Share Market Closing Bell : विक्रीच्या सपाट्याने शेअर बाजारात पडझड; सेन्सेक्स 866 अंकानी घसरला
Share Market Closing : नफा वसुलीमुळे आणि विक्रीच्या सपाट्यामुळे शेअर बाजारात पडझड झाली. शेअर बाजार निर्देशांकाने दोन महिन्यातील नीचांक स्तर गाठला आहे.
Share Market Closing : या आठवड्याचा व्यवहाराचा शेवटचा दिवस शेअर बाजार गुंतवणुकदारांसाठी चिंतेचा ठरला. अमेरिकन आणि आशियाई शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. आज शेअर बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्समध्ये 866.65 अंकाची घसरण झाली. तर, निफ्टीमध्ये 271 अंकाची घसरण झाली.
नफा वसुली आणि विक्रीचा सपाटा यामुळे शेअर बाजारात घसरण झाली. परिणामी शेअर बाजार निर्देशांकाने दोन महिन्यातील नीचांकी स्तरावर बंद झाला. सेन्सेक्समध्ये 866.65 अंकाची घसरण होत 54,835 अंकावर बंद झाला. तर, निफ्टीमध्ये 271 अंकाची घसरण झाल्याने 16,411 अंकावर बंद झाला.
शुक्रवारी, ऊर्जा क्षेत्र वगळता ऑटो, मेटल्स, सेवा, बँकिंग, ऑइल अॅण्ड गॅस सेक्टर, ग्राहकपयोगी क्षेत्रात घसरण दिसून आली. निफ्टी 50 मधील 12 स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली. तर, 38 शेअरमध्ये घसरण झाली. सेन्सेक्समधील 30 स्टॉक्सपैकी 7 शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, 23 स्टॉक्सच्या शेअरमध्ये घसरण झाली. मेटल आणि रियल्टी क्षेत्रात 3 टक्क्यांनी घसरण झाली. तर, आयटी क्षेत्रात 2 टक्क्यांनी घसरण झाली.
आज शेअर बाजारातील 837 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. तर, 2444 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण झाली आणि 105 कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही.
दरम्यान, आज सकाळी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली होती. जवळपास 900 अंकानी शेअर बाजार कोसळला होता. ही घसरण साधारणपणे 1200 अंकापर्यंत होती. त्यानंतर बाजार सावरण्याचा प्रयत्न करत होता. गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. तर, आशियाई शेअर बाजारात पडझड दिसून आली. हँगसेंग निर्देशांक 4 टक्क्यांनी कोसळला होता. जागतिक स्तरावरही महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशातील मध्यवर्ती बॅंकांकडून व्याज दरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत. त्याच्या परिणामी जगातील इतर शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. महागाई वाढत असल्याने गुंतवणूकदारांकडून आपल्या गुंतवणुकीबाबत पुनर्विचार होत असल्याने बाजारात विक्री सुरू आहे.