(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Opening Bell: शेअर बाजारात नफावसुलीचा जोर, सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आज विक्रीचा जोर दिसत असून गुंतवणूकदारांकडून नफावसुली सुरू आहे.
Share Market Opening Bell: मागील काही दिवस ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर आज भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून नफावसुलीचे संकेत दिसून येत आहेत. बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) किंचीत घसरणीसह आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची निर्देशांक निफ्टी (Nifty) 23 अंकांच्या तेजीसह खुला झाला. मात्र, त्यानंतर बाजारात घसरण सुरू झाली.
आज बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 62,865.28 अंकांवर खुला झाला. तर, निफ्टी निर्देशांक 18,719.55 अंकावर खुला झाला. सकाळी 10.05 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 326.11 अंकांच्या घसरणीसह 62,542.39 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 97.55 अंकांच्या घसरणीसह 18,598.55 अंकांवर व्यवहार करत होता.
सेन्सेक्स निर्देशांकातील 30 कंपन्यांपैकी फक्त चार कंपन्यांचे शेअर दर तेजीत आहेत. तर, उर्वरित 26 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. टाटा स्टील, इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँकेच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही विक्रीचा जोर दिसून येत आहे. निफ्टी 50 मधील 10 कंपन्यांचे शेअर दर तेजीत दिसत असून 40 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे. निफ्टीत हिंदाल्कोमध्ये 2.59 टक्के, टाटा स्टीलमध्ये 1.70 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. त्याशिवाय, जेएसडब्लू स्टीलमध्ये 1.12 टक्के, इंडसइंड बँकेत 0.63 टक्के, आयशर मोर्टसमध्ये 0.48 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर दरात 2.61 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. एसबीआय लाइफच्या शेअर दरात 1.55 टक्के, टाटा मोटर्समध्ये 1.53 टक्के, ब्रिटानियामध्ये 1.41 टक्के आणि रिलायन्सच्या शेअर दरात 1.12 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
शेअर बाजारात आज सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी बँका, मीडिया, मेटल आणि रियल्टी सेक्टरमध्ये तेजी दिसून येत आहे. स तर, ऑटो, वित्तीय सेवा, आयटी, फार्मा, एफएमसीजी, हेल्थकेअर इंडेक्स, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऑईल अॅण्ड गॅसच्या शेअर दरात घसरण दिसून येत आहे.
आरबीआयची बैठक
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण समितीची बैठक आजपासून सुरू होणार आहे. तीन दिवस सुरू असणारी ही बैठक 7 डिसेंबर रोजी संपणार आहे. त्याच दिवशी आरबीआय आपले पतधोरण जाहीर करणार आहे. आरबीआयकडून रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई दर अजूनही 6 टक्क्यांहून अधिक असल्याने रेपो दरात वाढ होण्याची शक्यता आहे.