Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार
Ajit Pawar And Sharad Pawar NCP Pune Municipal Election 2025: राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये मतदान 15 जानेवारीला पार पडेल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. यादरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) एकत्र येण्याबाबत चर्चा जोर धरत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे अजित पवारांच्या (Ajit Pawar) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चांगली पकड असून, येथे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याचदरम्यान, आता राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. (Pune Municipal Election 2025)
पुण्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. अजित पवारांना याबाबत प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. त्यामुळे शशिकांत शिंदेंचा प्रस्ताव अजित पवार स्वीकारणार की नाही?, याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तसेच या प्रस्तावामुळे पुण्यात अजित पवार महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीच्या 25 किंवा 26 तारखेला घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली. (Pune Municipal Election 2025)























