Sharad Pawar Full Speech : भाजपसह गेलेले संधीसाधू, आता सोबत घेणार नाही, पवारांचं वक्तव्य ABP MAJHA
Sharad Pawar and Ajit Pawar NCP: सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, असे वारंवार म्हटले जात आहे. पण सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तरी त्यांना सोबत घेऊ. पण जे सत्तेसाठी भाजपसोबत (BJP) गेले, ही भूमिका कोणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा नाही. कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नाहीत, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. ते मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमात बोलत होते. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही गट एकत्र येण्याच्या आशा मावळल्याची चर्चा सुरु झाली आहे.
आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे. विकास असा करायचा आहे, ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढं ही टिकून राहणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.




















