एक्स्प्लोर

BLOG : चळवळीतला महानायक - निळू फुले

निळू फुले लहान असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचे. विचार वगैरे असं त्यामागे काही नव्हतं, फक्त खेळायला मैदान मिळतंय या एकमेव कारणासाठी त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी शाखेत जायला सुरूवात केली. ते वय अगदीच अजाणतं होतं. एक दिवस शाखेत सगळ्यांना नावं विचारली, एका मित्रानं नाव सांगितलं 'इबू'. 'इबू' म्हणजे 'इब्राहिम..' झालं, इब्राहिमला सोडून तुम्ही सगळे शाखेत येऊ शकता असं निळू फुलेंना खासगीत सांगण्यात आलं. ही बाब निळूभाऊंना फार काही रुचली नाही. तेव्हा अशीच एक 'राष्ट्र सेवा दल' नावाची संस्था खड्डा पटांगणावर सुरू झाल्याचं कळलं. खेळायला मैदान असल्यानं निळू फुले आणि त्यांच्या मित्रांनी सेवा दलाच्या शाखेत जायला सुरूवात केली. तिथे जाती धर्माची काही बंधनं नव्हती. धर्मनिरपेक्षतेचा पहिला धडा त्यांना राष्ट्र सेवा दलात मिळाला. अजाणतेपणी सेवा दलाच्या शाखेत झालेला प्रवेश आणि तिथल्या सर्वधर्मसमभावाच्या संस्कारामुळे शेवटच्या श्वासापर्यंत निळू फुले सेवा दलाचे सच्चे कार्यकर्ते म्हणून जगले. 
 
ब्रिटिशकालीन पुण्यात शुक्रवार पेठेतल्या खडकमाळ अळीत नीळकंठ कुष्णाजी फुले म्हणजे आपल्या निळुभाऊंचा जन्म झाला. साल होतं 1931. जन्मतारीख ही त्यांनासुद्धा माहिती नव्हती. घरात आई बाबा सोडून अख्खी क्रिकेटची टीम (अकरा भावंडं) होती. असं ते गंमतीनं सांगायचे. घरची परिस्थिती बेताचीच होती. मंडईत त्यांचे दोन गाळे होते. फुलांच्या माळा करुन विकणं, बागकाम करणं, भाजी विकणं अशी अनेक काम करुन घरचा उदरनिर्वाह चालायचा. निळुभाऊंच्या वडिलांनी अनेक कामं केली, उद्योग केले, पण कशातच यश मिळालं नाही. घरात सिनेमाचं, नाटकाचं तसं काहीच वातावरण नव्हतं. शाळेतही त्यांनी कधी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला नाही.
 
शिवाजी मराठा हायस्कुल ही निळूभाऊंची शाळा. शाळेत त्यांच्या मराठीच्या शिक्षिका कोण? तर चक्क शांताबाई शेळके. मराठी या विषयाव्यतिरिक्त त्यांना कोणत्याही विषयात रस नव्हता. शांताबाईंचा तास मात्र निळूभाऊ चुकवायचे नाही. मेपासॉ, मॅक्झिम गार्की ही नावं शांताबाईंकडूनच त्यांनी ऐकली. परकीय भाषेतल्या उत्तम कथा त्या शाळेतल्या मुलांना ऐकवायच्या. निळूभाऊंना ते सगळं आवडत होतं. शांताबाईच्या याच शैक्षणिक संस्कारातून निळूभाऊंना कथा कादंबऱ्या, सिनेमाविषयाचं कुतूहल वाटू लागलं. पुढे हाच वाचनाचा वसा त्यांनी जन्मभर सोडला नाही. 
 
शुक्रवार पेठेतली शिवाजी मराठा शाळा हे स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीचं केंद्र होतं. बहुजनांच्या शिक्षणासाठीच त्या शाळेची पायाभरणी झाली. श्रीमंत सयाजीराव गायकवाड, कोल्हापुरचे राजाराम महाराज या शाळेला मदत करायचे. सर्व जातीचे, धर्माचे विद्यार्थी सामावून घेणारी ही शाळा होती. समाजसेवी बाबा आढाव, भाई वैद्य हे निळूभाऊंचे शाळेतले मित्र होते. मोहन धारिया या चळवळीशी जोडले गेले. फुले आडनाव ऐकल्यावर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की निळू फुले हे महात्मा ज्योतीराव फुले यांचे वंशज का? तर हो, निळू फुले हे महात्मा फुलेंच्या वंशावळीतलेच होते. त्यामुळे चळवळीचा डीएनए त्यांच्या रक्तातच असावा.
 
1942 च्या 'चले जाव' आंदोलनात निळुभाऊंच्या थोरल्या बंधूंनी सक्रिय सहभाग घेतला होता. पोलिसांचा मार खाल्ला, येरवड्याच्या तुरूंगात कारावास सोसला. तेव्हा निळुभाऊ दहा बारा वर्षाचे होते. एवढ्या कमी वयातही ते आंदोलनात निरोप पोहोचवण्याचं काम करायचे. निळुभाऊंना त्यात मजा यायची. याच काळात त्यांनी गांधीजींना अनेकदा बघितलं. साने गुरूजींच्या अनेक सभांना स्वयंसेवक म्हणून काम पाहिलं. अत्यंत साध्या प्रकृतीचे साने गुरूजी बोलायला लागले की दीड दोन तास सभा गाजवत. किशोरवयात निळुभाऊंवर सेवा दलाच्या माध्यमातून आंदोलन, चळवळ, देशप्रेमाचे संस्कार झाले. पुढे पंढरपूरच्या विठ्ठ्ल मंदिरात हरीजनांना प्रवेशासाठी चळवळ उभी राहिली. निळुभाऊ त्यातही पुढे होते. गोवा मुक्ती संग्रामात सत्याग्रहींसाठी भाकरी जमवल्या. मोरारजींनी सावंतवाडी ते गोवा ही एसटी बंद केली म्हणून मधू दंडवते यांच्या नेतृत्वात 75 मैलांचा पायी प्रवास केला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात पुण्यात इंदिराबाईंची गाडी अडवली तेव्हा पोलिसांचा मारही खाल्ला. निळू फुले या व्यक्तिमत्वानं त्या मोजक्या वर्षात शांताबाई, साने गुरूजी, दंडवते, प्र. के. अत्रे यांच्या सहवासात आयुष्यभराची शिदोरी जमवली होती. 
 
पुणे गावठाणात तेव्हा नवलोबाची यात्रा भरायची. निळू फुले तेव्हा अगदीच लहान होते. या जत्रेत तमाशा यायचा, तो तमाशा बघणं म्हणजे आनंदाची पर्वणी असायची. उघड्या मैदानावर हजारो लोकांसमोर अभिनय करुन त्यांना तासंतास खिळवून ठेवणं ही कला निळुभाऊंना विलक्षण वाटली. पुढे कलापथाकाच्या माध्यमातून निधी गोळा करण्याची जबाबदारी निळुभाऊंकडे आली. त्याकाळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांनी कलापथकाचे फड गाजवले. अनेक मान्यवरांच्या सभेआधी प्रेक्षकांना थांबवून ठेवण्यासाठी समाजप्रबोधन आणि मनोरंजन या दुहेरी हेतूनं कार्यक्रम चालायचे. जेमतेम मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यावर निळुभाऊंनी माळी कामाचा डिप्लोमा केला आणि पुण्याच्या आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी माळी म्हणून नोकरी केली. माळीकाम हे निळुभाऊंचं आवडतं काम. तिथे त्यांनी ११ वर्षे नोकरी केली. AFMC च्या परिसरात आज जी काही मोठी झाडं असतील ती कदाचित निळुभाऊंनीच लावलेली असतील. सुदैवानं बालगंधर्वांचे जावई कर्नल वाबळे तेव्हा गार्डन ऑफिसर होते. सेवा दलाच्या चळवळीविषयी ते जाणून होते त्यामुळे त्यांनी निळुभाऊंना थेट हेड माळी ही पोस्ट देऊन टाकली. शिवाय सेवा दलाच्या दौऱ्यांसाठी सुट्टीही द्यायचे.
 
निळुभाऊंना आणखी एक वेड होतं, ते म्हणजे उत्तमोत्तम इंग्रजी सिनेमे बघण्याचं. स्वातंत्र्यानंतरही काही इंग्रज अधिकारी भारतात होते. निळुभाऊ तेव्हा रेसकोर्सवर माळीकाम करायचे. निळुभाऊंची सिनेमाची आवड तिथला एक इंग्रज अधिकारी जाणून होता. त्यामुळे इंग्रजी सिनेमा लागला की तो अधिकारी स्वतःकडचे पैसे देऊन निळुभाऊंना इंग्रजी सिनेमे बघायला पाठवायचा. पुणे कॅम्पमधल्या वेस्ट-एण्ड थीएटरला तेव्हा इंग्रजी सिनेमे लागायचे. रोनाल्ड गोल्डमन, जेम्स डीन, चार्ल्स बोएर, हेपबर्ग यांचे सिनेमे ते आवर्जून बघायचे. निळुभाऊंचा एक मित्र त्याच थिएटरला कामाला होता. तो सिनेमागृह हाऊसफुल्ल असलं तरी प्रवेश द्यायचा. वेस्ट-एण्ड थीएटरच्या दरवाज्यात उभं राहून निळू भाऊंनी अनेक इंग्रजी सिनेमे पाहिले. नंतरच्या काळात टॉम हँकचा फॉरेस्ट गम्प हा सिनेमा त्यांनी सलग तीन दिवस आपली कन्या गार्गीसोबत लक्ष्मी रोडवरच्या विजय टॉकिजमध्ये बघितला. फॉरेस्ट गम्प या सिनेमाच्या कथेवर आणि टॉमच्या अभिनयानं ते भारावून गेले होते. अभिनय कसा असावा तर या दर्जाचा असावा असं ते आपल्या मुलीला गार्गीला कायम सांगत. याशिवाय बंगाली सिनेमा त्यांना विशेष आवडायचा. रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यकृती हा त्यांच्या आवडीचा विषय. मल्याळम, तमिळ सिनेमाबद्दलही त्यांना आकर्षण होतं. तिथल्या कलाकारांसारखं काम मराठीतही व्हावं अशी त्यांची इच्छा होती. अशा सर्व बाजूने निळू फुले समृद्ध होत होते. 
 
   देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातली गावं खेडी आता स्थिरावू लागली होती. त्यामुळे या गावांचा विकास नेमका कसा असावा याचं समाजप्रबोधन आणि मार्गदर्शन करणारी नाटकं त्यांनी बसवली. शिक्षण, शेती, पाणी हे विषय त्यावेळी नाटकात असायचे. राम नगरकर, ज्योती सुभाष, जयवंत दळवी, पुलं देशपांडे ही सगळी लोकं तेव्हा एकत्र काम करायची. 'दोन बायकांचा दादला' हे नाटक निळुभाऊंनी दिग्दर्शित केलं होतं. 'उद्यान' नावाचं नाटक त्यांनी स्वतः लिहिलं होतं. १९५७च्या निवडणुकीदरम्यानं सेवा दलासाठी त्यांनी 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हे वगनाट्य बसवलं. पु. ल. देशपांडेंच्या 'पुढारी पाहिजे' मधला 'रोंगे' विशेष गाजला. हल्ली नाटकाचे प्रयोग फक्त मुंबई, पुणे फारफार तर नाशकात होतात. पण त्यावेळी जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी प्रयोग व्हायचे. खूप दौरे केले, उभा महाराष्ट्र निळुभाऊंनी पालथा घातला. ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर तेव्हा आकाशवाणीसाठी कार्यक्रम करायचे. निळुभाऊंच्या अस्सल ग्रामीण लहेजामुळे माडगूळकरांच्या सगळ्या लोकनाट्यात ते असायचेच. माडगूळकरांचं निळुभाऊंवर अफाट प्रेम होतं. ६०च्या दशकात निळुभाऊंनी कलापथक, लोकनाट्य, नाटक असं खूप काम केलं. यामागे पैसा कमावणं हा उद्देश कधीच नव्हता. प्रत्येक काम त्यांनी सेवा म्हणून केलं. म्हणूनच आयुष्यभर आपल्या उत्पन्नातली ३० टक्के रक्कम त्यांनी दर महिन्याला गरजवंतांसाठी खर्च केली. 
 
 नाटक, नोकरी, सेवा दलाचं काम असं सगळं सुरळीत सुरू असताना समाजवाद्यांमध्ये फूट पडली. त्यानंतर निळुभाऊंनी राममनोहर लोहियांच्या संयुक्त समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर 'आंदोलन कलापथका'ची स्थापना केली. बिराजदारांच्या कथेवर आधारीत 'भलताच बैदा झाला' हे लोकनाट्य त्यांनी केली. पुढे 'लवंगी मिरची कोल्हापूरची', 'शिंगरू मेलं हेलपाट्यानं' अशी अनेक लोकनाट्य गाजवली. अमृत गोरेंच्या 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्यावर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं. निळुभाऊंची यातली पुढाऱ्याची भूमिका प्रचंड गाजली. एका चित्रपट निर्मात्यानं त्यांचा हा प्रयोग पाहिला आणि आपल्या सिनेमात अशाच एका पुढाऱ्याचा रोल दिला. निळुभाऊंचा हा पहिला सिनेमा होता 'एक गाव बारा भानगडी'. इथून पुढे पुढची चाळीस वर्षे मराठी सिनेमात निळु फुले हे सुपरस्टार खलनायकी ब्रॅन्ड झाले. त्यांची प्रसिद्धी किती आहे हे महाराष्ट्रातल्या बाया बापड्यांना विचारा. निळु फुले म्हणजे अख्या महाराष्ट्राचे सरपंच होते. निळू फुले माहिती नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. 
 
एका बाजूला सिनेमा तर दुसरीकडे नाटकंही सुरू होती. निळुभाऊंचं सर्वात लोकप्रिय नाटक म्हणजे सखाराम बाईंडर. विजय तेंडुलकरांच्या या नाटकानं जागतिक कीर्ती मिळवली. त्यातला विचित्र स्वभावाचा सखाराम हा निळू फुले यांनी एकहाती पेलला. हो पेललाच, कारण ही भूमिका करणं सोपं नव्हतं, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू यांनी ती भूमिका नाकारली होती.  जगाला फाट्यावर मारून जगणारा, कधी क्रूर वाटणारा, तर कधी हा कोणत्या मातीचा माणूस आहे? असा प्रश्न पडून प्रेक्षकांच्या डोक्याला मुंग्या आणणारा सखाराम हा निळुभाऊंनी समजून उमजून उभा केला. त्यानंतर तेंडुलकरांच्या 'बेबी' या नाटकात बहिणीसाठी समाजाशी दोन हात करून हरलेला भाऊ निळुभाऊंच्या रुपानं प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. त्यानंतर जयवंत दळवींच्या 'सूर्यास्त' नाटकातला अप्पाजी नाटकात आत्महत्या करत असला तरी निळुभाऊंच्या रुपानं अमर झाला. 
 
 निळुभाऊंना सिनेमाच्या सुरूवातीच्या काळात एकच प्रकारच्या भूमिका मिळाल्या. पुढारी, सरपंच, सावकार पण त्यातही त्यांनी वैविध्य आणलं. एकच प्रकारची भूमिका पण प्रत्येक सिनेमात ते वेगवेगळे भासत. सुरूवातीच्या काळात दादा कोंडके, अशोक सराफ, राम नगरकर यांच्या जोडीनं तुफान विनोदी, आशयघन आणि तितकेच सामाजिक संदर्भाला धरून असलेले सिनेमे केले. 'गल्ली ते दिल्ली' हा सिनेमा आजही बघा, ५० वर्षांनंतरही तो आजचाच वाटतो. दुसरीकडे तमाशापटांचा सुवर्णकाळ होता. 'पिंजरा' हा निळुभाऊंच्या कारकीर्दीतला आणखी एक मास्टरपीस. खरंतर मास्तर म्हणजे डॉक्टर लागू सिनेमाचे नायक होते. पण निळुभाऊंचा तो साईड रोल एखाद्या नायकापेक्षा कमी नव्हता. जेवढे डॉक्टर लागू आपल्याला लक्षात राहतात तेवढेच निळू फुलेही. 
 
'सामना' मराठीतला पहिला राजकीय पट. लेखक विजय तेंडुलकर, दिग्दर्शक जब्बार पटेल, सिनेमात निळुभाऊ आणि डॉ. श्रीराम लागू यांची जुगलबंदी. या सिनेमानं निळू फुले यांना प्रसिद्धीच्या अत्युच्च शिखरावर नेऊन ठेवलं. 'सामना'तल्या सहकार सम्राट हिंदूराव धोंडे पाटील या व्यक्तीरेखेची दखल 2013 साली फोर्ब्स मासिकानं घेतली. भारतीय सिनेमातील '25 Greatest Acting Performance' मध्ये निळुभाऊंच्या हिंदूराव धोंडे पाटीलचा समावेश होता. त्यानंतर दुसरा राजकीय सिनेमा म्हणजे 'सिंहासन'. खरं म्हणजे आतापर्यंत राजकीय पुढाऱ्यांच्या भूमिका वठवणाऱ्या निळुभाऊंना 'सिंहासन'मधला कुठल्याही पुढाऱ्याचा रोल शोभला असता. पण त्यांनी पत्रकार दिगू टिपणीस साकारला. तद्दन एकसुरी भूमिकांमधून बाहेर पडून निळुभाऊंनी ती भूमिकाही अजरामर केली. पुढे मराठीतल्या प्रत्येक निर्मात्या दिग्दर्शकाला निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू आपल्या सिनेमात हवे असायचे. डॉ. लागू त्यांना गंमतीनं महान हिंस्त्र नट म्हणायचे. सखाराम बाईंडरमधल्या माणसासारखेच निळुभाऊ असतील अशी कल्पना डॉ. लागुंनी केली होती. पण जसजसं त्यांच्यासोबत काम करत गेले तेव्हा त्यांना कळलं की निळुभाऊ हे सिनेमात, नाटकांत दिसतात त्याच्या अगदी उलट आहेत. नाटक संपल्यावर गांधीवादी डॉ. लागू आणि लोहियावादी निळू फुले यांच्यात तासंतास वैचारिक वाद रंगायचे. डॉ. लागू आणि निळुभाऊंनी अनेक सिनेमे आणि नाटकं सोबत केली. अभिनेत्री, दिग्दर्शिका सुषमा शिरोमणी यांनी मराठीत पहिल्यांदा स्त्री प्रधान सिनेमाचा ट्रेंड आणला. त्यातही लागू-फुले ही जोडी होतीच, सोबतीला अशोक सराफही. भिंगरी, भन्नाट भानू, मोसंबी नारंगी, फटाकडी असे सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले. या सिनेमातले खलनायक होते निळू फुले. हे सिनेमे गावागावातल्या जत्रांमध्ये लागायचे. गावाखेड्यातल्या लोकांनी या सिनेमांना डोक्यावर घेतलं होतं. तेव्हा निळू फुले या सिनेमातल्या पात्रावर गावाखेड्यातल्या बायका बोटं मोडत. शिव्या शाप देत. ही त्यांच्या अभिनयाची पावती होती. निळुभाऊ एकदा त्यांच्या कोल्हापुरच्या मित्राकडे जेवायले गेले होते. तेव्हा त्या मित्राच्या आईनं निळुभाऊंना ताटावरून उठवलं होतं. एवढा पराकोटीचा द्वेष गावाखेड्यातल्या महिला करायच्या. 
 
   निळुभाऊ कधीच कोणत्या भूमिकेच्या चौकटीत अडकले नाही. जेव्हा जेव्हा स्टेरिओटाईपपणा येत गेला तेव्हा त्यांनी त्या चौकटीबाहेरचं काहीतरी अस्सल करुन दाखवलं. 'चोरीचा मामला' सिनेमातला तो हातगाडी कामगार, 'शापित' सिनेमातला दलित म्हातारा या भूमिका ते समरसून जगले. मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, बिन कामाचा नवरा, कळत नकळत, जैत रे जैत, एक होता विदुषक, त्यांचा शेवटचा सिनेमा गोष्ट छोटी डोंगराएवढी किती तरी सिनेमांची नावं घेता येतील. दुसरीकडे हिंदीतही त्यांनी अमिताभ बच्चनसोबत 'कुली', अनुपम खेर यांच्यासोबत 'सारांश', दिलीप कुमारांसोबत 'मशाल', कमल हासनसोबत 'जरा सी जिंदगी' अशा सिनेमांमधून काम केलं. पण हिंदीत ते फार रमले नाही. तो ठसकेबाजपणा मराठीतच आहे हे त्यांना उमगल्यावर परत ते त्या वाटेला गेले नाही. 
 
   लोकमान्यता हा सिनेमा उत्तम असण्याचा एकमेव निकष आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. सध्याच्या मराठी निर्मात्या, दिग्दर्शक आणि कलाकारांसाठी खरंतर हा कानमंत्र आहे. जगात कोणत्या पद्धतीचा सिनेमा येतोय त्याच्याशी आपल्याला स्पर्धा करावी लागेल तरच मराठी सिनेमा पुढे जाईल असं ते सांगायचे. त्यासाठी ते इराणी सिनेमाचं उदाहरण देत. एका अत्यंत गरीब देशातला सिनेमा जागतिक दर्जाचा असू शकतो तर मग आपण का नाही? त्यासाठी विविध विषय हाताळले गेले पाहिजे असंही त्यांचं मत होतं. आजच्या कलाकारांना जर खरंच मराठी सिनेमाला पुढे न्यायचं असेल तर निळू भाऊंसारखी दूरदृष्टी असायला हवी. पण हल्लीची परिस्थिती बघून वाईट वाटतं. ज्या कलाकारानं मराठी सिनेमाला उंचीवर नेऊन ठेवलं, ते निळुभाऊ एक नट म्हणून तर मोठे होतेच. पण माणूस म्हणून त्यांचं कार्य अफाट होत. चळवळीसाठी उन पावसात भटकलेल्या या महान कलाकाराची नक्कल करताना आजच्या नकलाकारांनी थोडं तरी भाव ठेवायला हवं. 'बाई वाड्यावर या' हे तीन शब्द म्हणजे त्यांची कारकीर्द नाही. सतत तेच तेच हिडिस आणणारे विनोद करून ना तुम्ही मोठे होणार ना मराठी सिनेमा. त्यासाठी निळू फुले या माणसाला वाचता यायला हवं. 
 
नैसर्गिक अभिनय वगैरे हा ट्रेंड हल्ली दहा वर्षात फार वाढला. पण निळू फुले यांना त्याकाळात नैसर्गिक अभिनयासाठी ओळखलं जायचं. कदाचित जागतिक सिनेमा बघून बघून ते त्यांच्यात उतरलं असावं. दुसरं एक कारण म्हणजे त्यांचं अफाट वाचन. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले यांच्या साहित्याचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. दलित साहित्याच्या माध्यमातून दीन दुबळ्यांचं जगणं त्यांनी समजून घेतलं. निळुभाऊंच्या पत्नी रजनीताई यांची उर्दू भाषेवर पकड होती. त्यातही गझल त्यांना विशेष आवडे. काही शब्दांचा अर्थ समजला नाही तर रजनीताई तो समजावून सांगत. या सगळ्या प्रवासात रजनी ताईंचा उल्लेख करणं क्रमप्राप्त आहे. सतत महिनोन्महिने निळुभाऊ बाहेर असूनही त्यांनी घर सांभाळलं आणि मुलीवर उत्तम संस्कार केले. निळुभाऊ घरी असले तरी कायम लोकांचा राबता घरात असायचा. त्यामुळे घरात चहाचं पातेलं कायम गॅसवरच असायचं. रजनीताईंनी ते सगळं केलं. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून, सिनेसृष्टीतले अनेक नट यांची उठबैस घरात कायम असायची. अशोक सराफ, अभिनेत्री रंजना, मोहन गोखले, नाना पाटेकर, अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत पहाटेपर्यंत चर्चा चालायच्या. फक्त सिनेमाच नाही तर पुण्यातले चळवळीतले कार्यकर्ते बाबा आढाव, भाई वैद्य, अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करणारे नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबतही गप्पा व्हायच्या. त्यावेळी सामान्य कार्यकर्त्यांच्या आयुष्यात आपण कसा बदल आणू शकतो हाच विचार या सगळ्या मंडळींचा असायचा. 
 
निळुभाऊ तेव्हा समाजवादी पक्षाचं काम करायचे. त्यामुळे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव, राज बब्बर यांचंही निळू भाऊंकडे येणं असायचं. एकीकडे सिनेमा तर दुसरीकडे राजकारण आणि समाजकारण हा सर्व समतोल त्यांनी उत्तम प्रकारे साधला. देश स्वतंत्र होण्यापासून, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अनेक उलथापलथीचे साक्षीदार निळुभाऊ होते. शिवसेनेचा उदय, आणिबाणीचा काळ, काँग्रेसमधली फूट, पुलोद सरकारनंतर बदललेलं राजकारण, धार्मिक दंगली अशा अनेक घटना त्यांनी पाहिल्या. पण कधीच दलबदलूपणा केला नाही. कुठल्या राजकीय पक्षाशी वा नेत्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला नाही. ते आपल्या विचारांशी प्रामाणिक होते. राष्ट्र सेवा दलाचा सर्व धर्म समभावाचा संस्कार आणि संयुक्त समाजवादी पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहून ते आजन्म लोहियावादी म्हणून जगले. सिनेमाच्या पडद्यावर त्यांच्यासारखा खलनायक पुन्हा होणार नाही, तसाच खऱ्या आयुष्यात त्यांच्यासारखा नायकही आता होणे शक्य नाही. माणसानं आयुष्य कसं आणि कशासाठी जगावं? याचा अध्याय म्हणजे 'निळू फुले' हे दोन शब्द. 
आदरांजली 
अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय
संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय
Chandrashekhar Bawankule : 90 घेऊन कधी युती टिकते का? राऊतांनी मविआत वादाची ठिणगी पाडताच बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, पवार साहेबांना...
90 घेऊन कधी युती टिकते का? राऊतांनी मविआत वादाची ठिणगी पाडताच बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, पवार साहेबांना...
Sanjay Raut: उदय सामंतांना बाजूला सारुन पुढे आले, म्हणाले मी उत्तर देतो! राऊतांच्या राजकीय दलालीच्या आरोपावर संजय नहार काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंना पुरस्कार का दिला? राऊतांच्या राजकीय दलालीच्या आरोपावर संजय नहार काय म्हणाले?
Sharad Pawar & Sanjay Raut: संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 12 February 2025Amol Kolhe on Sanjay Raut | शरद पवारांची ही वैयक्तिक भूमिका, अमोल कोल्हेंचे राऊतांना उत्तरABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11AM 12 February 2025Uddhav Thackeray on Sharad Pawar | पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर उद्धव ठाकरेंची तीव्र नाराजी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय
संपूर्ण जगाने ज्यासाठी इतकी वर्षे प्रयत्न केले ते सगळं केरात जाणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय
Chandrashekhar Bawankule : 90 घेऊन कधी युती टिकते का? राऊतांनी मविआत वादाची ठिणगी पाडताच बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, पवार साहेबांना...
90 घेऊन कधी युती टिकते का? राऊतांनी मविआत वादाची ठिणगी पाडताच बावनकुळेंचा खोचक टोला; म्हणाले, पवार साहेबांना...
Sanjay Raut: उदय सामंतांना बाजूला सारुन पुढे आले, म्हणाले मी उत्तर देतो! राऊतांच्या राजकीय दलालीच्या आरोपावर संजय नहार काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंना पुरस्कार का दिला? राऊतांच्या राजकीय दलालीच्या आरोपावर संजय नहार काय म्हणाले?
Sharad Pawar & Sanjay Raut: संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
संजय राऊतांचा शरद पवारांवर हल्लाबोल, नातू ढाल म्हणून पुढे सरसावला, भाजपला वादात खेचलं
Nashik Crime : नाशिकमध्ये बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास
नाशिकमध्ये बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ, घातपाताचा संशय, मृतदेहाजवळ आढळली दारूची बाटली अन् ग्लास
Sanjay Raut : शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी शरद पवारांना सुनावले खडेबोल; आता शिंदे गटाची राऊतांवर बोचरी टीका, म्हणाले...
Maharashtra Politics: शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; सुषमा अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंचा सत्कार; अंधारे म्हणाल्या, जे व्यवस्थेची चिरफाड करतात त्यांना...
VIDEO : सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा अंदाज बदलला, साडीमध्ये ग्लॅमरस अदा दाखवतानाचा व्हिडीओ चर्चेत
सिनेमाची ऑफर मिळताच मोनालिसाचा तोरा बदलला, साडीमधील ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ चर्चेत
Embed widget