एक्स्प्लोर
Advertisement
जळगाव भाजपमधील राडा : हा 'राग' नेमका कुणाचा आणि कुणावर...!
इथं अगदी विरोधक जरी असला तरी वैयक्तिक संबंध अत्यंत घनिष्ट असल्याची कित्येकतरी उदाहरणं देता येतील. मात्र पुरोगामी समजल्या जाणाऱ्या याच महाराष्ट्रात तेही साने गुरुजींच्या गावात महाराष्ट्राच्या तथाकथित 'सुसंस्कृत' राजकारणाला काळिमा फासणारी घटना घडली.
काही दिवसांपूर्वी उत्तरप्रदेशातील भाजपच्या एका कार्यक्रमात भाजपच्या एका खासदाराने तिथल्या आमदाराला बुटाने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेरा बूथ, सबसे मजबूत'च्या मोहिमेला छेद घालत उत्तरप्रदेशात भाजप खासदारांनी भाजपच्याच आमदाराला बुटाने कानफाडत 'मेरा बुट सबसे मजबूत' असल्याचे दाखवून दिले होते.
राजकारणात अशा मारामारीच्या घटना आजवर उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून जास्त ऐकायला मिळायच्या. महाराष्ट्रात मात्र अशी परंपरा नव्हती. एव्हाना इथं अगदी कट्टर राजकीय विरोधक जरी असला तरी वैयक्तिक संबंध अत्यंत घनिष्ट असल्याची कित्येकतरी उदाहरणं देता येतील. मात्र पुरोगामी समजल्या जाणाऱ्या याच महाराष्ट्रात तेही साने गुरुजींच्या गावात महाराष्ट्राच्या तथाकथित 'सुसंस्कृत' राजकारणाला काळिमा फासणारी घटना घडली.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या भाजप मेळाव्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि समर्थकांनी पक्षाचे माजी आमदार बी एस पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विशेष म्हणजे यावेळी मंचावर राज्य सरकारचे 'संकटमोचक' मुख्यमंत्र्यांचे विश्वासू असलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील देखील उपस्थित होते. त्यांच्यासमोर हा तुफान राडा झाला, त्यांनी त्यांच्या 'ताकतीने' हा राडा थांबविण्याचा अतोनात प्रयत्न केला, मात्र राडा काही थांबला नाही.
का झाला हा गोंधळ? काय आहे इतिहास?
व्हिडीओत दिसतंय त्याप्रमाणे यात मारहाण झालेले भाजपचेच माजी आमदार पाटील आणि मारहाण करत असताना दिसत असलेले उदय वाघ हे एकाच गावचे. भाजप जिल्हाध्यक्ष असलेले उदय वाघ हे आमदार स्मिता वाघ यांचे पती आहेत. जळगाव लोकसभेचे खासदार ए.टी नाना पाटील यांचा पत्ता कट झाल्यावर अगदीच अनपेक्षितपणे स्मिता वाघ यांच्या नावाची घोषणा झाली. जिल्हाध्यक्ष उदय वाघ बर्याच वर्षांपासून खासदारकीची स्वप्न पाहत होते. मात्र ऐनवेळी त्यांच्याऐवजी पत्नी स्मिता वाघ यांना पक्षाने उमदेवारी दिली. स्वतःला नाही पण घरात का असेना पण खासदारकीचा योग चालून आलाय हे पाहून ते निश्चितच खुश झाले असावेत. दुसरीकडे जलसंपदामंत्री गिरीश महाजनांची इच्छा डावलून वाघांनी तिकिट आणणे हा त्यांचा पक्षांतर्गत मोठा विजयच होता.
स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर होताच अनेकांनी गुपितपणे तर अनेकांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली. यात उघडपणे नाराजी बोलून दाखवणारी एक व्यक्ती म्हणजे माजी आमदार बी.एस.पाटील.
दहा ते बारा दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याच्या सभेत डॉ.बी.एस.पाटील यांनी वाघ दाम्पत्याबाबत काही विधानं केली होती. यातील भाषा काहीशी असंसदीय होती, असे वाघांचे म्हणणे आहे. त्यात पाटलांचे एकनाथ खडसे यांच्याविषयीचे प्रेम उफाळून आले होते. संधीसाधू असलेल्या वाघ दाम्पत्याने गरजेपुरता नाथाभाऊंचा वापर केला असा त्यांच्या एकूण भाषणाचा अन्वयार्थ होता. मात्र जी भाषा वापरली ती निश्चितच असंसदीय होती. वास्तविक डॉ.पाटील हे अमळनेरमध्येच राहतात. त्यांचे वक्तव्य गंभीर असेल तर त्याचे पडसाद लगेचच उमटणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही.
VIDEO | कोणत्या विधानामुळे झाला जळगाव भाजप मेळाव्यात राडा? | एबीपी माझा
नंतर काही खलबते झाली आणि स्मिता वाघांचे नाव कापत अचानक चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. इथून वाघांच्या नाराजीचा अध्याय सुरु झाला. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द होण्यामागे बी एस पाटील यांचा हात असल्याचा संशय उदय वाघ यांच्या मनात होताच. त्यातच त्यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी केलेल्या 'त्या' भाषणाचा राग मनात ठासून भरला होता. हा राग किती होता ते व्हिडीओ पाहून लक्षात येतंय.
VIDEO | माजी आमदार बी.एस.पाटील यांना भाजप मेळाव्यात मारहाण | जळगाव | एबीपी माझा
असो, या मारहाणीच्या घटनेनंतर सोशल मीडियात जोरदार ट्रोलिंग सुरु आहे. अर्थातच हे ट्रोलिंग होणार हे निश्चित होतंच. कारण उत्तर प्रदेशातील व्हिडीओ जर देशभर व्हायरल होत असेल तर राज्यातील या घटनेची 'दखल' घेणारच होते. या राड्यानंतर एकनाथ खडसे आणि अनिल गोटे यांचा हातात हात देऊन हसतानाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट होत आहे. सोबतीलाच या राड्यामुळे सर्वात जास्त आनंदी कोण असतील तर ते म्हणजे नाथाभाऊ, अनिल आण्णा आणि एटी नाना अशा पोस्ट देखील फिरू लागल्या होत्या. या तिघांसोबत घडलेला इतिहास तर सर्वांसमक्ष आहेच. तिघेही पक्षनिष्ठ मात्र पक्षाकडून दुखावले गेलेले. गिरीश महाजनांशी यांच्या 'मधुर' संबंधांबद्दल देखील नेहमी बातम्या येत असतातच.
लाखोंचे मोर्चे हँडल करणारे 'भाऊ' कुठे कमी पडले?
बाकी यात विशेष विचार करण्याजोगी गोष्ट म्हणजे दोन डॅशिंग मंत्री मंचावर असताना ही हाणामारी झाली. ज्या 'संकटमोचक' गिरीश महाजनांच्या बुद्धीकौशल्याच्या 'ताकती'वर विश्वास ठेवून राज्याचे मुख्यमंत्री राज्यभरातले लाखोंचे मोर्चे हँडल करायला विश्वासाने पाठवतात त्या महाजनांना आपल्या घरातला वाद सोडवण्याची ताकत नसावी हा विरोधाभास पटण्याजोगा नाहीये किंवा पचत नाहीये. राज्याचे हे कथित संकटमोचक स्वतःच्या घरातच संकटात आहेत, अशी स्थिती आहे.
असो, यात खरा फटका बसणार आहे तो म्हणजे ऐनवेळी लोकसभेची उमेदवारी गळ्यात आलेले उन्मेष पाटलांना. चाळीसगावपुरता मर्यादित जनसंपर्क असलेल्या उन्मेष पाटलांना जिल्ह्यात पक्षाच्या ताकतीवर निवडून येऊ असा विश्वास आहे. मात्र या अंतर्गत धुसफुशी अशा चव्हाट्यावर आल्याने ते खऱ्या अर्थाने अडचणीत आले आहेत. याचा फायदा विरोधी उमेदवाराला होण्याची शक्यता याक्षणी तरी नाकारता येण्याजोगी नाही. तरीही गिरीश महाजन यांनी जळगावचा उमेदवार लाखोंच्या मताधिक्यांनी निवडून येईल असा विश्वास आहे.
असो, या नव्या 'जळगाव पॅटर्न'चा बोलबाला आता देशभरात झालाय हे मात्र नक्की.
VIDEO | अमळनेरमध्ये भाजप मेळाव्यात तुफान राडा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र
Advertisement