Mumbai University : मुंबई विद्यापीठातील ग्रंथालयाची दुरावस्थेची उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून दखल
बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची. मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयातील पुस्तकांच्या दुरवस्थेची बातमी 'एबीपी माझा'नं दाखवल्यानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून त्याची तातडीनं दखल घेण्यात आली आहे. या ग्रंथालयाचं नव्या इमारतीत स्थलांतर करण्यासंदर्भात दोन मार्च रोजी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. सर्व पुस्तके नव्या इमारतीत कधी स्थलांतरित होणार याबाबत बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात जाऊन खराब झालेल्या पुस्तकांची पाहणी केली. मुंबई विद्यापीठाच्या ४७ वर्षे जुन्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयात हजारो पुस्तकांचं वाळवीमुळं नुकसान झालं आहे. अनेक पुस्तकांचे दोन तुकडे झाले आहेत, मोठ्या संख्येने पुस्तके रद्दीत देण्यात येत आहेत. याच ग्रंथालयातील दुरवस्थेबाबत एबीपी माझानं बातमी साहित्यप्रेमींसमोर आणून, तेथील ग्रंथसंपदा जतन करण्यासंदर्भात आवाहनही केलं आहे.