Tata Tech IPO : पैसे तयार ठेवा! Tata Tech आयपीओ प्रति शेअरची किंमत जाहीर; जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर
Tata Tech IPO Share Price : टाटा टेक्नोलॉजी आयपीओ बाजारात येण्यास काही दिवस शिल्लक आहेत. आज कंपनीकडून आयपीओतील प्रति शेेअर किंमत जारी केली आहे.
Tata Tech IPO Price band : तब्बल 20 वर्षांनंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ (Tata Group IPO) येणार आहे. Tata Technologies चा IPO 22 नोव्हेंबर 2024 रोजी उघडत आहे. तर गुंतवणूकदार 24 नोव्हेंबर 2024 पर्यंत सब्सक्राइब करू शकता. बाजारातील गुंतवणूकदार गेल्या अनेक दिवसांपासून टाटा समूहाच्या IPO ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. टाटा टेक्नोलॉजीकडून आयपीओतील प्रति शेअर किंमत जाहीर केली आहे.
TCS नंतर टाटा समूहातील टाटा टेक्नोलॉजी या कंपनीचा आयपीओ बाजारात येत आहे. जवळपास 20 वर्षानंतर टाटा समूहातील कंपनी बाजारात लिस्ट होणार आहे. कंपनीचा IPO हा 22 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे.
Tata Tech चा प्राईस बॅण्ड किती?
जवळपास दोन दशकांनंतर टाटा समूहाची कंपनी गुंतवणूकदारांना आयपीओद्वारे कमाई करण्याची संधी देणार आहे. अलीकडेच टाटा टेक IPO लाँच करण्याची तारीख जाहीर केल्यानंतर, आता त्याची प्रति शेअर किंमत देखील जाहीर करण्यात आली आहे. यासाठी कंपनीने 475-500 रुपये प्रति इक्विटी इतक शेअर दराचा पट्टा निश्चित केला आहे. हा शेअर बॅण्ड अनलिस्टेड मार्केटपेक्षा 47 टक्क्यांहून अधिक स्वस्त आहे. तिथे तो रु. 900 पेक्षा जास्त दराने ट्रेडिंग करत आहे.
6.08 कोटी शेअर्स विकले जाणार
Tata Technologies' IPO (Tata Tech IPO) पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित असेल. कंपनीचे प्रवर्तक आयपीओद्वारे त्यांचे स्टेक कमी करणार आहेत. या IPO द्वारे टाटा टेक्नॉलॉजीजचे एकूण 6.08 कोटी शेअर्स विकले जातील. यापूर्वी टाटा टेक्नॉलॉजीजने IPO द्वारे 9.57 कोटी रुपयांची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. या IPO मध्ये टाटा मोटर्स 4.62 कोटी शेअर्स, अल्फा TC 97.1 लाख शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48 लाख शेअर्स विकणार आहे.
30 शेअर्सचा एक लॉट
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, IPO अंतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 30 शेअर्सचा एक लॉट असणार आहे. गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान 15,000 रुपये गुंतवावे लागणार आहेत. गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकतो. एकीकडे कंपनीने प्राइस बँड जाहीर केला, तर दुसरीकडे टाटा टेकचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. गुरुवारी तो 198 रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होता. बुधवारी तो 275 रुपयांचा प्रीमियम होता.
कंपनी काय करते?
टाटा टेक ही टाटा मोटर्सची सब्सिडियरी कंपनी आहे. ही कंपनी अभियांत्रिकी सेवा तसेच तंत्रज्ञानावर आधारित सुविधा पुरवते. ही कंपनी एरोस्पेस, यंत्रसामग्री आणि वाहतुकीसाठी सेवा पुरवते. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर 2023 च्या आर्थिक वर्षात कंपनीची कमाई 25 टक्क्यांनी वाढून 4,418 कोटी रुपये झाली आहे. कंपनीचा नफा 708 कोटी रुपये होता, ज्यामध्ये सुमारे 63 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा)