धुलिवंदन-रंगपंचमीसाठी लोणावळा, मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळी येणाऱ्यांवर निर्बंध
पुणे : होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी साजरी करण्यासाठी तुम्ही पर्यटनस्थळी येत असाल तर ही बातमी अतिशय महत्वाची आहे. कारण, वाढत्या कोरोनाच्या अनुषंगाने लोणावळा आणि मावळ तालुक्यातील पर्यटनस्थळी निर्बंध घालण्यात आले आहेत. नियम झुगारल्यास कारवाई केली जाणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी तसे आदेश काढले आहेत. होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण एकत्रित रित्या साजरा करता येणार नाहीत. जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, खाजगी मोकळया जागा आणि सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा इथं हे नियम लागू असतील.
कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने देशासह राज्य अनलॉकच्या दिशेने पावलं टाकू लागलं. पण कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने राज्यावर पुन्हा चिंतेचे ढग दाटू लागले. त्यामुळे महानगरांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने कठोर निर्बंध लावायला सुरुवात झाली आहे. अशातच होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचे सण साजरा होणार आहेत. त्यामुळेच हे सण साजरा करण्यासाठी अनेकांच्या नजरा पर्यटनास्थळाकडे वळणार, तसे अनेकांनी नियोजन ही करायला सुरुवात केली असावी.























