Dighi Port: दिघी बंदरात अदानी उद्योग समुहाची 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, बंदराचे अधिग्रहण पूर्ण
अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने मंगळवारी सांगितलंय की कंपनीने 705 कोटी रुपयांत दिघी बंदराची अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण केली आहे.
मुंबई: भारतातील सर्वात मोठं कंन्टेनर पोर्ट असलेल्या JNPT ला पर्याय म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या दिघी बंदराचा विकास आता अदानी उद्योग समूह करणार आहे. उद्योगपती अदानींच्या मालकीच्या असलेल्या अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने 705 कोटी रुपये खर्च करुन दिघी बंदराची अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
अदानी उद्योग समुहातर्फे दिघी बंदराच्या विकासासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. हे बंदर मुंबईतील JNPT ला पर्याय म्हणून विकसित करण्यात येत आहे.
अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने मंगळवारी एक निवेदन जारी केलं आहे. त्यामध्ये सांगितलंय की कंपनीच्या वतीनं 15 फेब्रुवारी 2021 रोजी दिघी बंदराचे अधिग्रहन पूर्ण करण्यात आलं आहे. या बंदराच्या विकासामुळे भारताच्या जीडीपीत वाढ होणार असल्याचं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. या बंदराच्या विकासामुळे मुंबई- पुणे या औद्योगिक पट्ट्याचा विकास होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटी विरोधात संपाची ठिणगी, हजारो कामगार संपावर जाण्याच्या तयारीत
दिघी बंदराचा विकास जागतिक स्तरावरचे दर्जेदार बंदर म्हणून करण्यासाठी तसेच मल्टी कार्गो बंदराच्या स्वरुपात विकास करण्यासाठी अदानी उद्योग समूह दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्याचसोबत या बंदराच्या पायाभूत सुविधा, रेल्वे आणि रस्ते यांचाही विकास करण्यात येणार आहे असं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
या बंदरात ड्राय, कन्टेनर आणि लिक्विड कार्गोचा विकास करण्यात येणार आहे. तसेच या बंदराच्या विकासासाठी इतर उद्योग समुहांनाही आमंत्रण देण्यात येणार आहे. या बंदराचा विकास करण्याचे काम अदानी उद्योग समुहाला मिळाल्याने हा कंपनीसाठी गौरवाचा क्षण आहे असं अदानी पोर्ट्स अॅन्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) चे संचालक आणि सीईओ करण अदानी यांनी सांगितलंय.