Amul चं दूध, दही आणि लस्सी महागली, जाणून घ्या नव्या किंमती
Amul Price Hike: केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अमूल कंपनीने आपल्या प्रॉडक्ट्सच्या किंमतीमध्येही वाढ केली आहे.
Amul Price Hike July 2022 : केंद्र सरकारने खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये (GST) वाढ केली आहे. त्यामुळे अनेक वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या खांद्यावरील भार आणखी वाढला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर अमूल कंपनीने आपल्या प्रॉडक्ट्सच्या किंमतीमध्येही वाढ केली आहे. तुम्हीही अमूलचे दही, दूध अथवा अन्य कोणते प्रॉडक्ट्स घेत असाल तर जास्त किंमत द्यावी लागणार आहे.
केंद्र सरकारने पॅक्ड प्रॉडक्ट्सवर पाच टक्के जीएसटी लावला आहे, त्यानंतर अमूलनेही आपल्या प्रॉडक्ट्सच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. अमूल कंपनीने दूध, दही, चास आणि फ्लेवर्ड मिल्कसह इतर अनेक प्रॉडक्ट्सच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. कंपनीने 200 ग्राम वजनाच्या दह्याची किंमत 20 रुपयांवरुन 21 रुपये केली आहे. त्याशिवाय 170ml च्या लस्सीच्या पॅकेटची किंमत 10 रुपयांवरुन 11 रुपये करण्यात आली आहे.
1 किलो अमूल दही पॅकेटची किंमत किती?
200 ग्राम दही पॅकेटची किंमत 40 रुपयांवरुन 42 रुपये करण्यात आली आहे. अमूल दह्याच्या 30 रुपयांच्या पॅकेटची किंमत 32 रुपये केली आहे. एक किलो दह्याच्या पॅकेटची किंमत चार रुपयांनी वाढवली आहे. 65 रुपयांचं एक किलो दह्याचं पॅकेट आता 69 रुपयांना मिळेल. फ्लेवर्ड मिल्कच्या किंमतीमध्ये अमूल कंपनीने दोन रुपयांनी वाढ केली आहे. 20 रुपयांचं पॅकेट आता 22 रुपयांना मिळणार आहे.
जगायचे कसे?
जीएसच्या नव्या दरांमुळे सर्वसामान्यांचं जगणं महागणार आहे. गॅस सिलिंडरच्या आडून स्वयंपाकघरात भडकलेली महागाई आता जीएसटीच्या रूपात सर्वसामान्यांना रडवणार आहे. सरकारी तिजोरीतील खडखडाट दूर करण्यासाठी मोदी सरकारने आतापर्यंत करमुक्त राहिलेल्या अनेक जीवनावश्यक वस्तूंना जीएसटीच्या कक्षेत आणलंय. त्यामुळे पॅकिंग केलेलं धान्य, दही, लस्सी, पनीर यासारखे दुग्धजन्य पदार्थ महागणार आहेत. यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे. रुग्णालयातील उपचारही महाग होणार आहेत. रुग्णालयाने पाच हजार रुपयांपेक्षा अधिक दराने खोली उपलब्ध करून दिल्यास त्या खोलीवर पाच टक्के दराने जीएसटी द्यावा यापुढे लागेल. तर हॉटेलच्या रूमभाडय़ावर 12 टक्के तर एलईडी लाईट्सवर 18 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे. महागाईचे दररोज चटके बसू लागल्यामुळे आता जगायचे कसे? असा प्रश्न देशातील जनतेतून उपस्थित केला जात आहे.