(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nandurbar : पपईवर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव, जिल्ह्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्र बाधित; शेतकरी पिकावर फिरवतायेत रोटावेटर...
राज्यातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण अनेक ठिकाणी पपईच्या बागांवर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे.
Agriculture News: यावर्षी राज्यातील पपई उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण अनेक ठिकाणी पपईच्या बागांवर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पपईच्या बागांवर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहे. तर काही शेतकरी पपईच्या उभ्या बागांवर रोटावेटर फिरवत असल्याचं चित्र दिसत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तीन हजार हेक्टर क्षेत्रातील बागा प्रभावित
यावर्षी दुष्काळी परिस्थितीत मोठ्या मेहनतीने नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांनी पपई बागा जागवल्या. मात्र, मोझ्याक व्हायरसमुळं जिल्ह्यात जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्रातील बागा प्रभावित झाल्या आहेत. तीन महिन्यांत बागांवर मोठ्या प्रमाणात फवारणी करून प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकऱ्यांनी बागांवर रोटाव्होटर फिरवायला सुरवात केली आहे.
नंदुरबार देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा
देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली आहे. त्यापैकी तीन हजारपेक्षा अधिक क्षेत्रावर मोझ्याक व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या तीन महिन्यापासून बागा वाचवण्यासाठी शेतकरी महागड्या फवारणी करत होते. मात्र उपयोग होत नसल्याने आता शेतकऱ्यांनी पपई बागांवर रोटावेटर फिरवण्यास सुरुवात केली आहे. पपई लागवडीवर शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला आहे. त्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पपई उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं नंदुरबार जिल्ह्यात पपई संशोधन केंद्र सुरू करावे, त्यासोबतच मोझ्याक व्हायरसमुळं नुकसान झालेल्या पपई उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. सरकारचे पपई उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे काही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
देशातील सर्वात मोठा पपई हब म्हणून नंदुरबार जिल्ह्याकडे पाहिले जात असते. दरवर्षी पपई पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत असतो मात्र पपईवर संशोधन करण्यासाठी पपई संशोधन केंद्र राज्यात कुठे नसल्याने पपई उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात त्यामुळे नंदुरबार येथे केंद्र आणि राज्य सरकारने पपई संशोधन केंद्र सुरू करून पपईवर येणाऱ्या विविध रोगांवर संशोधन होणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
नंदुरबार जिल्ह्यातील पपई पिकावर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव, रोगामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला