Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स 61 हजार अंकांखाली घसरला
Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीने झाली असून आज नफावसुलीचे संकेत दिसत आहेत.
Share Market Opening Bell: जागतिक पातळीवर शेअर बाजारात होत असलेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला आहे. भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली आहे. सेन्सेक्स (Sensex) 61 हजार अंकाखाली घसरला. निफ्टीचीही (Nifty) घसरणीसह सुरुवात झाली.
आशियाई शेअर बाजारात घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 323 अंकांच्या घसरणीसह 60,709 अंकावर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 90 अंकांच्या घसरणीसह 18,066 अंकांवर खुला झाला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 463 अंकांच्या घसरणीसह 60,569.83 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 134 अंकांच्या घसरणीसह 18,022.05 अंकांवर व्यवहार करत होता.
बाजारात विक्रीचा सपाटा दिसून येत आहे. फार्मा सेक्टरमध्ये तेजी दिसत असून इतर सेक्टरमध्ये घसरण दिसून येत आहे. बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, एनर्जी, मेटल्स, मीडिया, रिअल इस्टेट कंपन्यांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील 19 कंपन्यांचे शेअर तेजीत दिसत असून 21 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आहे. सेन्सेक्स निर्देशांकातील 30 पैकी 9 शेअर्सच्या दरात तेजी दिसून येत आहे. तर, 21 शेअर्सच्या दरात घसरण दिसत आहे.
आज शेअर बाजारात सिप्ला 1.76 टक्के, डॉ. रेड्डी 1.17 टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर 0.92 टक्के, डिव्हीज लॅब 0..80 टक्के, भारती एअरटेल 0.62 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 0.58 टक्के, यूपीएल 0.57 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे.
तर, टाटा मोटर्समध्ये 4.44 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. अॅक्सिस बँक दोन टक्के, टेक महिंद्रा 1.67 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1.51 टक्के, आयशर मोटर्स 1.32 टक्के, जेएसडब्लू स्टील 1.13 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या अॅक्सिस बँकेतून सरकार आपला 1.55 टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे या शेअरवर गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. तर, Nykaa च्या शेअरमधील प्री-आयपीओ दरम्यान गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा लॉक इन पीरियम संपणार आहे. त्यामुळे या शेअर्समध्ये विक्री होण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: