Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Nashik District Vidhan Sabha Election Result 2024 : नाशिक जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने निवडणूक लढवली होती.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने (Mahayuti) 288 पैकी 236 जागा जिंकत नवा इतिहास रचला आहे. महायुतीच्या महालाटेत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) अक्षरशः धुव्वा उडाला. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. नाशिक जिल्ह्यात शरद पवार गटाने पाच जागा लढवल्या. मात्र एकही जागा शरद पवार गटाला जिंकता आली नाही. त्यामुळे नाशिकमध्ये नाशिकमध्ये शरद पवारांची (Sharad Pawar) 'पॉवर' फेल ठरल्याचे दिसून येत आहे.
शरद पवार यांच्या शब्दावर नाशिक जिल्ह्याने 1985 साली तब्बल 14 आमदार निवडून देण्याची किमया केली होती. त्यामुळे नाशिक आणि शरद पवार हे एक समीकरण दृढ झाले. जिल्ह्यात शरद पवार यांना माननारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादीतील फाटाफुट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्ह्यतील सहाही आमदार अजित पवार गटात गेले. परंतु काही मंडळींनी शरद पवारांची साथ संगत करत राष्ट्रवादीची फेर बांधणी केली. त्याचा परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जाणवला. नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने झेंडा फडकविला. परिणामी विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्यांच्या इच्छुकांत मोठी रस्सीखेच निर्माण झाली होती. एकाच जागेसाठी डझनभर इच्छुक पुढे आले. परंतु आता प्रत्यक्ष निकालानंतर काकांपेक्षा पुतण्याच भारी ठरल्याचे चित्र आहे.
लोकसभेत शरद पवारांची हवा
आज शरद पवार यांच्या पक्षाला जिल्ह्यात एकही जागा मिळविता आलेली नाही. लोकसभा निवडणुकीत जी पॉवर दिसून आली ती विधानसभा निवडणुकीत कुठे हरविली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यात निफाड, येवला भागाचा दौरा केला. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी घोषणा सर्वदूर पसरली. परिणामी दिंडोरी मतदार संघात भाजपाच्या केंद्रीय मंत्री असलेल्या भारती पवार यांना नवख्या भास्कर भगरे यांनी पराभवाची धुळ चारली. तर नाशिकमध्येही राजाभाऊ वाजे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आणि त्यांनी हेमंत गोडसेंचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. शरद पवारांची ही जादू विधानसभेतही कायम राहिल, असे वातावरण नंतर निर्माण झाले परंतु ही हवा फार काळ टिकली नाही.
काकांची पॉवर का ओसरली?
लोकसभेची जी लाट होती. ती विधानसभेत गायब झाली. सहा जागा असताना त्यांनी पाचच जागांवर उमेदवार उभे केले. त्यातही उमेदवार जाहीर करताना कमालीचा विलंब लावला. शिवाय ज्यांनी पहिल्यापासून पक्षाची धुरा सांभाळली त्यांच्याऐवजी ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देत तुतारी फुंकायला लावली. येवला, दिंडोरी, पिंपळगाव, नाशिक पूर्व, सिन्नर या मतदार संघात एकाच दिवशी सभा घेतल्या. या सभांना प्रतिसादही चांगला मिळाला. दिंडोरी आणि येवल्यात आक्रमकपणे भाषण केले. परंतु काकांपेक्षा पुतणे अजित पवार यांचीच पॉवर निकालात दिसून आली. पूर्वी सहाच जागा राष्ट्रवादीच्या होत्या. त्यात इगतपुरीच्या हिरामण खोसकर यांच्यामुळे एकीची भर पडली. अवघ्या तीन-चार महिन्यातच काकांची पॉवर का ओसरली? अशा चर्चांना आता उधाण आले आहे.