Semi Conductor Project : महाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरातमध्ये कसा? आदित्य ठाकरेंच्या ट्वीटने चर्चांना उधाण
Aaditya Thackeray on Semiconductor Project : वेदांता-फॉक्सकॉन समूहाने सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यावर राजकीय पडसाद उमटण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
Semiconductor Project : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपवर होत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलेल्या एका दाव्याने ही चर्चा पुन्हा सुरू होणार असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा (Semiconductor Project) प्रकल्प गुजरातमध्ये गेला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. वेदांता-फॉक्सकॉनने (Vedanta Foxconn Semiconductor) गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
सेमीकंडक्टर बाबत आत्मनिर्भर होण्यासाठी भारतातील उद्योजकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील काही वर्षांपासून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे भारतातील उद्योगांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले होते. ऑटो आणि स्मार्टफोन निर्मिती उद्योगांना मोठा फटका बसला होता. सोमवारी वेदांता समूहाने फॉक्सकॉन कंपनीसोबत 20 अब्ज डॉलरचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा केली. अहमदाबादजवळ हा सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता समूहाच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले असल्याचे म्हटले. आदित्य ठाकरे यांनी वेदांता समूहाचे अनिल अग्रवाल यांच्या ट्वीटचे स्क्रिनशॉट शेअर करत ट्वीट केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, भारतात सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प सुरू होतोय याचा आनंद आहे. मात्र, महाराष्ट्रातून हा प्रकल्प बाहेर गेल्याने धक्का बसला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह मी बैठका घेतल्या होत्या. महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू करण्याबाबत सर्वकाही अंतिम करण्यात आले होते. हा प्रकल्प राज्यात आला असता तर नवीन सरकारला याचे श्रेय घेता आले नसते. या नव्या सरकारकडे आपल्या राज्याला प्रगतीच्या मार्गावर नेण्याची वचनबद्धता दिसत नसल्याची टीका आदित्य यांनी केली.
Although I’m glad to see this in India, I am a bit shocked to see this.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 13, 2022
New dispensation had tweeted photos, claiming to have brought this to Maharashtra, but it seems intent/ commitment was to send this away from Maharashtra.
Our MVA Govt had brought this to final stage. (1/n) pic.twitter.com/ePbevT6tLi
आदित्य ठाकरे यांनी गुजरातमधील सेमीकंडक्टरच्या या नव्या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रकल्पामुळे भारताच्या विकासाचा नवा मार्ग सुरू होईल असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही महाराष्ट्राला देशाच्या विकासात मोठं योगदान देणारे राज्य तयार करण्याचे प्रयत्न केले होते असेही आदित्य यांनी म्हटले.
वेदांताला असा लाभ?
भारतात सेमीकंडक्टर तयार करणारा प्रकल्प वेदांता समूह-फॉक्सवेगन अहमदाबादजवळ सुरू करणार आहे. गुजरात सरकारने या प्रकल्पासाठी स्वस्त दरात वीज आणि अनुदान, इतर मदत जाहीर केली असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, वेदांता समूहाने मोफत 1000 एकर जमीन 99 वर्षांसाठी मागितली होती. त्याशिवाय स्वस्त, वाजवी दरात पाणी-वीज मागितली होती. याबाबत मात्र, अधिकृत माहिती समोर आली नाही.