्यामुळं प्रतिकिलो चांदीचा दर हा 94,200 रुपयांवर पोहोचला आहे.
ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ
ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, सणासुदीच्या काळात ज्वेलर्स आणि किरकोळ विक्रेत्यांकडून प्रचंड मागणी असल्याने ही वाढ दिसून आली आहे. गुरुवारी सोन्याचा भाव 78,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. नवरात्रीच्या काळात सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ झाल्याने दरात ही वाढ होत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही डिसेंबर सोन्याचा भाव 131 रुपयांनी वाढून 76375 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. हे देखील त्याच्या सर्वकालीन उच्चांकाच्या जवळ आहे.सणासुदीच्या हंगामातील मागणीमुळे सोन्याच्या दराने जुना विक्रम मोडला आहे. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या मते, सणासुदीच्या काळात ज्वेलर्सकडून वाढत्या मागणीमुळे ही वाढ दिसून आली आहे. एमसीएक्सवरही सोन्या-चांदीत वाढ झाली आहे. तसेच पश्चिम आशिया खंडात सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम देखील सोन्या चांदीच्या दरावर झाला आहे. तसेच जागतिक व फेडरल रिझर्व्ह बँकांनी कमी केलेला व्याजदराचा परिणाम देखील सोन्या चांदीच्या भावात तेजी बघायला मिळत आहे.
चांदीचे दर प्रति किलो 1 लाख रुपये होणार का?
चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ होत आहे. चांदीचे दर हे 1 लाख रुपये प्रति किलोच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. सध्या चांदीला देखील मोठी मागणी आहे. आता सणासुदीच्या काळात लोकांच्या मागणीमुळे ज्वेलर्सही जास्त खरेदी करत आहेत. एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज) वर डिसेंबर चांदीचे दर 219 रुपयांनी वाढून 93,197 रुपये प्रति किलो झाला आहे.
धनत्रयोदशीला सोन्याच्या दराचा नवा विक्रम होणार?
सोन्या-चांदीच्या दरातील ही वाढ पुढील आठवड्यातही कायम राहू शकते. ऑक्टोबरमध्ये नवरात्रीनंतर दिवाळीही येत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीची मोठी खरेदी होते. धनत्रयोदशीला सोन्याचा दर नवा विक्रम प्रस्थापित करू शकतो, असे मानले जात आहे.
महत्वाच्या बातम्या: