Parbhani News : परभणीत बंदला हिंसक वळण; नेमकं काय घडलं?
परभणी : शहरांतील संविधानाच्या पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. तसेच, विटंबना करणाऱ्याला जमावाने ताब्यात घेऊन चोप दिला होता. तर, पोलिसांनीही (Police) त्याला अटक करून गुन्हा दाखल केलेला. त्यामुळे, काल सर्वांनी एकत्र येवून शांततेत बंद करणार असल्याचं प्रशासनाला कळवलं होतं. मात्र , तसं झालं नाही, आज आंदोलनादरम्यन मोठी हिंसा झाली. ज्या काही लोकांनी हिंसा केलेली आहे, अशा आतापर्यंत 40 जणांना आम्ही ताब्यात घेतले असून पोलीस नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली आहे. परभणीतील (Parbhani) हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शहरात जमाबबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते. तर, मोठा पोलीस फौजफाटाही रस्त्यावर तैनात असल्याचं पाहायला मिळालं.
परभणी शहरात आज झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड आणि वाहनांचे टायर जाळले, जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी केली, या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी, घटनेसाठी जबाबदार असलेल्या 40 लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शहाजी उमाप यांनी दिली. परभणी शहरात सध्या जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही, परिस्थिती हाताळण्यासाठी संचार बंदीची आवश्यकता वाटत नाही, असेही उमाप यांनी स्पष्ट केले. SRPF शहरात बोलावण्यात आली आहे, संवेदनशील ठिकाणी आम्ही त्यांचा वापर करणार असल्याचेही शहाजी उमाप यांनी स्पष्ट केले.