गेल्यावर्षी, 2019 मध्ये डिसेंबर महिन्यात चीन येथील वुहान शहरात पहिल्यांदा कोरोनाचा व्हायरस सापडल्याची घटना घडली होती. त्यानंतर जगभरात या व्हायरसने कसा धुमाकूळ घातला हे आता नव्याने सांगायला नको. भारतात विशेष करून मुंबई शहरामध्ये किमान हळूहळू गोष्टी पूर्वपदावर येत होत्या. आरोग्य यंत्रणेने कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होत होतो. त्यातच यावर्षी 2020 वर्ष सरत असताना यूरोपसह ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवीन प्रजाती सापडल्याचे समोर आले आहे. त्याचा प्रसार ही वेगाने होत असल्याचे वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर ब्रिटनने लॉकडाउन जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे याची गंभीर दखल घेत राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 5 जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनेही ब्रिटनवरून येणाऱ्या विमानांना काही काळापर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या तात्काळ घेतलेल्या प्रतिबंधात्मक पावलांमुळे या नवीन विषाणूला आळा घालण्यास निश्चित मदत होणार आहे. या नवीन विषाणूंच्या प्रजातीचे नाव (बी. 1. 1. 7) असे आहे. या प्रकारामुळे घाबरण्याची गरज नसली तरी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
सगळं काही चांगलं होत असताना या नवीन प्रजातींमुळे पुन्हा एकदा देशासह राज्यातील आरोग्य व्यवस्था कामाला लागली आहे, ती अगोदरपासून तैनात होतीच. मात्र, आता नव्याने पुन्हा या विषाणूच्या विरोधात काम करण्यात सज्ज झालेली आहे. अर्थात या विषाणूचा अजूनतरी भारतात शिरकाव झाल्याचे कोणतेही पुरावे किंवा कुणी रुग्ण सापडलेला नाही. मात्र, मागच्या वेळी आंतराष्ट्रीय प्रवाशांना तात्काळ अटकाव करण्यात किंवा त्यांची तपासणी करण्यात जी दिरंगाई झाली होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यामुळे यावेळी कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेण्यात तज्ञांच्या समितीती घेण्यात आला आहे. या सगळ्या प्रकारच्या घडामोडींवर मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. त्यांनी ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल. त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे सांगितले.
तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश यावेळी दिले. संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून 14 दिवस संस्थात्मक क्वॉरंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वॉरंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वॉरंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वॉरंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
याप्रकरणी, राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी सांगतात कि, "ब्रिटन आणि युरोपमध्ये जो नवीन विषाणू सापडला आहे त्याची तीव्रता अधिक प्रमाणात आहे. सध्याचा जो कोरोनाचा विषाणू होता त्याचा प्रादुर्भाव होण्यास 5 ते 7 दिवसांचा कालावधी लागत होता. मात्र, या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव 12 ते 24 तासांत होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, राज्य सरकाने जी प्रतिबंधात्मक पावलं उचलली आहेत ती खारोहरच स्वागतार्हच आहे. आता टास्क फोर्सची बैठक सुरूच आहे. सध्या तरी उपचार पद्धतीत काही बदल नाही. मात्र, परत परिस्थिती पाहून यावर आढावा बैठक घेण्यात येईल आणि वाटल्यास नवीन सूचना देण्यात येतील."
तर पुणे येथील श्वसन विकार तज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी, यांच्या मते, "हा नवीन विषाणूच्या प्रजातीचा प्रकार याकडे आपल्याकडे सध्या तरी माध्यमातील माहिती असण्यापलीकडे काही उपलब्ध नाही. आपल्याकडे सध्या असणाऱ्या कोरोनाच्या विषाणूच्या विरोधात उपचारपद्धती विकसित झाली आहे. त्याचा रुग्णांना चांगला फायदा होत आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या विषाणूबद्दल अजून काही अधिक माहिती मिळालेही नाही. नागरिकांनी जराही घाबरण्याची गरज नाही. मात्र, शासनाने आखून दिलेले सुरक्षिततेचे नियमांचे काटेकोरपणे पालन केले पहिजे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात साबणाने किंवा सॅनिटायझरने धूत राहणे, या त्रिसूचीची अंमलबजावणी सगळ्यांनी केली पाहिजे. त्याचप्रमाणे विनाकरण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे."
डिसेंबर 12ला 'यंदाचा थर्टी फर्स्ट साधेपणाने!' या विषयवार सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, कोरोनाची लाट ओसरतेय, प्रादुर्भावाचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, कोरोना नष्ट झालेला नाही. अजूनही राज्यात दररोज हजारोंच्या घरात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. या आजाराने दररोज मृत्यू होतच आहे. या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर आजही कोरोनाचे संकट टळेलेलं नाही. आजही या संसर्गजन्य आजाराची टांगती तलवार लटकलेली आहेच. प्रशासन सगळ्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून वेळेच्या-वेळी आढावा बैठक घेत आहे. गेल्या काही दिवसात अजूनही कोणते मोठे निर्णय घेतले नसले तरी मुंबईची लाईफ लाईन मानली जाणारी लोकल सेवा नवीन वर्षात सुरु होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहे. सध्या नियमाप्रमाणे एका ठिकाणी 50 हुन अधिक नागरिकांना जमण्यास मनाई आहे. प्रशासन कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अनेकांना थर्टी फर्स्ट म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे वेध लागले आहे, मात्र, कोरोनाचा हा काळ पाहता गेले वर्षभर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वच सण-सोहळे नागरिकांनी साधेपणाने साजरे केले, त्यामुळे यंदाचा थर्टी फर्स्ट साधेपणाने साजरा व्हावा याबाबत अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका प्रशासन या संदर्भात काही नवीन नियमावली आणायची का? यासंदर्भात 20 डिसेंबरनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या नवीन विषाणूच्या प्रजतीचा रुग्ण अद्याप तरी आपल्याकडे नसला तरी तो आपल्याकडे येणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सगळी उपाययोजना करण्यात येत आहे. अनेक नागरिक आजही मोठ्या प्रमाणात सुरक्षिततेचे नियम पळत नाही, त्यामुळे त्यांनी वेळेतच आपल्या वर्तनात बदल करणे गरजेचे आहे. कारण अशा या आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात नागरिकांच्या सकारात्मक सहभागाशिवाय या आजराविरोधात लढणे शक्य नाही. शासन आणि प्रश्न त्याचे काम करेल मात्र नागरिक म्हणून आपल्याला समाजहिताच्या दृष्टितने काही भूमिका पार पाडावी लागणार आहे. विशेष म्हणजे आपल्याकडे ज्या लशी विकसित झाल्या आहेत आणि त्या लवकरच बाजारात येण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे. त्या लशी या नवीन विषाणूच्या विरोधात किती परिणामकारक ठरतात यावर येत्या काळात तज्ञ आपले मत व्यक्त करतीलच. मात्र, तोपर्यंत सगळ्यांनी सावधगिरीने आपला वावर ठेवला पाहिजे.
संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग
- BLOG | 'टेक केअर' पासून 'RIP' पर्यंत...!
- BLOG | कोरोनाचे आकडे बोलतात तेव्हा...
- BLOG | फिजिओथेरपीचं योगदान महत्वाचं!
- BLOG | 'डेक्सामेथासोन'!
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | कोरोना, टोळधाड अन् चक्रीवादळ कसं जगायचं!
- BLOG | खासगी रुग्णालयाचं 'हे' वागणं बरं नव्हं
- BLOG | रुग्णसंख्या आवरणार कशी?
- BLOG | रोगाशी लढायचंय, आकडेवारीशी नाही !
- BLOG | 'ती' पण माणसूच आहे
- BLOG | पुण्याची तब्बेत सुधारतेय, पण..
- BLOG | सावधान! मेनूकार्ड बघण्यापूर्वी इथे लक्ष द्या
- BLOG | बेफिकिरी नको, धोका टळळेला नाही...!
- BLOG | अरे, राज्यात कोरोना आहे!
- BLOG | आला थंडीचा महिना, मला लागलाय खोकला!
- BLOG | ये तो होनाही था!
- BLOG | कोरोनाचा सिक्वेल येणार
- BLOG | गुड न्युज! प्रतीक्षा संपली
- BLOG | 2021 : लसीकरणाच्या नावानं चांगभलं!
- BLOG | मृत्यूदर कमी होतोय!