Waygaon Turmeric : वायगावच्या हळदीचं वेगळेपण काय? का वाढतेय या हळदीला मागणी....
वर्धा (Wardha) जिल्ह्यातील वायगावची हळद (Waygaon Turmeric) ही प्रसिद्ध आहे. ही हळद आरोग्य वर्धक आहे.
Waygaon Turmeric : वर्धा (Wardha) जिल्ह्यातील वायगावची हळद (Waygaon Turmeric) ही प्रसिद्ध आहे. ही हळद आरोग्य वर्धक आहे. वायगावच्या हळदीला भौगोलिक मानांकन देखील मिळालं आहे. वायगाव गावात उत्पादित होणाऱ्या हळदीला वायगाव हळद असे नाव रुढ झाले आहे. समुद्रपूर तालुक्यात वायगाव जातीच्या हळदीची लागवड परंपरेने होत आहे. या हळदीला भौगोलिक मानांकन मिळाल्याने आणि औषधी गुणधर्मामुळे बाजारात इतर हळदीच्या तुलनेत अधिक भाव मिळत असतो. ही हळद देशभरातील खवय्याच्या अन्नाची पोषकता आणि चव वाढवते , म्हणून या हळदीला मोठी मागणी असते.
या हळदीत विशेष काय?
या हळदीचा रंग इतर हळदीच्या तुलनेत गडद पिवळा असून चवही वेगळी आहे. या हळदीत तेलाचे प्रमाण जास्त असून त्याचा गंधही चांगला आहे. खाद्यपदार्थात अगदी थोडी जरी हळद टाकली तरी पदार्थाचा रंग बदलतो. ही हळद आरोग्यदायी असून रोगप्रतिकारकक्षमता वाढविते. कर्करोग, मेंदूविकार, वातविकार, सर्दी, ताप, खोकला, त्वचाविकार इत्यादींवर ती गुणकारी असल्याचं सांगितलं जातं. मुघल काळापासून परंपरागत पद्धतीने जपलेले वाण आहे. कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता पूर्णत: नैसर्गिक पद्धतीने घेतलेले पीक आणि त्यामुळेच या हळदीला चांगली मागणीही आहे.
या हळदीचा अर्क हा कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी उपयुक्त असतो, असे नवीन संशोधनात दिसून आले आहे. अलीकडे संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार हळदीतील कुरकुमीन हे संयुग वेगळे काढून त्याचा वापर कर्करोगग्रस्त पेशी मारण्यासाठी करता येतो.
अक्षय्य तृतीयेपासून हळदीची लागवडीला सुरुवात होते
वायगाव हळद लागवडीसाठी मातृ कंदाचा वापर करण्यात यायचा. अद्यापही पारंपारिक हळद उत्पादक मातृकंद लागवडीला पसंती देतात. मात्र व्यावसायिक दृष्टीने अधिक क्षेत्र लागवड करण्यासाठी हळदीच्या शेंगाचा वापर व्हायला लागला आहे. हळदीची लागवड साधारणपणे अक्षय्य तृतीयेपासून सुरु होते. या भागात हळदीचे पिक नैसर्गिक पावसावर अवलंबून आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे ते शेतकरी प्रवाही सिंचन पद्धतीचा वापर अद्यापही करतात. मात्र, सध्या काही शेतकरी तुषार आणि ठिबक सिंचनाचा वापर करतात. वायगावचे 80 टक्के शेतकरी पूर्वी हळदीचे उत्पादन घ्यायचे. सध्यस्थितीत मात्र हे प्रमाण कमी झाले आहे.
पोस्टाच्या पाकिटावर वर्ध्याची वायगाव हळद
वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध वायगाव हळदीला देशात प्रसिद्ध करण्यासाठी टपालखात्याने अनोखी शक्कल लढवली आहे. पोस्टाचे पाकीट तयार करून त्यावर वायगाव हळदीच्या माहितीची छपाई करण्यात आली आहे. भारतीय टपाल विभागाच्या पोस्टमास्टर जनरल, नागपूर विभाग प्रमुख शोभा मधाळे यांच्या हस्ते जुलै महिन्यात पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करण्यात आले होते. वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळद संपूर्ण देशात प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने भारतीय टपालखात्याच्या वतीने भन्नाट शक्कल लढवण्यात आली आहे. वायगाव हळदीच्या सुगंधासह रंगही देशभरात पसरवण्यासाठी टपालखात्याकडून महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: