(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG: राहुल गांधींनी मोदी, शाहांकडून राजकारण शिकावे
BLOG: काँग्रेसला 100 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. अनेक वर्षे काँग्रेसने जवळ जवळ सर्व राज्यांसहित देशावर अनेक वर्षे राज्य केले. पण 2014 नंतर काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. काँग्रेसची केंद्रातील सत्ता तर गेलीच देशातील अनेक राज्यांमध्येही काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. सत्ता नसल्याने काँग्रेस नेते पूर्णपणे सैरभैर झाले असून काय करावे हेच त्यांना कळेनासे झाले आहे की काय असा प्रश्न मनात येतो. काँग्रेस अशा कठिण परिस्थितीत असताना खरे तर काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी काँग्रेसला पुन्हा उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे पण तसे काही होताना दिसत नाही. काही राज्यातील काँग्रेस नेते बलिष्ठ आहेत पण केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी त्यांचा तसा काही उपयोग होताना दिसत नाही. कांग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाच्या राजकारणात तेवढी दखल देत नाहीत. त्यामुळे सगळा भार राहुल गांधींवर पडला आहे. पण राहुल गांधींचे एकूणच वागणे पाहाता त्यांना काँग्रेसला खरोखर उर्जितावस्थेत आणायचे आहे की नाही असा प्रश्न पडू लागला आहे.
या वर्षी सात राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने सातही राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या राज्यांकडे लक्ष ठेऊन असून नरेंद्र मोदी दौरे करून निवडणुका होणाऱ्या राज्यांमध्ये भाजपचा प्रचार करू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशसह सर्व राज्ये पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये अडकल्या असून त्या तेथे प्रचार करू लागल्या आहेत. काही काळासाठी त्या गोव्यातही गेल्या होत्या. पण राहुल गांधींचे काय? पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये दुफळी माजली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला. भाजपाशी हातमिळवणी केली आणि आता काही काँग्रेस नेते अमरिंदर यांच्यासोबत जाऊ लागलेत. मुख्यमंत्री चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांच्यात पटत नाही. आपनेही पंजाबमध्ये सत्ता काबिज करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. पण काँग्रेस सत्ता घालवण्याच्या मागे आहे का काय असा प्रश्न पडतोय. 3 जानेवारी रोजी पंजाबमध्ये राहुल गांधीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेने राहुल गांधी पंजाबात निवडणुकीचा शंखनाद फुंकणार होते. सभेचे ठिकाण आणि त्यासाठी सर्व तयारी पंजाब काँग्रेसमधील नेत्य़ांनी सुरु केली. पण अचानक कळले की राहुल गांधी इटलीला रवाना झाले. त्यामुळे पंजाब काँग्रेसला राहुल गांधींची पहिली सभा रद्द करावी लागली. ते नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी इटलीला गेल्याचे म्हटले जाऊ लागले. दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी ही बाब नाकारत ते कामासाठी इटलीला गेल्याचे स्पष्ट केले. पण त्यावर कोणाचाही विश्वास नाही. 3 जानेवारी रोजी होणारी रँली आता 15 किंवा 16 जानेवारीला आयोजित केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 जानेवारीला पंजाबमध्ये निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहेत.
राहुल गांधींच्या अशा वागण्यामुळे पंजाबमध्ये काँग्रेसला मोठे नुकसान होईल असे म्हटले जात आहे. जर सभा झाली असती तर मुख्यमंत्री चन्नी, प्रदेश अध्यक्ष नवज्योत सिद्धू एका मंचावर आले असते आणि काँग्रेसमध्ये एकी असल्याचे चित्र दिसले असते. तिकीट वाटपावरही याचा चांगला परिणाम झाला असता. कारण राहुल गांधी पंजाबमध्ये आल्यानंतर तिकिट वाटपासाठी बैठकही होणार होती. पण आता काय होईल ते सांगता येत नाही असे काँग्रेस नेतेच म्हणतायत. उद्या जर निवडणुक आयोगाने कोरोनामुळे रॅली, सभांवर बंदी घातली तर राहुल गांधींच्या सभा होणे कठिण होणार आहे.
बरं ऐन निवडणुका रणधुमाळीच्या काळात परदेशात जाण्याची राहुल गांधींची ही काही पहिली वेळ नाही. 2019 मध्ये जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हाही राहुल गांधी याच काळात इटलीला गेले होते. काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती पण अंतिम निर्णयासाठी राहुल गांधी परत येईपर्यंत काँग्रेस नेत्यांना थांबावे लागले होते. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यास वेळ झाला अशी माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली होती.
गेल्या वर्षी ऐन काँग्रेस स्थापना दिनाच्या अगोदर सोनिया गांधी आणि राहुल गांधी परदेशात गेले होते. दोन वर्षांपूर्वी जेव्हा सीएएविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलन सुरु केले, तेव्हा नेमके आंदोलनाच्या वेळेसच राहुल गांधी सर्व सोडून दक्षिण कोरियाला गेले होते. राहुल गांधी राजकारणापेक्षा वैयक्तिक कामे आणि मनमानी पद्धतीने जगण्याकडे जास्त लक्ष देतात त्यामुळेच नवीन वर्ष असो की वाढदिवस राहुल गांधी परदेशात जातात. ते कोणाचही पर्वा करीत नाहीत आणि त्यांना जे योग्य वाटते तेच करतात. त्यांच्या अशा वागण्यामुळे पक्षाचे नुकसान झाले तरी त्याक़डे ते लक्ष देत नाहीत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2019 मध्ये संसदेत एका विधेयकावर बोलताना राहुल गांधी यांनी एसपीजीला न कळवता 2015 ते 2019 या कालावधीत परदेशात 247 वेळा प्रवास केला. एसपीजीची सुरक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठेही जायचे असेल तर एसपीजीला सांगावे लागते. पण एसपीजीला न सांगता राहुल गांधींनी 2015 ते 2019 या काळात 247 वेळा परदेश प्रवास केला. याशिवाय एसपीजीला सांगून त्यांनी किती वेळा परदेश प्रवास केला याची काही माहिती उपलब्ध झालेली नाही.
दुसरीकडे भाजपचे सर्व नेते दिवसाचे 24 तास वर्षाचे 12 महिने निवडणुकीच्या मोडमध्ये असतात आणि तन, मन धनाने निवडणुकीची तयारी करीत असतात. निवडणुका जरी पाच वर्षांनी होत असल्या तरी भाजप पहिल्या दिवसापासून निवडणुकीची तयारी सुरु करतो. 2014 ला जिंकल्यानंतर भाजपने लगेचच 2019 ची तयारी सुरु केली होती. तर, 2019 ला जिंकल्य़ानंतर त्यांनी 2024 ची तयारी सुरु केली. त्यामुळे दुसरे पक्ष निवडणुकीची तयारी सुरु करतात तेव्हा भाजप त्यांच्या अनेक पावले पुढे गेलेला असतो.
काँग्रेसला जर पुन्हा वैभव मिळवून द्यायचे असेल तर राहुल गांधी यांना 24 तास राजकारणाचा विचार करणे आवश्यक आहे. केवळ सोनेरी इतिहासावर अवलंबून सत्ता मिळवणे आज कठिण आहे. राजकारण हा पार्टटाईम किंवा फावल्या वेळेत करण्याचे काम नाही हे त्यांना कोणीतरी समजावून सांगावयास हवे एवढेच यानिमित्ताने म्हणावेसे वाटते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha