PM Modi On LIC : LIC ची स्थिती चांगली, पंतप्रधानांचा दावा; पण आकडेवारी काय सांगते?
LIC Share News : पंतप्रधान मोदी यांनी एलआयसी आणि इतर सरकारी कंपन्यांची स्थिती चांगली असल्याचे म्हटले. मात्र, एलआयसीचे शेअर बाजारातील आकडे काही वेगळेच सांगतात.
PM Modi On LIC : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी गुरुवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी यांनी दोन तास 13 मिनिटांचे भाषण केले. आपल्या भाषणात विरोधकांवर टीका करताना त्यांनी सरकारच्या योजनांची माहिती दिली. इतकंच नव्हे तर त्यांनी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना (Share Market Investment) सल्लेही दिलेत. सरकारी कंपन्यांचे नुकसा होत असल्याचा विरोधकांचा आरोप खोडून काढताना सरकारी बँका, कंपन्यांचे यश सांगितले.
विरोधाकांनी सरकार एलआयसी कमकुवत करत असल्याचा आरोप केला. पण एलआयसी मजबूत होत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. LIC मध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्यांना फायदा झाला असल्याचा दावा केला. मात्र, एलआयसीबाबत वस्तुस्थिती काहीशी वेगळी आहे.
आकडे काय सांगतात?
एलआयसीचे आकडे बघितले तर वास्तव वेगळे दिसते. एलआयसी ही वर्षभरापूर्वी शेअर बाजारात लिस्ट झालेली सार्वजनिक कंपनी आहे. 17 मे 2022 रोजी, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC चे शेअर्स लिस्ट झाले. देशातील सर्वात मोठा IPO सादर करणाऱ्या सार्वजनिक विमा कंपनीच्या शेअर्सची इश्यू किंमत 949 रुपये निश्चित करण्यात आली होती, परंतु त्याची लिस्टिंग 9 टक्क्यांच्या डिस्काउंट दराने 867.20 रुपये झाली. स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध होण्यास दीड वर्ष पूर्ण झाल्यानंतर, BSE आणि NSE या दोन्ही ठिकाणी LIC च्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली असल्याचे चित्र आहे.
गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांचा तोटा
संसदेत पीएम मोदींनी एलआयसीचे खूप कौतुक केले, त्याचा परिणाम आज एलआयसीच्या शेअर्सवरही दिसून आला. LIC चे शेअर्स 661 रुपयांपर्यंत वधारले. पण आजही त्याचे IPO गुंतवणूकदार सुमारे 30 टक्के तोट्यात आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही LIC IPO मध्ये 100 रुपये गुंतवले असतील, तर आजच्या तारखेला ते 70 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे. म्हणजेच, LIC मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लिस्ट झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 30 टक्क्यांचा तोटा झाला आहे. एलआयसीचा IPO ज्या दरावर बाजारात लिस्ट झाला, तो दर अजूनही गाठला गेला नाही. LIC शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून आतापर्यंत गुंतवणूकदारांचे सुमारे 2 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याचाच अर्थ पंतप्रधानांनी एलआयसी बाबत जो दावा केलाय, त्याचे प्रतिबिंब आकड्यांमध्ये तूर्तास उतरत नाही.
जून तिमाहीत निकालात बंपर फायदा
एलआयसीने यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाही निकालाबाबत गुरुवारी शेअर बाजाराला माहिती दिली. एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत मागील वर्षीच्या या कालावधीत एलआयसीच्या नफ्यात 1299 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एलआयसीचा नफा 9543 कोटी रुपये झाला आहे. मात्र, या नफ्यात एलआयसीने शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीवरील उत्पन्नांचा वाटा मोठा आहे. एलआयसीच्या विमा पॉलिसीच्या विक्रीत मात्र घट झाली आहे.
(Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)