गौतम अदानी यांनी या वर्षी कमावली सर्वाधिक संपत्ती, Elon Musk आणि Jeff Bezos यांनाही टाकलं मागे
ब्लुमबर्गच्या (Bloomberg Billionaires Index) एका अहवालानुसार भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी एका वर्षात सर्वाधिक संपत्ती कमावली असून त्यांनी Elon Musk आणि Jeff Bezos यांनाही मागे टाकलंय.

Bloomberg : गेल्या वर्षी जगभरात कोरोनामुळे मंदी असतानाही भारतीय उद्योगपतींच्या संपत्तीत भरघोस वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. या वर्षी भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून एकाच वर्षात सर्वाधिक प्रमाणात संपत्तीमध्ये वाढ झालेल्या अब्जाधिशांच्या यादीत गौतम अदानी यांनी टेस्लाच्या इलॉन मस्क आणि अॅमेझॉनच्या जेफ बेजोस यांनाही मागे टाकलं आहे.
Bloomberg Billionaires Index च्या अहवालानुसार अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या संपत्तीत 16.2 बिलियन डॉलर्सवरुन वाढ होऊन ती 50 बिलियन डॉलर्सवर पोहचली आहे. अदानी यांच्या उद्योगाच्या शेअर्समध्ये या वर्षी तब्बल 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षापासून अदानी हे जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्या उद्योगाचा यशस्वी विस्तार करताना दिसत आहे.
अदानी यांनी संपत्ती वाढीच्या प्रमाणाच्या बाबतीत मुकेश अंबानी यांनाही मागे टाकलं आहे. अदानी यांच्या संपत्तीत या वर्षी जवळपास 1620 कोटी डॉलर्स इतकी वाढ झाली असून मुकेश अंबानींच्या संपत्तीत 810 कोटी डॉलर्सची वाढ झाली आहे. असं असलं तरी संपत्तीच्या बाबतील अदानी हे मुकेश अंबानींच्या खूप मागे आहेत. अदानी यांची संपत्ती पाच हजार कोटी इतकी आहे तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 8480 कोटी इतकी आहे. मुकेश अंबानी जागतिक अब्जाधिशांच्या यादीत दहाव्या स्थानी आहेत तर गौतम अदानी हे 26 व्या स्थानी आहेत.
Mukesh Ambani: रिलायन्सचे मुकेश अंबानी आता थेट इलॉन मस्कशी भिडणार...ऊर्जा क्षेत्रात भक्कम गुंतवणूक
दीघी बंदराचा विकास अदानी उद्योग समूहाकडे
भारतातील सर्वात मोठं कंन्टेनर पोर्ट असलेल्या JNPT ला पर्याय म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या दिघी बंदराचा विकास आता अदानी उद्योग समूह करणार आहे. उद्योगपती अदानींच्या मालकीच्या असलेल्या अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने 705 कोटी रुपये खर्च करुन दिघी बंदराची अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अदानी उद्योग समुहातर्फे दिघी बंदराच्या विकासासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. हे बंदर मुंबईतील JNPT ला पर्याय म्हणून विकसित करण्यात येत आहे.
दिघी बंदराचा विकास जागतिक स्तरावरचे दर्जेदार बंदर म्हणून करण्यासाठी तसेच मल्टी कार्गो बंदराच्या स्वरुपात विकास करण्यासाठी अदानी उद्योग समूह दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्याचसोबत या बंदराच्या पायाभूत सुविधा, रेल्वे आणि रस्ते यांचाही विकास करण्यात येणार आहे असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Dighi Port: दिघी बंदरात अदानी उद्योग समुहाची 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, बंदराचे अधिग्रहण पूर्ण























