एक्स्प्लोर
Advertisement
BLOG | तांबडी माती : पैलवानांनी आर्थिक नियोजनाची घडी कशी बसवावी?
कुस्ती हा गरिबांचा खेळ म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गरीबाघरची मुलचं या खेळात येतात. कष्ट, संघर्ष या बाबी जश्या इतर खेळात आहेत, तश्याच किंवा त्यापेक्षा थोड्याशा जास्त कुस्तीमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळेच पैलवानांही वेळीच आर्थिक नियोजन करायला हवे.
कुस्ती हा गरिबांचा खेळ म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गरीबाघरची मुलचं या खेळात येतात. कष्ट, संघर्ष या बाबी जश्या इतर खेळात आहेत, तश्याच किंवा त्यापेक्षा थोड्याशा जास्त कुस्तीमध्ये पाहायला मिळतात. कुस्तीचा उगम, इतिहास सांगायचं म्हटलं तर हा लेख अपुरा पडेल. मात्र, मानवी उत्क्रांतीच्या प्रत्येक कालखंडात कुस्ती पहायला मिळते, जगाच्या सर्व धर्मग्रंथात मल्लयुद्धाची उदाहरणे आहेत, इतका हा प्राचीन खेळ होय.
जशी मानवी संस्कृती बदलत गेली तशी कुस्तीही. पुराणकाळात जीवघेणी असणारी कुस्ती मध्ययुगीन काळात नियमात बांधली गेली. आजमितीला तर ग्रीकरोमन व फ्री स्टाईल इथवर पोहचली. आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवर जशी कुस्ती खेळली जाते तशी भारतात मातीतल्या निकाली कुस्तीला सुद्धा फार मोठी परंपरा आहे. जपानी लोकांनी जशी आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये मोठी मजल मारली, तशी आपली परंपरा असणारी सुमो कुस्ती सुद्धा तशीच टिकवली. भारतात व आपल्या महाराष्ट्रात देखील आपली पारंपरिक लाल मातीतली कुस्ती मोठ्या प्रमाणावर खेळली जाते. गावोगावच्या यात्रेत होणाऱ्या दररोजच्या कुस्त्या व यात मिळणाऱ्या बक्षीसावर महाराष्ट्रातील 99% मल्लांच्या खुराकचा खर्च निघतो हे शाश्वत सत्य आहे. अश्या काळात प्रत्येक मल्लानी आपली आर्थिक नियोजनाची घडी बसवणे गरजेचे ठरते.
कुस्ती हा असा खेळ आहे ज्यात मिळणारे बक्षीस केवळ खुराकाला व वेळोवेळी होणाऱ्या दुखापतीना वापरले जाते. आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या मल्लाना शासकीय पातळीवर बऱ्यापैकी पैसा मिळतो आहे. तोही तसा अपुराच आहे. मात्र, मिळतो हे त्यातल्या त्यात सुखावणारी गोष्ट आहे. मात्र, ज्यांनी मातीतल्या कुस्तीत करियर करायचा निर्णय घेतला अश्यांच्या पुढे येणारी आर्थिक चणचण ही न संपणारी आहे.
आज पूर्वीच्या काळापेक्षा मैदानी कुस्तीला चांगला पैसा मिळत आहे. दररोज कुस्ती मैदाने आहेत. मोठमोठ्या शहरातील मल्ल सकाळीच मैदानासाठी प्रवासाला निघतात व संध्याकाळी कुस्त्या करून दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरे मैदान. महाराष्ट्रात साधारणतः जानेवारी ते मे आणि ऑगस्ट ते डिसेंबर असे 2 कुस्ती हंगाम असतात. जून व जुलै श्रावणात बरसणाऱ्या सरी मल्लाना तयारीसाठी कुस्ती मेहनतीसाठी पोषक असतात.
पूर्वी म्हणजे साधारण 50 च्या दशकानंतर कुस्तीला लोकाश्रय प्राप्त झाला. ठेकेदारी पद्धतीने कुस्त्या होऊ लागल्या आणि पैलवान व ठेकेदार मालामाल होऊ लागली. तिकीट विक्री करून कुस्त्या थिएटर मध्ये होत असत. सर्कशीत सुद्धा शेवटी तोलामोलाची कुस्ती होत असे. याकाळात मल्लांचा सुवर्णकाळ होता असे म्हणायला वावगे ठरणार नाही. फ्री स्टाईल ही कुस्ती मनोरंजन कुस्ती असायची. अनेक ब्रिटिश अधिकारी आपल्या कुटुंबासह अश्या कुस्तीचा आनंद लूटत असे. यात केले जाणारे डावपेच हे खरे असायचे मात्र ठरवून केलेले असायचे. ही फ्री स्टाईल कुस्ती दारासिंह या महान कलाकाराने चित्रपटात आणली आणि याचे समाजातील स्थानच संपले. दीडशे किलो किंगकाँगला गरागरा फिरवून रिंग बाहेर फेकणारा दारासिंह पडदद्यावर पाहून अनेकांना हायसे वाटत असे. पण, तो केवळ अभिनय असे. पुढे दारासिंह रामायणात हनुमान झाले आणि भारतातील जनतेला जणू हाच आपला हनुमान असे वाटू लागले. पण, दारासिंहानी अनेक मल्लाना आर्थिक मदतीचा हात दिला हे मात्र खरे.
6 मार्च 1965 ला खासबाग कुस्ती मैदान कोल्हापुरात हिंदकेसरी मारुती माने विरुद्ध मल्लसम्राट विष्णुपंत सावर्डेकर ही तब्बल 2 तास 45 मिनिटं चालणारी कुस्ती ही शतकातील दीर्घकाळ लढली गेलेली कुस्ती होय. या कुस्तीला 1 लाख तिकीट खपून माणसे बाहेर फिरत होती इतका कुस्तीवेडा समाज त्याकाळी होता. यानंतरच्या काही दशकात मात्र गावोगावी यात्रा, जत्रामध्ये होणारी मैदाने भरभराटीस आली. एकदा का कुस्ती सिझनला सुरुवात झाली की पैलवान अंथरून पांघरून सोबत घेऊन गावोगावी कुस्तीला फिरायचे. कोणत्याही शाळेत झोपायचे, सकाळी उठून व्यायाम आवरून जेवणाची सोय करायचे. कुस्तीच्या ठिकाणी जाऊन झाडाखाली झोपून संध्याकाळी कुस्ती करायचे व मिळालेले बक्षीस घेऊन पुन्हा पुढचे गाव. 6-6 महिने गाव सोडून मग गावी यायचे आणि मिळाल्या बक्षिसात परत वर्षभर खुराक व इतर.
आजमात्र कुस्तीला चांगले दिवस आहेत. इनामाची रक्कम चांगली जरी मिळत असली तरी पैलवान मंडळींनी आर्थिक नियोजन योग्य केले पाहिजे. पैलवान मुलांना यात्रा कमिटी रोख रक्कम देते. रोख रक्कम आपल्या सीबीलला दाखवत नाही त्यामुळे आपली बॅलन्स शीट कच्ची राहते व कुस्ती निवृत्तीनंतर जर आपल्याला कर्ज हवे असेल तर कोणतीही बँक कर्ज देत नाही. गावोगावच्या यात्रा कमिटीने ही रक्कम जर मुलांच्या खात्यावर पाठवली अथवा चेक दिला तर मल्लांचा सीबील स्कोर वाढण्यास मदत होईल. अनेक आयुर्विमा कंपन्या कुस्तीसारख्या खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना विमा संरक्षण देत नाहीत. त्यांनी आपले नियम शिथिल करून ते करायला हवे. कुस्ती म्हटलं की कधीतरी लागणारच, अश्या वेळी विमा सुरक्षा त्याचा उपचार खर्च देईल.
सध्या गुगल पे, फोन पे सारखी माध्यमे आहेत. पैलवानांनी दररोजच्या खर्चासाठी वापरली पाहिजेत. आपण कुस्तीसाठी जे वाहन घेऊन जातो. त्यात पेट्रोल भरणे, नाश्ता अथवा जेवण केले त्याचे बिल सुद्धा अश्या पद्धतीने किंवा कार्डने करावे. बक्षिसात मिळणारा पैसा हा बँकेत ठेवला पाहिजे व त्याची नोंद एका वहीत जरूर करावी. हे सर्व एवढ्यासाठी सांगत आहे की अनेक मोठे पैलवान कुस्ती निवृत्तीनंतर अतिशय वाईट जीवन जगत आलेत हा इतिहास आहे. अनेकांचे संसार कुस्ती निवृत्तीनंतर उघड्यावर पडले. आयुष्यात केवळ कुस्तीच शिकली असल्याने त्यांना इतर कामे जमणे अवघड होते व परत त्याच किमतीने जीवन जगायचे असते. त्यामुळे बहुतांशी पैलवान आर्थिक उत्पन्नाचे इतर मार्ग शोधत असतात. त्यामुळे इतिहासातून बोध घेऊन आपण सर्वांनी वागले पाहिजे.
प्रत्येक मल्लांचे बँक खाते हवे, एटीएम हवे, नेट बँकिंग अथवा गुगल पे शिकणे आवश्यक आहे. सीबील स्कोरसाठी बक्षीस शक्यतो ऑनलाईन अथवा चेकने स्वीकारा. रोखीने मिळालेली रक्कम बँकेत भरा व त्याची तारखेनुसार नोंद ठेवा. या सर्व गोष्टींमुळे आपल्याला कुस्ती निवृत्तीनंतर जरी एखादा व्यवसाय काढायचा असेल, घर बांधायचे असेल तर कोणत्याही बँक कर्ज देतील अन्यथा नाही. जोवर अंगात रग आहे, मैदानी हवा आहे तोवर आपल्याला याची किंमत कळणार नाही. मात्र,निवृत्ती घ्याल व आर्थिक मदत हवी असेल त्यावेळी मात्र याची किंमत कळेल यासाठी महाराष्ट्रातील छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी वरील सूचना जरूर पाळा.
गुंतवणूक मात्र आपण आपल्या अनुभवाने व विवेकबुद्धीने करावी. अनेकांनी कुस्तीचा पैसा गुंतवायचा म्हणून गुंतवला व परत फसवणूक झाली असे अनेकदा घडले आहे. तो पैसा पैलवानांचा असतो म्हणून रिकव्हर होतो इतरांची काय व्यथा? पण, रिकव्हर जरी झाला तरी डोक्याला ताप कशासाठी घ्यायचा. त्यामुळे गुंतवणुकीचा सल्ला आपण जाणकार मंडळीकडून घ्यावा. महाराष्ट्रात कुस्तीला लोकाश्रय आहे. हा खेळ लोकांनी टिकवला, वाढवला यावर पुत्रवत प्रेम केले. आजही कुस्तीला व पैलवान पोरांना बक्षीस म्हणून लाखो रुपये देणारा समाज आहे, त्यामुळे कुस्ती टिकून आहे. महाराष्ट्रातील सर्व मल्लाना आगामी कुस्ती मोसमाच्या हार्दिक शुभेच्छा. या मोसमात आपली आर्थिक नियोजनाची योग्य घडी घालावी व आपला भविष्यकाळ सुरक्षित करावा ही विनंती.
तांबडी माती : शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी पै.पंढरीनाथ पठारे (अण्णा)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement