(Source: ECI/ABP News/ABP Majha)
semiconductor : 'आत्मनिर्भर भारत'कडे एक पाऊल; वेदांता-फॉक्सकॉन गुजरातमध्ये करणार सेमीकंडक्टर निर्मिती
semiconductor : भारतातील पहिला सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प गुजरातमध्ये सुरू होणार आहे. वेदांता आणि तैवानची फॉक्सकॉन कंपनी संयुक्तपणे हा प्रकल्प सुरू करणार आहे.
Semiconductor : सेमीकंडक्टर बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या (semiconductor) तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने (Vedanta) तैवानमधील कंपनी फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.
भारतात सेमीकंडक्टर तयार करणारा प्रकल्प वेदांता समूह-फॉक्सवेगन अहमदाबादजवळ सुरू करणार आहे. गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी स्वस्त दरात वीज आणि अनुदान, इतर मदत जाहीर केली असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, वेदांता समूहाने मोफत 1000 एकर जमीन 99 वर्षांसाठी मागितली होती. त्याशिवाय स्वस्त, वाजवी दरात पाणी-वीज मागितली होती, असे सूत्रांनी सांगितले.
गुजरात मुख्यमंत्री कार्यालय, राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याकडूनही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तर, वेदांता आणि फॉक्सकॉन कंपनीने गुजरात सरकारसोबत झालेल्या व्यवहाराची माहिती दिली नाही. गुजरात सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉन यांच्यातील सामंजस्य करारावर या आठवड्यात स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांनीदेखील हा प्रकल्प आपल्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्न केले होते.
भारतातील सेमीकंडक्टरची बाजारपेठ 2020 मध्ये 15 अब्ज डॉलर इतकी होती. ही बाजारपेठ 2026 पर्यंत 63 अब्ज डॉलर इतकी होण्याचा अंदाज आहे. तैवान, चीनसारख्या मोजक्याच देशांमध्ये सेमीकंडक्टरची निर्मिती केली जाते. आगामी डिजीटल तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता सेमीकंडक्टरला मोठी मागणी असणार आहे. चीन-तैवानमधील तणाव, कोरोना महासाथ आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे भारताला होणाऱ्या सेमीकंडक्टर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
गुजरातमध्ये प्रकल्प गेल्याने राजकारण पेटणार?
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपवर होत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलेल्या एका दाव्याने ही चर्चा पुन्हा सुरू होणार असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. वेदांता-फॉक्सकॉनने (Vedanta Foxconn Semiconductor) गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केली. या घोषणेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. मात्र, त्याच वेळी, या सेमीकंडक्टरच्या प्रकल्पामुळे भारताच्या विकासाचा नवा मार्ग सुरू होईल असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या: