ठाणेकरांनी भात शेतीला बगल देत केली सेंद्रिय हळद लागवड
Thane : पूर्वी किचकट मानले जाणारे सेंद्रिय हळद उत्पादन आता शेतकऱ्यांना लोखोंचे उत्पन्न देत आहेत.
Thane Latest Marathi News : कोकणातील ठाणे जिल्हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे. ठाणे जिल्ह्यात हजारो हेक्टर जमिनीवर विविध जातीच्या भाताची लागवड करत शेती केली जाते. मात्र गेल्या काही वर्षात अवकाळी पावसामुळे दरवर्षी भात पिके नष्ट होऊन त्याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पर्याय भात शेतीला जोड व्यवसाय म्हणून सेंद्रिय पद्धतीने हळद लागवडीच्या शेतीतून आर्थिक उत्पन्न मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. यामुळे भात शेती पेक्षा जादा नफा देणारी सेंद्रिय हळद लागवड ठरल्याचे शेतकरी सांगत आहे.
राज्यात पूर्वी काही पिकांची विशिष्ट भागातच लागवड केली जात असे. आता मात्र पीक पद्धतीत बदल होत असून सांगली-सातारा, विदर्भ, मराठवाडा, भागात घेतल्या जाणाऱ्या सेंद्रिय हळदीची लागवड आता कोकणातील ठाणे जिल्ह्यातील शेतकरी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वी किचकट मानले जाणारे सेंद्रिय हळद उत्पादन आता शेतकऱ्यांना लोखोंचे उत्पन्न देत आहेत. त्यामुळे शहापूर तालुक्यातील खर्डी नजीकच्या बेडेकोन व टेंभा येथील शेतकरी रामनाथ उंबरगोंडे व प्रकाश कोर यांनी आपल्या शेतावर भात पिकाला जोड धंदा म्हणून वायगाव व प्रगती जातीच्या हळदीची लागवड केली आहे.
सेंद्रिय हळद काढणीची प्रक्रिया अवघड असल्याने शेतकरी लागवडीला कचरत असत. नवखे शेतकरी हळदीच्या लागवडीचा विचारही करत नव्हते. आता मात्र ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पुढे सरसावले असून सेंद्रिय हळदीची पिके घेत एकरी आठ-दहा लाख रुपयांचेही उत्पन्न घेत आहेत. सेंद्रिय हळद ही शेतावर अंतरपीक म्हणून ही घेता येते, हळदीच्या काढणीसाठी लागणारे मनुष्यबळ, तसेच काढणी झाल्यावर शिजविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लागणार लाकूडफाटा, तसेच सदर हळद सुकवून पुन्हा मशीनमध्ये तिची पावडर बनवून ती पॅकिंग करून विक्री साठी बाजारात आणली जाते.
ही हळद पूर्णपणे सेंद्रिय व आयुर्वेदिक असल्यामुळे तिला बाजारात एका किलो मागे 350 ते 400 रुपये भाव मिळत आहे. पुढील काळात ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळद लागवड होऊन शेतकऱ्यांना जोड धंदया सोबत चांगला आर्थिक फायदा ही होऊ शकतो, असा विश्वास सेंद्रिय हळद लागवडीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सेंद्रिय हळद आरोग्याविषयी गुणकारी असल्याने राज्य शासनाकडून सेंद्रिय हळद पिकाला एका हेक्टरी मागे बारा हजार रुपये सबसिडी देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शिवाय 18 ते 20 किलो बियाणेपासून 300 ते 400 किलो ओली हळदीचे उत्पन्न मिळत असून या हळदीला सुकवून त्यानंतर त्याची पावडर करून बाजारात विक्री करीत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.