Pune Amitesh Kumar PC : Porshe Car : पोर्शे अपघात प्रकरणाबाबत पोलिसांचा धक्कादायक खुलासा ABP Majha
पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणातील आरोपीच्या रक्ताच्या चाचणीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक महत्वाची माहिती समोर आणली आहे. रविवारी पहाटे अडीच वाजता अपघात (Pune Car Accident) झाल्यानंतर 11 वाजता अल्पवयीन आरोपीची पहिल्यांदा रक्ताची चाचणी (Blood Test) करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीची पुन्हा एकदा ब्लड टेस्ट झाली. या दोन्ही ब्लड टेस्टचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या ब्लड टेस्टचे नमुने एकाच व्यक्तीचे आहेत की, नाही हे तपासून घेण्यास सांगितले आहे. हे दोन्ही रक्ताचे नमुने आरोपीचेच आहेत का, याची खात्री अद्याप फॉरेन्सिक लॅबकडून झालेली नाही, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.
आम्ही आरोपीवर सर्वप्रथम 304 अ कलमातंर्गत गुन्हा दाखल केला होता. यामध्ये फक्त तीन वर्षांची शिक्षा आणि यामध्ये जामीन मिळण्याची मुभा होती. पण त्यानंतर आम्ही नंतर आरोपीवर 304 कलमातंर्गत गुन्हा दाखल केल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
पोलिसांनी पहिल्याच एफआयरमध्ये आरोपीवर 304 कलम का लावले नाही, पोलीस ठाण्यात आरोपीला कोणत्या सुविधा पुरवण्यात आल्या का, या सगळ्याची चौकशी करण्यात आल्या. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य आढळून आले नाही. आम्ही हे प्रकरण धसास लावण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करु आणि हे प्रकरण अंतिम निष्कर्षापर्यंत नेऊ, असे आश्वासन अमितेश कुमार यांनी दिले.