LIC Q1 Results : जून तिमाहीत एलआयसीच्या निव्वळ नफ्यात 1299 टक्क्यांची वाढ, पण...
LIC Q1 Results : एलआयसीने यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर केले आहे. निव्वळ नफ्यात मोठी वाढ झाली असली तरी विमा पॉलिसी विक्रीत घट झाली आहे.
LIC Q1 Results : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी 'लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया'ने (LIC) यंदाच्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचे निकाल (LIC Q1 Results) जाहीर केले आहेत. एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात (LIC net Profit) 1299 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एलआयसीचा नफा 9543 कोटी रुपये झाला आहे. गुंतवणुकीवरील मिळालेल्या अधिक उत्पन्नामुळे कंपनीच्या नफ्यात ही वाढ दिसून आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 682 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता. 30 जूनपर्यंत सकल NPA 2.48 टक्के होता. मागील वर्षी याच कालावधीत 5.84 टक्के होता. कंपनीचा निव्वळ एनपीए मागील वर्षीप्रमाणेच शून्य राहिला आहे. मात्र, एलआयसीच्या पॉलिसी विक्रीत घट झाली आहे.
गुंतवणुकीवरील उत्पन्नात तेजी
एप्रिल-जून तिमाहीत देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचे गुंतवणूक उत्पन्न मागील वर्षीच्या 69,570 कोटी रुपयांवरून वाढून 90,309 कोटी रुपये झाले. या तिमाहीत विमा कंपनीचा पहिल्या वर्षाचा प्रीमियम 8.3 टक्क्यांनी घसरून रु. 6,810 कोटी झाला आहे. एक वर्षापूर्वी रु. 7,429 कोटी होता. निकालानंतरच्या पत्रकार परिषदेत, प्रीमियम उत्पन्नातील घट ही चिंतेची बाब असल्याचे एलआयसीचे सीईओ आणि एमडी सिद्धार्थ मोहंती यांनी म्हटले.
तिमाही निकाल कसा राहिला?
एलआयसीने शेअर बाजाराला (Share Market) सांगितले की, कंपनीचे एकूण उत्पन्न जूनच्या तिमाहीत रु. 1,88,749 कोटींवर पोहोचले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 1,68,881 कोटी होते. विमा कंपनीने जून तिमाहीत रु. 53,638 कोटी कमावले. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 50,258 कोटी रुपये होते.
निव्वळ प्रीमियम उत्पन्न 98,362 कोटी रुपये इतके नोंदवण्यात आले. मागील वर्षीच्या काळात 98,351 कोटी रुपये होते. कंपनीने भागधारकांच्या खात्यात निधीचे हस्तांतरण 799 कोटी रुपयांवरून 1.48 कोटी रुपयांवर घसरले. जून तिमाहीत नवीन व्यवसायाचे मूल्य (VNB) मागील वर्षी 1397 कोटी रुपयांच्या तुलनेत 1300 कोटी रुपये होते. पुढील काळात व्हीएनबी मार्जिन वाढेल, असा विश्वास मोहंती यांनी व्यक्त केला.
जूनच्या तिमाहीत वैयक्तिक विभागामध्ये एकूण 32.16 लाख पॉलिसी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी याच तिमाहीत 36.81 लाख पॉलिसी विकल्या गेल्या होत्या. ही बाब चिंतेची असल्याचे म्हटले जात आहे.
गुरुवारी, शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावला तेव्हा एलआयसीच्या शेअर दरात 0.36 टक्क्यांची घसरण होत 641.60 रुपयांवर स्थिरावला.