Blog | काळाच्या ओघात लुप्त झालेला महान मल्ल... शंकर तोडकर
कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील वाकरे गावचे सुपूत्र तथा शाहूपुरी तालीम कोल्हापूर वस्ताद महम्मद हानिफ, दिनकर दह्यारी, श्रीपती खंचनाळे यांचे पट्टशिष्य पैलवान शंकर तुकाराम तोडकर यांचे आज 34वे पुण्यस्मरण त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा हा खास लेख.
राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा आपला कोल्हापूर जिल्हा. शाहू महाराजांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळेच कोल्हापूर जिल्हा आज कला, क्रीडा, सामाजिक, सहकार व संस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहे. मल्लविद्येचे माहेरघर म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची पताका आजही संपूर्ण भारतभर फडकावत आहे. शाहू महाराजांच्या या कोल्हापूर जिल्ह्यात कुंभी कासारी साखर कारखान्याच्या परिसरातील भोगावती नदीच्या काठावर पाच-सहा हजार लोकवस्तीचे वसलेले वाकरे हे गाव आहे. या गावातच 15 जून 1960 रोजी एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात पैलवान शंकर तोडकर यांचा जन्म झाला. कुस्ती क्षेत्रातील आपल्या वेगळ्या कर्तृत्वाने आणि खेळाने शंकर तोडकर कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनले होते.
वाकरे गावात पैलवानांची निवासी व्यवस्था असणारी "ज्योतिर्लिंग तालीम"आहे. या तालमीतच पैलवान शंकर तोडकर यांनी कुस्तीचे धडे गिरवले. या तालमीत विठ्ठल पाटील वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर तोडकर यांची जडणघडण झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील विद्या मंदिर वाकरे या शाळेत तर माध्यमिक शिक्षण श्रीराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कुडित्रे येथे झाले, याठिकाणी मुख्याध्यापक गुरुवर्य डी .डी आसगावकर व के.ना.जाधव (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर तोडकर यांनी ग्रामीण कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर शाळेला अनेक वेळा अजिंक्यपद मिळवून दिले.
1980च्या दशकात पैलवान तोडकर यांनी आपल्या इतर सहकारी मल्लांच्या सहकार्याने श्रीराम हायस्कूल चा कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण केला होता. 1978 ला जम्मू काश्मीर येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत पैलवान तोडकर यांनी शाळेला राष्ट्रीय स्तरावरील पहिले सुवर्णपदक मिळवून देऊन शाळेच्या यशात मानाचा शिरपेच लावला होता. पैलवान तोडकर यांना गावातल्या तालमीत सराव देण्यासाठी जोड मिळत नसल्याने त्यांच्या चाहत्यांनी त्यांना दररोज नियमित कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत सरावासाठी न्यायचे व परत तालमीत यायचे अशी सरावाची व्यवस्था केली होती. 1979 ला कोल्हापूरच्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानात झालेली "कोल्हापूर केसरी" कुस्ती स्पर्धा शंकर तोडकर यांच्या जीवनाला नाट्यपूर्ण कलाटणी देणारी अशीच ठरली.
BLOG | तांबडी माती : पैलवानांनी आर्थिक नियोजनाची घडी कशी बसवावी?
वाकरे येथील तालमीत अपुर्या साधनांवर सराव करत असतानाच शंकर तोडकर यांनी कोल्हापूर केसरी कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला. कोल्हापुरात मोतीबाग, गंगावेश, काळाईमाम, शाहूपुरी, मठ या नामवंत तालमीतून अनेक पैलवान सराव करत होते. खुल्या गटात त्या काळात उत्तम तयारीत असणारे पैलवान कृष्णात कळंत्रे, पैलवान रामा माने, पैलवान विष्णू जोशीलकर, पैलवान बाळू कोदवडे, पैलवान बाळू चरापले, पैलवान विष्णू फडतरे यांच्यासारखे दिग्गज मल्ल या स्पर्धेत उतरले होते. पैलवान शंकर तोडकर यांनी चटकदार कुस्त्या करत पैलवान बाळू चरापले, पैलवान बाळू कोदवडे, पैलवान कृष्णा कळंत्रे व पैलवान रामा माने यांच्या वरती विजय मिळवून आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. या कुस्ती स्पर्धेतील चटकदार कामगिरीमुळे शंकर तोडकर नावारूपास आले होते.
या कुस्ती स्पर्धेमुळे शंकर तोडकर यांच्या बद्दलच्या त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या. त्यांना कुस्तीची वैभवशाली परंपरा असलेल्या शाहूपुरी तालमीत दाखल केले. याठिकाणी पैलवान महम्मद हनीफ, पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दह्यारी, हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे, पैलवान बंडा नायकवडे यांचे मार्गदर्शन मिळाले. महाराष्ट्र केसरी पैलवान सरदार खुशाल, पैलवान रसूल हनीफ यांच्याबरोबर पैलवान तोडकर यांनी कुस्तीचा सराव केला. आशिया सुवर्णपदक विजेते पैलवान कर्तारसिंग हेसुद्धा कोल्हापूरला शाहूपुरी तालमीत सरावासाठी येत असत, त्यांच्याबरोबर ही सराव करण्याची संधी पैलवान तोडकर यांना मिळाली. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज नेते उद्योगपती महादेवरावजी महाडिक यांचे पाठबळ पैलवान शंकर तोडकर यांना मिळाले होते.
तांबडी माती : शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी पै.पंढरीनाथ पठारे (अण्णा)
पैलवान शंकर तोडकर यांच्या खेळाने प्रोत्साहित होऊन ग्रामस्थांनी गावामध्ये "मिनी खासबाग" मैदान बांधले. या मैदानाच्या उद्घाटनासाठी झालेल्या कुस्ती मैदानात गंगावेस तालमीचा पैलवान तानाजी राठोडला पैलवान शंकर तोडकर यांनी पराभूत करत विजय सुरुवात केली. 1983 ला पाकिस्तानचा आघाडीचा मल्ल "तारीक गुजरानवाला" भारतात आला होता. त्याची पैलवान तोडकर यांच्याबरोबर कुस्ती ठरली, पण तारीख पैलवान यांचा पाय दुखावल्याने ते परत गेले, त्यामुळे ही कुस्ती झाली नाही. यानंतर 1984 ला पाकिस्तानचा आघाडीचा पैलवान "अख्तर आयुब पोपी गुजरानवाला" भारतात आला होता आणि भारतीय मल्लाना निकाली कुस्तीचे त्याने आव्हान दिले होते.
कुस्ती निवेदक यशवंत पाटील दोनवडेकर यांनी पैलवान शंकर तोडकर व अख्तर आयुब पोपी गुजरानवाला यांची वाकरेच्या मिनि खासबाग कुस्ती मैदानात कुस्ती आयोजित केली. पोपी पैलवानने हिंदकेसरी सुरेश कुमार, कर्नाटक केसरी चंदू करविनकोप, महाराष्ट्र केसरी सरदार कुशाल यांच्यावर विजय मिळवल्याने या कुस्तीकडे कुस्ती शौकिनांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. 24 मार्च 1984 वाकरे येथील मिनी खासबाग कुस्ती मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. आपल्या आक्रमक व गतिमान खेळीने पैलवान शंकर तोडकर यांनी सलामीलाच आक्रमण करत पोपी पैलवानचा पट काढून खाली धरून आणले व ताबा मिळवत घिस्सा मारला होता. अर्ध्या तासाच्या डाव-प्रतिडाव लढतीनंतर ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.
1984 ला सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात पैलवान शंकर तोडकर यांची कोल्हापुरच्या संघातून महाराष्ट्र केसरी गटातून प्रथमच निवड झाली. आपली निवड सार्थ करून दाखवताना त्यांनी महाराष्ट्र केसरी गटात सांगलीचा बाळू मुल्ला, महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर, उपमहाराष्ट्र केसरी रामा माने, मुंबईचा केशव सिंग यांच्यावर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत महाराष्ट्र केसरी किताबासाठी नामदेव मोळे व शंकर तोडकर यांची अटीतटीची लढत झाली यात तोडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला व उपमहाराष्ट्र केसरी पदावर समाधान मानावे लागले.
Blog | कुस्तीलाही कोरोनाची धास्ती! यात्रांमधल्या कुस्तीच्या दंगली रद्द
1985 च्या राज्य कुस्ती अधिवेशनात निवड समितीने त्यांना स्पर्धेत उतरण्याची संधी न दिल्याने त्यांना महाराष्ट्र केसरी पदापासून वंचित राहावे लागले. याच दरम्यान त्यांनी महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे व हिंदकेसरी जयप्रकाश यांच्याबरोबर काटा जोड लढती दिल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने 15 फेब्रुवारी 1986 ला कोल्हापूरच्या खासबाग मैदानात कुस्ती मैदान आयोजित केले होते. या मैदानात उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रामा माने व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान शंकर तोडकर तसेच डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार व उपमहाराष्ट्र केसरी बाळू पाटील अशा प्रथम क्रमांकासाठी दोन लढती यांचे आयोजन केले होते. पैलवान शंकर तोडकर विरुद्ध पैलवान रामा माने या लढतीत 29 मिनिटाच्या प्रदीर्घ लढतीनंतर पैलवान शंकर तोडकर यांनी पैलवान रामा माने यांच्यावर नावंदर घिस्सा डावावर विजय मिळवला. ही त्यांची कोल्हापूरमध्ये झालेली शेवटची मोठी आणि चटकदार कुस्ती ठरली.
मार्च 1986 ला मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच महापौर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होते. या स्पर्धेत देशभरातील नामवंत मल्लांचा सहभाग होता. आशियाई सुवर्णपदक विजेता करतार सिंग, हिंदकेसरी सुरेश कुमार, दिल्लीचा सुभाष वर्मा, हरियाणाचा कृष्णकुमार, रेल्वेचा राजवीर गुलवा. पण महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे वगळता एकही महाराष्ट्र केसरी मल्लाने या स्पर्धेत भाग घेतला नव्हता. या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान अखेरपर्यंत जिवंत ठेवताना पैलवान तोडकर यांनी बेळगावच्या सिद्धाराम लोहारला 30 सेकंदात तर सेनादलाच्या सिंगला 25 सेकंदात अस्मान दाखवले होते. दिल्लीच्या प्रतापसिंग बरोबर जोरदार कुस्ती करून त्याला नामोहरम केले होते. पैलवान तोडकर यांच्याकडे या स्पर्धेत महाराष्ट्राचे एक प्रमुख आशास्थान म्हणून पाहिले जात होते. पण स्पर्धा सुरू असतानाच त्यांना अंगात ताप वाढला. अंगामध्ये ताप असतानाही रेल्वेच्या राजवीर गुलवा बरोबर त्यांनी कुस्ती करत आठ गुणांची आघाडी घेतली होती. पण अंगात ताप वाढल्याने त्यांना कुस्ती सोडावी लागली होत. त्यांना केईएम इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांचेवर औषध उपचार चांगले व्हावेत म्हणून मुंबईचे तत्कालीन महापौर व सध्याचे मंत्री छगन भुजबळ, राज्याचे तत्कालीन आरोग्य मंत्री नामदार भाई सावंत, तत्कालीन आमदार कै .संजयसिंह गायकवाड, तत्कालीन खासदार कै. उदयसिंग रावजी गायकवाड यांनी इस्पितळात जाऊन प्रयत्न केले पण यश आले नाही. २१ मार्च १९८६ ला त्यांची प्राणज्योत मालवली. तापाने फणफणत असतानाही या कुस्ती स्पर्धेतील पैलवान कर्तारसिंग यांची अंतिम लढत पाहण्यासाठी ते आखाड्यावर आले होते. पैलवान कर्तारसिंग यांच्याबरोबर त्यांचे घनिष्ठ मैत्री होती. सहकारी मित्राच्या मांडीवर डोके टेकून आखाड्यावर झोपून त्यांनी कर्तारसिंग यांची अंतिम लढत पाहिली होती यावरून त्यांची कुस्ती बद्दल असणारी आवड दिसून येते.
तांबडी माती | इतिहासाच्या पानात लुप्त झालेली पावणेतीन तासांची अजरामर कुस्ती!
पैलवान शंकर तोडकर यांची महती दिगग्ज मल्लांच्या शब्दातूनआखाड्यात प्रतिस्पर्धाशी निर्भिडपणे लढणारा आक्रमक व गतिमान खेळीने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा कुस्ती क्षेत्रातील एक झंजावात म्हणून शंकर तोडकर यांचे आदराने नाव घेतले जाते. खिलाडूवृत्तीने आखाड्याबाहेर प्रतिस्पर्धी मल्लांच्या बरोबर असणारे त्यांचे मित्रत्वाचे संबंधही उल्लेखनीय होते. अगदी शत्रूला सुद्धा शंकरबद्दल वाईट सांगण्यास वाव नाही. त्याच्याबद्दल चार शब्द चांगलेच ऐकायला मिळणार. कारण त्यांचे सद्गगुणच तसे होते. त्यांची कुस्तीतील खिलाडू कृती समाजातील लहान-मोठ्याशी आदराचं वागणं हे आदर्शवत होते. अशी प्रतिक्रिया कुस्ती क्षेत्रातील अनेक जाणकार मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.
शंकर फार सुंदर पैलवान होता. तो पैलवान पेशात फार सुंदर कुस्ती करत होता. काही कारणाने त्याच्यावर अन्याय झाला किंवा असे म्हणा त्याच्या नशिबाने ने त्याला साथ दिली नाही. 1984 ला सांगलीत महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत शंकरने अतिशय प्रेक्षणीय लढत दिली. यावेळी आमच्या तालमीचा पैलवान नामदेव मोळे विजयी ठरला. परंतु पुढचा काळ पैलवान पैशासाठी शंकरच्याच हातात होता. पैलवानकीच्या इतिहासामध्ये त्याने आपल्या कर्तुत्वाने एक स्वभाववंत इतिहास निर्माण केला असता. त्याच्या निधनाने कुस्ती पेशाची फार मोठी हानी झाली. महाराष्ट्रात अनेक पैलवान निर्माण झाले आणि गेले, पण संपूर्ण वाकरे गावाने शंकर चा आदर ठेवला आहे. त्याच्या नावाने गावात हायस्कूल सुरू ठेवून त्याचे जिवंत स्मारक उभारले आहे ही अभिनंदनीय गोष्ट आहे.
"जो जो डर गया, वह मर गया, जो मर गया वो चल गया" लेकिन सारे वाकरे गाव वालोंने शंकरराव को जिंदा रखा है, मेरे तरफ से गाववालों का बहुत बहुत अभिनंदन. वो आये मेरी मजार पे घुंगट उतार के, मुझसे अच्छी है नसीब मेरे मजार की.
या ओळीच्या प्रमाणे आता त्यांच्या कर्तुत्वाचे गुणगौरव करण्यापेक्षा त्याच्या हयातीतच त्याचे कौतुक करायला पाहिजे होते. - हिंदकेसरी पैलवान दीनानाथ सिंह
महाराष्ट्र केसरीसाठी शंकरच योग्य होता
शंकरने अनेक कुस्त्या चटकदार व कुस्ती शौकिनांना खूष करणारे केलेल्या आहेत. गावातल्या तालमीत सराव करत असताना शंकरने आमच्या मोतीबाग तालमीत येऊन काही वर्षे कुस्तीचा सराव केला आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये असणारी पावर चांगलीच अवगत आहे. सांगली येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम लढतीत त्यांनी जोरदार कुस्ती केली. छत्रपती शाहू महाराजांचे कुस्तीतील आचार व विचार यांना पूर्णता बगल देऊन त्यांच्या नावाखाली केवळ स्वतःचा स्वार्थ साधणाऱ्या संधीसाधू लोकांनी शंकर सारख्या एका गुणवान मल्लावर सतत एकतर्फी अन्याय करून त्याला महाराष्ट्र केसरी पासून वंचित ठेवण्याचे कुटिल काम केले. तो एक चांगला मल्ल होता. चांगल्या पैलवानाबद्दल तो कोणत्याही तालमीचा असला तरी मला नेहमीच आदर असतो. त्याच्या निधनाने मैदानात लढणाऱ्या एका चांगल्या योद्ध्याची कुस्ती क्षेत्रात उणीव भासत आहे. - हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर
खिलाडू वृत्तीचा मल्ल
शंकर तोडकर एक खिलाडू वृत्तीचा मल्ल होता. शाहूपुरी तालमीत मी सरावासाठी येत होतो, यामुळे त्याच्याशी माझी घनिष्ठ मैत्री झाली होती. शाहूपुरी तालमीच्या आखाड्यात आम्ही एकत्र सराव केला असून कुस्ती कधी घेतलं चांगलं कौशल्य प्राप्त केलेला तो एक मल्ल होता. त्याच्यामध्ये निर्भिडता, गतिमानता व आक्रमकता तसेच डावा पाठोपाठ टाकण्याचं कौशल्य चांगले आत्मसात होते. कुस्ती क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरू असतानाच त्याचे आकस्मिक निधन झाले. देशाला एका चांगल्या मल्लाची उणीव भासेल. खेळाडूंच्या मध्ये मित्रत्व कसे असावे याचे एक चांगले उदाहरण आहे. - करतारसिंग पैलवान पंजाब (आशियाई सुवर्णपदक विजेता)
शंकरने परदेशातून पदके आणली असती
शंकर एक गुणवान पैलवान होता. त्याने बालपणापासूनच आक्रमक कुस्त्या करत उपमहाराष्ट्र केसरी पदापर्यंत चांगली मजल मारली. त्याच्यामध्ये पैलवानकीचे जे गुण होते, त्या जोरावर तो महाराष्ट्र केसरीच काय तर हिंदकेसरी व रुस्तुम-ए-हिंद झाला असता. आक्रमक कुस्ती कौशल्याच्या जोरावर त्यांने परदेशात जाऊनही देशासाठी पदके आणली असती. तसा त्याचा खेळ होता. मुंबई महापौर केसरी स्पर्धेत त्याला प्रकृतीने साथ दिली असती तर तो महापौर केसरी झालाच असता. एक नव्या उभारीचा मल्ल म्हणून चमकत असतानाच काळाने त्याच्यावर झडप घातली व महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची फार मोठी हानी झाली. - महान भारत केसरी पैलवान दादू चौगुलेदिल न टाकता कुस्ती करणारा शंकर
मैदानात कुस्तीची सलामी झडताच प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करण्याच्या कौशल्यामुळे शंकरच्या कुस्तीचे कुस्ती शौकिनांना एक वेगळेच आकर्षण होते. त्याची खेळी धाडसी व आक्रमक असायची. यामुळे कुस्ती शौकीन नेहमी त्यांच्या कुस्तीवर खूष असायचे. समोर कोणीही मल्ल असला तर तो कधी दिल टाकून खेळत नव्हता. शंकरला आपल्या खेळीचा कधीही गर्व नव्हता. त्यांचे सर्वांशी वागणे प्रेमळ होते. शिवाय प्रतिस्पर्धयाबद्दल अपशब्द व आव्हानात्मक शब्द कधीही त्याच्या तोंडून आले नाहीत. त्याच्या सदगुणामुळेच अगदी शत्रूला सुद्धा त्याच्याबद्दल वाईट सांगण्यास वाव नाही. मोठा पैलवान होण्यासाठी पैलवानकीचे जे गुण आवश्यक असतात ते शंकरकडे होते. महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी होण्याची त्याची जिद्द होती. त्याची मेहनत व परफॉर्मस पाहता तो महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी झाला असता. पण त्याची अपेक्षा पूर्ण झाली नाही जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला याप्रमाणे परमेश्वर त्याला अर्ध्या वरती घेवून गेला. शंकरचा हा खेळ अर्ध्यावरती मोडला महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली. - डबल महाराष्ट्र केसरी पैलवान लक्ष्मण वडार
कोल्हापूर केसरीत शंकरचा उदय
सुरुवातीस शंकर गावात असल्यामुळे कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रात त्याचा फारसा परिचय नव्हता. 1979 ला कोल्हापूर केसरी कुस्ती स्पर्धा सुरू झाली आणि शंकर तोडकर यांचा उदय झाला. खुल्या गटात पैलवान शंकर तोडकर यांनी नामवंत मल्लांच्याशी दिलेल्या लढती सर्वांच्या नजरेत खिळल्या या स्पर्धेत माजी व शंकरची आठवणीत ठेवण्याजोगी कुस्ती झाली. यानंतर आमची इच्छा असूनही दोघांची कुस्ती झालीच नाही. सलामी होताच प्रतिस्पर्ध्याला काय झाले हे कळण्याअगोदरच क्षणार्धात पटात घुसून घिस्सा मारणारा तो एक हुकमी एक्का होता. तो असता तर त्याच वर्षी महाराष्ट्र केसरी झाला असता. - महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर
भारताचा एक मोठा मल्ल झाला असता
अत्यंत प्रामाणिक स्वभावाचा असणारा शंकर त्याच्या आक्रमक कुस्तीस महाराष्ट्रात तोड नव्हती. तो कमी वेळात कुस्ती निर्विवादपणे निकाली करणार याची प्रेक्षकांना खात्री असायची. शंकर महाराष्ट्राचा एक सर्वगुणसंपन्न असणारा चांगला पैलवान होता. त्यांच्यासारखा पैलवान दुसरा होण्याची शक्यता फारच कमी आहे. भारताचा एक मोठा मल्ल होणार असे वाटत असतानाच देवाने घाला घातला. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला फार मोठा हादरा बसला. कुस्ती क्षेत्राची कधीही भरुन न येणारी हानी झाली. शंकरच्या व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्राला अनेक गुणवान मल्ल मिळाले असते - पैलवान बंडोपंत नायकवडे (माजी महापौर)
महाराष्ट्राच्या कुस्तीला चालना मिळाली असती
सांगली येथे माजी व शंकरची महाराष्ट्र केसरी पदासाठी अतिशय प्रेक्षणीय लढत झाली होती. शंकर एक होतकरु शांत डोक्याने लढणारा मल्ल होता. पुढे त्याचे वर्चस्व वाढले असते. कोल्हापूरला आणखी एक महाराष्ट्र केसरी पद मिळाले असते. प्रतिस्पर्ध्याच्या बगलेत हात घालून खाली धरुन आणणे व घुटना ठेवून घिस्सा मारणे हे त्याचे हुकमी डाव होते. त्याच्या कर्तृत्वाने भविष्यात निश्चितच महाराष्ट्राच्या कुस्तीला चालना मिळाली असती. - महाराष्ट्र केसरी पैलवान नामदेव मोळे
कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करणारा मल्ल
मेहनतीत नियमितपणा. सर्वांशी खेळीमेळीने वागणे तालमीतील मल्लांच्या बदल असणाऱ्या सदभावना. या तालमीतील लहान-मोठ्या कुस्तीगिरांना आकर्षित करणारे गुण शंकरमध्ये होते. यामुळे तालमीत त्याच्याभोवती पैलवानाचा घोळका असायचा. अगदी शत्रूला सुद्धा शंकर बद्दल वाईट सांगण्यास वाव नाही, असं त्याचे वागणे होते. मुंबई महापौर केसरी, सांगली येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा याचबरोबर पाकिस्तानचा पोपी, गुलाब बर्डे, जयप्रकाश यांच्याबरोबर शंकरने दिलेल्या लढती या अविस्मरणीय अशाच आहेत. त्याच्या जाण्याने एका सद्गुणी मलाची उणीव कुस्ती क्षेत्राला जाणवत आहे. शाहुपुरी तालमीचा वेगळाच दबदबा निर्माण करून शाहूपुरी तालमीची विजयी परंपरा चालू ठेवली होती. - पैलवान रसूल हनीफ
आक्रमक व गतिमान कुस्तीचा आदर्श शंकर
शंकर यशाच्या आती उच्चशिखरावर पोहोचला असता .तसे त्याच्यामध्ये चांगले गुण होते. त्याची जिद्द कुस्ती मेहनत आक्रमक डावपेच खिलाडूवृत्ती याचबरोबर कोणाही प्रतिस्पर्ध्यास वाईट भाषेचा वापर न करता त्याच्याबद्दलची चांगले बोल हे नेहमीच नवोदित कुस्तीगिरांना आदर्शवत असेच आहेत. मैदानात उतरतात कुस्तीतील हार-जीत तिची परवा न करता आक्रमक व गतिमान कुस्ती करण्याचे शंकरचे कौशल्य वेगळे असेच होते. यश मिळाल्यास हुरळून जाणे किंवा अपयश मिळाल्यास नाराज होणे हे त्याच्या रक्तातच नव्हते. वाकरे गावात मी लहानपणापासून यात्रेला मैदानासाठी जात होतो. गावात आमची कुस्ती कधी लागली नाही. पण वाकरे गावाबाहेर माझी दोन वेळा त्याच्याशी लढत झाली. कुस्तीच्या मैदानात आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी होतो मात्र मैदानाबाहेर आमचे अतूट असे मित्रत्त्व होते. आठवडाभर जरी दोघांची भेट झाली नाही तरी आम्हाला चैन पडत नसे. सांगली येथे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत शंकर तोडकर यांनी नामदेव मोळे यांच्याबरोबर चांगली कुस्ती केली. त्यांच्या खेळीमेळीच्या स्वभावामुळे त्याच्या भोवती लहान मोठ्या मल्लांचा नेहमीच गराडा असायचा. - उपमहाराष्ट्र केसरी पैलवान रामा माने
शंकरच्या कुस्तीचे विस्मरण होणे अशक्य
एक आज्ञाधारक मितभाषी व प्रामाणिक विद्यार्थी धडाकेबाज कुस्तीगीर म्हणून शंकरने शालेय जीवनातच महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात वेगळा असा ठसा उमटवला होता. शाळेच्या क्रीडा क्षेत्रात शाळेला मानाचे स्थान मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून कधीही विस्मरण होणार नाही, असा त्याचा खेळ व त्यांच्यामधील गुण होते. शाहूपुरी तालमीत दाखल झाल्यानंतर सुद्धा त्याला शाळेबद्दल आदर होता. नेहमीच आम्हाला अभिमान वाटावा असे त्याचे कर्तुत्व आहे. सांगरुळ शिक्षण संस्थेने कोल्हापूर जिल्ह्याला विविध क्षेत्रात चमकणारे अनेक हिरे-मोती दिलेत त्यातीलच एक शंकर तोडकर आहे. अल्पवयातच यशाच्या उत्तुंग शिखरावर असताना त्याचे आकस्मित निधन झाले कोल्हापूर जिल्हा एका नव्या उभारणीच्या मल्लाला मुकला कुस्ती क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. - गुरुवर्य डी .डी आसगावकर (सचिव सांगरुळ शिक्षण संस्था)बंधुतुल्य शिष्य शंकर
शंकरने नेत्रदीपक कुस्त्या करून वाकरे गावाबरोबर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची मान उंचावली आहे. त्याची जिद्द चिकाटी आणि आज्ञाधारकता आजच्या कुस्तीगिरांना आदर्शवत असेच आहे. शिष्य नव्हे तर पाठचा बंधू मानून मार्गदर्शन केले. त्याच्या कुस्तीतील जिद्द पाहून त्याला मार्गदर्शन करत असतानाच महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात चमकणारा भावी शंकर दिसत होता. पण शंकराची विजयी घोडदौड चालू असतानाच त्याच्या आकस्मित जाण्याने मनावर आघात झाला. त्याला मार्गदर्शन करताना तालीमच माझे घर असे वाटत होते. परत असा पैलवान निर्माण होणे हे दुर्मिळ आहे. - विठ्ठल वस्ताद वाकरे
अविस्मरणीय असेच शंकर आण्णा
शंकर अण्णा यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत करताना नेहमी आदरयुक्त भीती असायची. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या मार्गदर्शनाची सुवर्णसंधी लाभली. शिष्य असो अगर जोडीतील पैलवान असो किंवा त्यांच्या पेक्षा मोठ्या व्यक्ती असो त्यांना आपलसे करून घेण्याची शंकर अण्णांची हातोटी वेगळीच होती. त्यांच्या कर्तुत्वाची छाप आमच्यावर अशी पडली की नेहमी त्यांच्याबद्दल आमच्यात आपुलकी निर्माण झाली होती. त्यांच्या मायेची व मार्गदर्शनाची सावली आमच्या वरून दूर झाली. त्यांच्या मार्गदर्शनाच्या व आशीर्वादाच्या शिदोरीवर इथपर्यंत मजल मारण्यात मदत झाली. तरीही त्यांचा सहवास काही वेगळाच होता. त्यांचा सहवास त्यांचे कर्तुत्व व मार्गदर्शन यास तोड नाही. याची उणीव भरून काढणे केवळ अशक्य आहे. वाकरे गावचे अनेक तारे कुस्ती क्षेत्रात चमकत असताना सर्वांना बरोबर घेऊन जाणारा हा महाराष्ट्राचा दैदिप्यमान तारा अचानक निकळला. गावच्या कुस्ती क्षेत्रातील घोडदौडीला लगाम बसला. त्यांचे कर्तृत्व हे केवळ अविस्मरणीय असेच होते. त्यांच्या मार्गदर्शनाने आज गावातून व कोल्हापूर जिल्ह्यातून कुस्ती क्षेत्रात चमकणारे अनेक तारे उदयास आले असते. - पैलवान विलास पाटील शाहू केसरी
शंकर एक लढाऊ मल्ल होता
शंकर शाहूपुरी तालमीतील एक आघाडीचा मल्ल होता. निर्भिड व आक्रमक खेळी ही त्याच्या कुस्तीची खास वैशिष्ट्ये होती. शंकरने आपल्या आक्रमक खेळीने अनेक चांगल्या लढती दिल्या होत्या. कमी वयात शंकरच्या आकस्मित जाण्याने कुस्ती क्षेत्राचे नुकसान झालं. आणखी काही वर्षातच महाराष्ट्राला एक चांगला मल्ल मिळाला असता. कोल्हापूरचे नाव कुस्ती क्षेत्रात दैदीप्यमान केले असते. - हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे
झटपट कुस्तीतील झंजावात वादळ
शंकर तोडकर छत्रपती शाहूंच्या तांबड्या मातीला लाभलेली मोठी देणगी होती. त्यांची जिद्द मेहनत आणि प्रामाणिक खेळी हे नवोदित कुस्तीगिरांना आदर्शवत होती. कुस्ती क्षेत्रात अल्पकाळातच त्यांनी घेतलेली गरुड भरारी हे अतुलनीय अशीच होती. शंकर हे कुस्तीक्षेत्रातील एक झंजावात वादळ होते. त्यांचे निधन झाले तेव्हाच तांबड्या मातीच्या कुस्ती क्षेत्रातील एक झुंजार खेळी संपुष्टात आली. - पैलवान राम सारंग राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता
चित्रासारखी झडप घेणारा शंकर
शंकरच्या कुस्तीचे निवेदन करत असताना एक वेगळी अशीच स्फूर्ती येत होती. शंकरची कुस्ती असली की कुस्तीकडे डोळ्यात तेल घालून बघावे लागत होते. त्याच्या पट काढण्याच्या चपळाईला उपमा देण्यात शब्दच अपुरे पडत होते. आज मॅटवरची गतिमान कुस्तीचे युग आले आहे, पण त्या काळात शंकरची मातीवरील कुस्तीतील गतीमानता वाखाणण्यासारखी होती. अन्याय विरुद्ध कडक भूमिका घेणारा निगर्विष्ट, दुसऱ्याला सदैव मदतीचा हात पुढे करणारा तसेच एक दिवस जरी मेहनत चुकली तरी पश्चाताप व्यक्त करणारा असा हरण काळजी शंकर होता. त्याच्या पहिल्या पाच मिनिटातील पावर ही चित्या सारखी झडप होती. त्याची प्रतिस्पर्ध्याला जाणीव होत नव्हती. त्याच्या पहिल्या पाच मिनिटातील झडपेला महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतात जोड नव्हती. - पैलवान यशवंत पाटील दोनवडेकर (कुस्ती निवेदक)
कुस्ती पेशाशी प्रामाणिक मल्ल
शंकरच्या कुस्तीचे समालोचन करण्याचे एक वेगळे समाधान मिळायचे. नियमबाह्य कुस्ती न करणे कुस्ती पेशी प्रामाणिक खेळ करणे प्रेक्षकांच्या आवडीचा खेळ करणारी कुस्ती असल्याने त्याचे वर्णन करताना अविस्मरणीय आनंद मिळायचा. प्रतिस्पर्ध्याचा घिस्स्यास हात मिळाल्यास कमी वेळात शंकर कुस्ती निकाली करणार याची खात्री असायची. त्याच्या कुस्तीला एक गती होती. आक्रमकता हा त्याच्या खेळीचा प्रमुख गुण होता. त्याच्या गतिमान कुस्तीला तोड नव्हती. त्याची कुस्ती प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी असायची. असा मल्ल आता होणे नाही आक्रमकता व कौशल्य यांचा उत्तम मिलाफ त्याच्या कुस्तीमध्ये सामावलेला होता. - बी.डी राडे कुस्ती निवेदक
बिनतोड कर्तुत्वाचा समाजसेवी पैलवान
शंकर तोडकर यांच्या कुस्तीच्या कारकिर्दीतील एकही कुस्ती रटाळ किंवा कंटाळवाणी झाली नाही. मैदानात उतरतानाच निर्भीडपणे लढणारा समोरचा मल्ल कोण आहे याची तमा न बाळगणारा व सलामीलाच आक्रमण करून प्रतिस्पर्ध्यावर ताबा मिळवणारा एक आक्रमक कुस्तीगीर म्हणून शंकर तोडकर यांना तोड नव्हती. कुस्ती क्षेत्रात मिळवलेल्या मानसन्मानामुळे त्यांना वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. शासन दरबारी त्यांनी वेगळं वलय निर्माण केले होते. शाहूपुरी तालमीत असताना ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या व परिसरातील सर्वसामान्य लोकांच्या अडचणी समजावून घेऊन व्यायामातून सवड काढून विविध शासकीय व शैक्षणिक कार्यालयात समक्ष येऊन ते मदत करत होते व सामाजिक कार्यातही ते सहभाग घेत होते. - प्रा. रघुनाथ मोरे (ऑल इंडिया चॅम्पियन)