एका दिवसात पैसे डबल! शेअर बाजारावर येताच 'या' कंपनीने पाडला पैशांचा पाऊस
प्रिमियर एनर्जी या आयपीओची सगळीकडे चर्चा होती. ही कंपनी आता शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल दुप्पट परतावा दिला आहे.
मुंबई : सोलार सेल आणि सोलार पॅनेल तयार करणाऱ्या प्रिमियर एनर्जी (Premier Energy Share Price) या शेअरने गुंतवणूकदारांची झोळी पैशांनी भरली आहे. या कंपनीचा काही दिवसांपूर्वी आयपीओ आला होता. आता हीच कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाली आहे. शेअर बाजारावर सूचिबद्ध होताच या कंपनीच्या शेअरचे मूल्य तब्बल दुप्पट झाले आहे.
एका शेअरमागे तब्बल 541 रुपयांचा फायदा
प्रिमियर एनर्जी कंपनीचा शेअर मुंबई शेअर बाजारावर म्हणजेच बीएसईवर 991 रुपयांवर तर राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच एनएसईवर 990 रुपयांवर सूचिबद्ध झाला आहे. प्रिमियर एनर्जी या कंपनीचा आयपीओ आला तेव्हा या आयपीओचा किंमत पट्टा 427 रुपये ते 450 रुपये होता. म्हणजेच आयपीओत गुंतवणूक केलेल्यांना एका शेअरमागे तब्बल 541 रुपयांचा फायदा झाला.
एका लॉटची किंमत 32,703 रुपये झाली
या कंपनीच्या आयपीओमध्ये प्रत्येक लॉटमध्ये 33 शेअर्स होते. म्हणजेच आयपीओत गुंतवणूक करणाऱ्यांनी या कंपनीत कमीत कमी 14,850 रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. आता ही कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध झाल्यानंतर या एका लॉटची किंमत 32,703 रुपये झाली आहे. म्हणजेच एका लॉटमागे गुंतवणूकदारांना 17,853 रुपयांची कमाई झाली आहे.
गेल्या आठवड्यात आला होता आयपीओ
गेल्या आठवड्यात प्रिमियर एनर्जी या कंपनीने तब्बल 2,830.40 कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 27 ऑगस्ट रोजी खुला झाला होता. 29 ऑगस्टपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार होती. या आयपीओच्या माध्यमातून एकूण 1,291.40 कोटी फ्रेश शेअर जारी करण्यात आले होते. तर 1,539 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेलदेखील सामील होता.
प्रिमियर एनर्जी ही कंपनी नेमकं काय काम करते?
प्रिमियर एनर्जी या कंपनीची सुरुवात 1995 साली झाली होती. या कंपनीकडून सोलार सेल आणि सोलार पॅनलची निर्मिती केली जाते. सोबतच सोलार मॉड्यूल, मोनोफेसियल मॉड्यूल, बायफेसियल मॉड्यूल, ईपीसी सोल्यूशन्स, ओअँडएम सोल्यूशन्स आदींचेही उत्पादन घेतले जाते. या कंपनीचे तेलंगाणा आणि हैदराबादमध्ये पाच मॅन्यूफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. एनटीपीसी, टाटा पॉवर आदी दिग्गज कंपन्या प्रिमियर एनर्जी या कंपनीच्या ग्राहक आहेत.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
या आठवड्यात मालामाल होण्याची संधी, 'हे' स्टॉक्स होणार एक्स डिव्हिडेंड!
भारताच्या उद्योग विश्वात मोठी घडामोड! टाटा उद्योग समुहाच्या तीन कंपन्यांचे विलीनीकरण