Salesforce Layoffs News : मंदीची गडद छाया! आणखी एका आयटी कंपनीत होणार 10 टक्के कर्मचारी कपात; जाणून घ्या कारण
Salesforce Layoffs News : आर्थिक मंदीचे सावट तीव्र होत असताना दुसरीकडे आणखी एका आयटी कंपनीने 10 टक्के नोकर कपातीचा निर्णय घेतला आहे.
Salesforce Layoffs News : मागील काही दिवसांपासून देशातील आणि जगातील अनेक टेक कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांची विविध कारणांनी कपात (Layoffs) करत आहेत. आर्थिक मंदीची भीती यामागे कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी त्यांनी आतापासून तयारी करावी, असे आयटी कंपन्यांना वाटत आहेत. आयटी कंपन्यांकडून (IT Companies) खर्च कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.
काही कंपन्या त्यांच्या कर्मचार्यांना त्यांच्या कामाच्या कामगिरीच्या आधारावर काढून टाकत आहेत, तर काही त्यांच्या कर्मचार्यांना वर्क फ्रॉम होमवर (Work From Home) जाण्याचे आदेश देत आहेत. त्यामुळे कंपनीच्या कार्यालयावर होणारा खर्च कमी होत आहे. आयटी क्षेत्रातील "सेल्सफोर्स ' (Salesforce Inc) सॉफ्टवेअर कंपनीने आपल्या 10 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याचे म्हटले आहे.
वृत्तानुसार, "सेल्सफोर्स ' कंपनीने 10 टक्के कर्मचारी कपातीसह आपली काही कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक मंदीचे कारण देत कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत "सेल्सफोर्स इंक' कंपनीचाही समावेश झाला आहे.
सीईओचे कर्मचाऱ्यांना पत्र
ल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिओफ (मार्क बेनिऑफ, सेल्सफोर्स सीईओ) यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक पत्र लिहीले आहे. पत्रात त्यांनी म्हटले की, 'परिस्थिती अजूनही आव्हानात्मक आहे आणि आमचे ग्राहक त्यांच्या खर्चाचे निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेत आहेत. 'कोरोना महासाथीच्या काळात आमच्या महसुलात मोठी वाढ झाल्याने आम्ही खूप लोकांना कामावर घेतले होते. त्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात आमचा खर्च वाढला आहे आणि मी याची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याचे बेनिओफ यांनी म्हटले.
आयटी कंपन्यांवर दबाव
महागाई वाढत असताना आयटी कंपन्यांवर दबाव दिसून येत आहे. महागाई रोखण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँका व्याजदर वाढवत आहेत. व्याजदरात झालेल्या या वाढीमुळे मंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कंपन्यांनी केलीय कर्मचारी कपात
गेल्या काही महिन्यांत सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुक आणि ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने आर्थिक मंदीला सामोरे जाण्यासाठी कर्मचारी कपात केली आहे. त्याशिवाय इतरही काही नावाजलेल्या आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात केली आहे. पेप्सिको कंपनी आर्थिक मंदीचा संभाव्य धोका पाहता कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. वॉल स्ट्रिट जर्नल वृत्तपत्राच्या (The Wall Street Journal) रिपोर्टनुसार, पेप्सिको कंपनी सुमारे 100 कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबतीत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये नोकरकपातीचं सत्र सुरु झालं आहे. सर्वात आधी मायक्रोसॉफ्ट कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं. त्यानंतर ॲमेझॉन, ट्विटर, मेटा, ॲपल या टेक कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नारळ दिला.