Amazon Layoff : ॲमेझॉन कंपनीमधील सर्वात मोठी नोकरकपात, 10,000 कर्मचाऱ्यांना हटवणार
Amazon Lay Off : ॲमेझॉन कंपनी 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून हटवणार आहे. या आठवड्यापासून याची प्रक्रिया सुरु होईल.
Amazon Layoffs 2022 : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स आणि रिटेल कंपनी ॲमेझॉन 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ॲमेझॉन सर्वात मोठी नोकरकपात करणार आहे. आधी मायक्रोसॉफ्ट ( Microsoft ), नंतर ट्विटर ( Twitter ) आणि त्यानंतर फेसबुकची ( Facebook ) मालकी असलेली मेटा ( Meta ) या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून हटवलं आहे. या कंपन्यांकडून अचानक झालेल्या नोकरकपातीमुळे सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर आता ॲमेझॉनही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यापासून कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात येईल.
सुत्रांच्या माहितीनुसार, ॲमेझॉन कंपनीला ( Amazon.com Inc ) नुकसान सहन करावं लागतं आहे. ॲमेझॉन कंपनीच्या विक्रीमध्ये घट झाली आहे, त्यामुळे कंपनी खर्च करण्याच्या तयारीत आहे. अनेक कंपन्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक बड्या कंपन्यांनी नोकरकपात करत कंपनीचा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
एक टक्के कर्मचाऱ्यांना हटवणार
31 डिसेंबर 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार ॲमेझॉन कंपनीमध्ये सुमारे 16,08,000 कर्मचारी आहेत. यामधून कंपनी एक टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. कंपनीने 10 हजार कर्मचारी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी नोकरकपात असणार आहे. ॲमेझॉन कंपनी जगभरात 1.6 मिलियन लोकांना रोजगार देते.
जागतिक बाजारात मंदीचं सावट
आंतरराष्ट्रीय बाजारात आर्थिक मंदीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेत चढउतार पाहायला मिळत आहे. अमेरिका, युरोप या देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशातील अनेक कंपन्या सध्या तोट्यात आहेत. त्यामुळे कंपन्या आपला खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
खर्च कमी करण्यासाठी नोकरकपातीचा निर्णय
खर्च कमी करण्यासाठी ॲमेझॉन आपल्या कामांसाठी रोबोट्सचा वापर वाढवत आहे. सध्या, Amazon द्वारे डिलीवरी करण्यात येणाऱ्या पॅकेजपैकी सुमारे 3/4 पॅकेजिंग रोबोटिक सिस्टिममधून करण्यात येतात. याबाबत Amazon रोबोटिक्सचे प्रमुख Tye Brady यांनी सांगितलंय की, पुढील पाच वर्षांत पॅकेजिंगमध्ये 100 टक्के रोबोटिक प्रणाली वापरण्यात येऊ शकते. हे रोबोट्स कर्मचाऱ्यांची जागा किती घेतील. कामात नक्कीच बदल होईल, पण माणसाची गरज मात्र कायम राहील, असंही ते म्हणाले आहेत.