Guillain Barre Syndrome : पुणे, सोलापूरनंतर जीबीएसचा खान्देशात शिरकाव, नंदुरबारमधील दोन बालकांना लागण; एकाची प्रकृती चिंताजनक
Guillain Barre Syndrome : पुणे, सोलापूर, नागपूर, सातारा पाठोपाठ आता जीबीएस आजाराने खान्देशात शिरकाव केलाय. नंदुरबारमधील दोन बालकांना जीबीएस आजाराची लागण झाली आहे.

Guillain Barre Syndrome : पुण्यापाठोपाठ राज्याच्या इतर भागातही गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस (GBS) या दुर्मिळ आजाराचे रुग्ण सापडण्याचे प्रकार सुरुच आहे. पुणे, सोलापूर, नागपूर, सातारा पाठोपाठ आता जीबीएस आजाराने खान्देशात शिरकाव केलाय. नंदुरबारमधील (Nandurbar News) दोन बालकांना जीबीएस आजाराची लागण झाली आहे. यामुळे नंदुरबारमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नंदुरबार येथे जीबीएसचे दोन रुग्ण आढळले असून दोन्ही रुग्ण हे लहान बालकं आहेत. तर दोघांपैकी एक रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. चिंताजनक असलेल्या लहान बालकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. ज्या गावातून हे रुग्ण आढळले आहेत. त्या ठिकाणाच्या पाणीच्या तपासणी केली जाणार आहे.
नंदुरबारमध्ये आरोग्य विभाग सतर्क
दरम्यान, नंदुरबारमध्ये जीबीएसचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नंदुरबारमध्ये 20 आयसीयू बेड तयार करण्यात आले आहेत. जीबीएस या आजारासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अहिल्यानगरमध्ये आढळले जीबीएसचे चार रुग्ण
दरम्यान, अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात जीबीएसचे चार रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. हे चौघंही रुग्ण शहराबाहेरील असून एकाला पुण्याच्या ससूनमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर इतर तिघांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नाशिक महानगरपालिका अलर्ट मोडवर
दरम्यान, जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. नाशिक महापालिकेच्या दोन रुग्णालयात विशेष कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयात विशेष कक्षाची स्थापना केली आहे.
'जीबीएस' आजार नेमका काय?
गुलेन बॅरी सिंड्रोममध्ये बाहेरील विषाणू किंवा जिवाणूंवर हल्ला करणारी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात, असे या आजाराचे स्वरूप आहे. स्नायू कमकुवत होऊ शकतात. हाता-पायातील संवेदना कमी होऊ शकते. गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. प्रौढांमध्ये आणि पुरुषांमध्ये ही समस्या अधिक असून, सर्वच वयोगटांतील लोकांना याचा त्रास होऊ शकतो.
'जीबीएस'ची लक्षणे काय?
- बरा न होणारा ताप, सर्दी, खोकला,
- सातत्याने अशक्तपणा,
- हात, पाय, चेहऱ्यावरील स्नायूंना अर्धांगवायूचा झटका येणे,
- छातीमध्ये प्रादुर्भाव होऊन श्वास घेण्यास त्रास होणे,
- बोलण्यासह अन्न गिळण्याचा त्रास होणे,
- रक्तसंसर्ग होऊन फुफ्फुसात गुठळ्या अन् हृदयविकाराचा झटका येणे,
- न्यूरोलॉजिकल गुंतागुंतीत वाढ,
- जास्त दिवस डायरियाचा त्रास होणे,
काय काळजी घ्यावी?
- पाणी उकळून व गाळून प्यावे.
- उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
- अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

























