GST Meeting : तुमचं खाणं पिणं महागणार; 18 जुलैपासून या पदार्थांवरील GSTत वाढ
GST On Food: खाद्यपदार्थांवर असलेली जीएसटी सवलत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही खाद्यपदार्थ महागणार आहेत.
GST : महागाईने आधीच खिसा रिकामा होत असताना आता दरवाढीची झळ आणखी तीव्र होणार आहे. जीएसटी परिषदेने काही वस्तूंवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेने काही वस्तूंवर असलेली कर सवलत पुन्हा मागे घेतली आहे. तर, काही वस्तूंवरील जीएसटी दरात वाढ केली आहे. ही नवीन करवाढ 18 जुलैपासून लागू होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिषदेच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, कॅसिनो, ऑनलाइन गेमिंग आणि घोड शर्यतीवरील कराचा प्रस्ताव पुनर्विचार करण्यासाठी मंत्रिगटाकडे पाठवण्यात आला आहे. गोव्याच्या अर्थमंत्र्यांनी कॅसिनोवरील जीएसटी दराबाबत चर्चा करण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या तीन गोष्टींवरील जीएसटीवर पुनर्विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वस्तूंवर लागणार कर
पाकिट बंद आणि लेबल असलेल्या (फ्रोजन वगळता) खाद्यपदार्थांवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. यामध्ये मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सोयाबीन, मटार आदी पदार्थांसह मुरमुरेंवर आता पाच टक्के जीएसटी लागू होणार आहे. आतापर्यंत हे पदार्थ जीएसटीबाहेर होते. त्याशिवाय, टेट्रा पॅक आणि बँकेकडून जारी करण्यात येणाऱ्या धनादेश सेवांवर 18 टक्के आणि एटलससह नकाशा आणि चार्टवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
बजेट हॉटेल आणि रुग्णालयातील खोल्यांच्या दरावरही जीएसटी लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत हॉटेलच्या प्रतिदिवस 1000 रुपये भाडे दर असणाऱ्या रुमसाठी जीएसटी लागू करण्यात आले नव्हते. आता, या खोल्यांसाठी 12 टक्के कर लागू करण्यात आला आहे. त्याशिवाय, रुग्णालयात रुग्णांसाठींच्या 5000 रुपयांहून अधिक शुल्क असलेल्या खोल्यांसाठी (आयसीयू वगळता) पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: