BlOG | आरोग्याची आणीबाणी?
आज 22 मार्च, गेल्यावर्षी ह्याच दिवशी पहिला जनता कर्फ्यू देशात घोषित केले गेला होता. तेव्हा कोरोनाची नुकतीच सुरवात झाली होती. या आजाराचे गांभीर्य नागरिकांना कळावे म्हणून हा कर्फ्यू लावण्यात आला होता. त्यावेळी ,महाराष्ट्रात एकूण 74 रुग्ण होते आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र बरोबर वर्षभरानंतर या आजराची परिस्थिती बघितली तर अधिकच वाताहत झालेली पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून कोरोनाबाधितांचे आकडे रोज नवीन उचांक गाठत आहेत. रविवारी एका दिवसात 30 हजाराचा आकडा पार केला, 30 हजार 535 रुग्ण आणि सोबत 99 रुग्णांचा मृत्यू, ह्या आकडेवारीमुळे राज्यातील आरोग्याची व्यव्यस्था अधिकच दयनीय आणि बिकट झाली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव जोरदार राज्यभर होत आहे. रुग्ण उपचार घेण्याकरता रुग्णलयात भरती होत आहेत, त्यांच्या संपर्कातील लोकांचे अलगीकरण आणि विलगीकरण केले जात आहे. सरकारी आणि खासगी आरोग्याची यंत्रणा दिवस-रात्र काम करत आहेत. लस आली आहे, आता काही होणार नाही या बेफिकरीमुळे बऱ्याच नागरिकांनी नियम धाब्यावर बसविले. गेल्या काही दिवसातील बेफिकिरीचे परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. गर्दी करू नका असे कटाक्षाने सांगितले असले तरी राज्यातील विविध भागात विविध कारणांमुळे गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी या आजारावरील निश्चित उपचारपद्धती डॉक्टरांना माहित नव्हती आज मात्र डॉक्टरांना उपचारपद्धती विकसित करण्यात चांगले यश आले आहे. या आजराने ग्रासलेल्या व्यक्तीवरील कोणत्या टप्प्यात कोणते उपचार द्यायचे, कशा पद्धतीने द्यायचे याचा दांडगा अनुभव सध्या डॉक्टरांना आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण या आजाराने बाधित झाले तरी मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेऊन घरी जात आहेत. त्याशिवाय या आजराच्या विरोधातील रामबाण लस आपल्याकडे सध्या आहे. 20 मार्च पर्यंत राज्यातील 43 लाखापेक्षा अधिक नागरिकांना लसीचा डोस देण्यात आला आहे. ही जरी सध्याच्या काळातील जमेची बाजू असली तरी मोठ्या प्रमाणात या आजराचे रोज हजारोच्या संख्येने नवीन रुग्ण निर्माण होणे ही धोक्याची घंटा आहे. या वाढत्या रुग्णसंख्येला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे नाहीतर पुन्हा एकदा पूर्वीसारखी राज्यात परिस्थिती निर्माण होऊन बेड्स मिळण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येत्या काळात कोरोनाच्या अनुषंगाने काय वाढून ठेवले आहे, त्याचे भाकीत आताच वर्तविता येणार नाही. कोरोनाने आपले रौद्र रूप धारण केले असून, अनेक नागरिकांना त्याने आपले कवेत सामावून घेण्यास सुरुवात केली आहे. एक रुग्ण बरा होण्याकरिता सर्वसाधारण 14 दिवस लागतात, त्यामुळे जे अॅक्टिव्ह रुग्ण आहे ते बरे होण्यासाठी बराच काळ लागणार आहे. सध्या राज्यात 2 लाख 10 हजार 120 रुग्ण अॅक्टिव्ह असून विविध ठिकाणी ते उपचार घेत आहेत.
विशेष म्हणजे संपूर्ण देशातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 60-65 % रुग्ण हे महाराष्ट्रातील आहे. या वरून राज्यात या आजराचा संसर्ग किती अधिक आहे हे स्पष्ट होते. या आजराचा संसर्ग राज्यात ज्या शहरात जास्त आहे त्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश आहे. राज्यातील प्रशासन या संसर्गाला आला घळण्याकरिता शक्यतो सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत. राज्याच्या काही भागात अंशतः लॉक डाउन, नाईट कर्फ्यू , शनिवार आणि रविवार संचारबंदी, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणत टेस्टिंग असे विविध उपाय योजना प्रशासन करताना दिसत आहे. मात्र तरीही रुग्णसंख्या वाढत चालली आहे. नागरिकांनी सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले पाहिजे, अशी ओरड, विनंती, आवाहन होत असताना अनेक नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दिवसागणिक परिस्थिती गंभीर होत असताना या या वाढत्या संसर्गाला आळा घालायचा तरी कसा? हा प्रश्न सध्या प्रशासकीय यंत्रणेला भेडसावत आहेत.
पुणे येथील केईएम रुग्णालयातील श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. स्वप्नील कुलकर्णी सांगतात की," सध्या ही रुग्णसंख्या का वाढत याचे कारण माहित नसले तरी नागरिकांची सुरक्षिततेच्या नियमाबद्दलची बदललेली मानसिकता, आणि विषाणूचे जनुकीय बदल ही करणे असण्याची शक्यता अधिक दाट आहे. ह्या आजाराच्या वाढत्या प्रसाराला थांबविण्याकरिता लसीकरणाची व्याप्ती वाढविली पाहिजे आणि ते गतिमान पद्धतीने करणे गरजेचे आहे. तरुण नागरिकांचा लसीकरणात सहभाग करून घेतला पाहिजे. लसीकरणासाठी असेल्याल्या अटी शिथिल केल्या पाहिजे आणि सगळ्या सरकारी- खासगी रुग्णालये आणि जनरल प्रॅक्टिशनरांना लसीकरण मोहिमेत सहभागी करण्यात आले पाहिजे. त्याचप्रमणे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, लसीकरणाच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरणासाठी पुढे आले पाहिजे. या आजाराला लांब ठेवण्याकरिता लस सुरक्षित आहे, त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टंसिंग मुळे ह्या आजरापासून दूर राहू शकतो. कोरोना हा असा आजार नाही तो तात्काळ संपुष्ठात येईल त्यामुळे जर कुणा पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तर नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेतली पाहिजे."
ऑक्टोबर 7, 2020, ' धोका टळलेला नाही ! ' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे, रुग्णसंख्येचा चढता आलेख उतरणीला लागला आहे. हे वास्तव असले तरी धोका मात्र अजिबात टळलेला नाही. कारण मागील काही काळातील आपण कोरोनाचे वर्तन बघितले तर लक्षात येते की ज्या ज्या ठिकाणची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या कमी झाली होती. त्या परिसरातील संख्या पुन्हा एकदा वाढीस लागली होती. त्यामुळे राज्यातील काही शहरात आणि जिल्ह्यात ही संख्या कमी होत असली तरी कधीही वाढू शकते त्यामुळे नागरिकांनी रुग्णसंख्या कमी झाली असून सगळं काही आलबेल झालं आहे ह्या भ्रमात कदापीच न राहता अधिक सजग राहणे गरजेचे आहे नाहीतर गफलत होऊ शकते. कोरोना रुग्ण बरे होत असले तरी अनेक रुग्ण असे आहेत कि त्यांना घरी जाऊन त्यांना वेगळ्या काही व्याधींना सामोरे जावे लागत असून वेळ प्रसंगी रुग्णालयात पुन्हा उपचाराकरिता दाखल करावे लागत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून त्यापासून सुरक्षित राहायचे असल्यास सध्याच्या घडीला एक उपाय आहे तो म्हणजे सुरक्षिततेचे नियम पाळणे. कोरोनाची पहिली लाट येऊन गेली आहे, ही दुसरी लाट आहे, कि आता पिक आहे हे शास्त्रीय आधारावर अजून कुणी सांगू शकलेले नाही, प्रत्येक जण आडाखे बांधत आहे. त्यामुळे कोरोना येत्या काळात कसा वागेल याचा थांगपत्ता कुणालाच नाही. अर्थव्यवस्था हळू हळू पूर्वपदावर येण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे त्याचा कुणीही गैरफायदा न घेता केवळ आवश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, कारण कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही.
तर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ अविनाश भोंडवे यांच्या मते, " निश्चितच ज्या वेगाने कोरोना वाढत आहे त्यापद्धतीने आता मात्र प्रशासनाला कठोर व्हावे लागणार आहे. सध्या पुण्यातील मोठ्या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेड्स मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यात कोविड केअर सेंटर बंद आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कांत आलेलं नागरिक घरातच थांबत आहे. सध्या घरातील एक जण पॉझिटिव्ह आले तर पूर्ण कुटुंब पॉझिटीव्ह येत आहे, असा सध्या ट्रेंड् पाहावयास मिळत आहे. मी स्वतः लॉकडाऊनच्या विरोधात आहे. मात्र ही वाढणारी रुगणसंख्येची साखळी तोडायची असेल तर लॉक डाऊन करण्याशिवाय काही पर्याय दिसत नाही. माझे स्वतःचे मत आहे की सध्या राज्यात जो काही विषाणू ज्या वेगाने पसरत आहे हा नक्कीच कुठलातरी नवीन स्ट्रेन आहे याचाही शोध घेण्याची गरज आहे. "
रुग्णसंख्या एवढी वाढली आहे की काही प्रमाणात व्यवस्थेत हतबलता दिसून येत आहे. सगळे उपाय केले तरी कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नाही उलट वाढतच आहे. नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे त्याच्यावरही कारवाई सुरूच आहे. वर्षांपूर्वी राज्यात असणारे रुग्ण आणि वर्षानंतर असणारे रुग्णसंख्या यामध्ये मोठी तफावत आहे. पुण्यासारख्या शहरात बेडची टंचाई निर्माण होण्यास सुरवात झाली आहे. जर रुग्णवाढ संख्या अशीच राहिली तर राज्यातील अन्य शहरात बेड्सची टंचाई निर्माण होऊ शकते. नागरिकांनी आता मात्र वेळीच सावध होणे गरजेचे आहे, मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांनी कोरोनाची वाढती संख्या गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.
संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग :
- BLOG | संसर्ग रोखणे : आव्हान
- BLOG | डायलिसिसच्या रुग्णांना वाट दिसू देगं देवा .....
- BLOG | दाताचा ठणका आणि कोरोना
- BLOG | कोई भी लेलो .... लाल, काला, पिला मास्क
- BLOG | होम कॉरंटाईन वर निष्ठा वाढवेल आपली प्रतिष्ठा
- BLOG | मला कोरोना झाल्यासारखं वाटतंय...
- सोशल डिस्टन्ससिंग म्हणजे काय असतं रे भाऊ?
- BLOG | कोरोनाशी भिडण्याची हीच ती वेळ!
- BLOG | आम्ही बिनधास्त काम करू
- दुःखावर अंकुश ठेवणारा कोरोना
- BLOG | देवभूमीचा कोरोनाशी यशस्वी लढा
- BLOG | 'चाचपणी' संसर्गाच्या फैलावाची
- BLOG | सह्याद्रीच्या मदतीला देवभूमी?
- BLOG | 'नवरक्षक' पीपीई किट ठरणार वरदान
- BLOG | पांगळी मुंबई कुणाला आवडेल?