Pune Vanraj Andekar : पुण्यातील आंदेकर खुनाप्रकरणी मोठी अपडेट, 22 जणांवर मोक्का
मुंबई : राज्याची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे शहरातील गुन्हेगारी गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चव्हाट्यावर आली आहे. ड्रग्ज, हत्या, गोळीबाराच्या घटनांनी पुणे शहर हादरुन गेलं आहे. त्यामुळे, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात माजी नगरसेवकाचा भररस्त्यात खून करण्यात आला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. तसेच, पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा नव्याचे चर्चेत आला. माजी नगरसेवक वनराज आंदेकर खूनप्रकरणात पोलिसांनी कारवाई करत 22 आरोपींना अटक केली. यातील काही आरोपींना चक्क ताम्हिणी घाटातून बेड्या ठोकल्या होत्या. आता, वनराज आंदेकर प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 22 आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर (वय 40) यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे, या आरोपींच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.