अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले?
Anil Deshmukh Attack : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. त्यामध्ये देशमुखांच्या डोक्याला जखम झाल्याचं दिसून आलं.
नागपूर : अनिल देशमुख यांच्यावर दगडफेकीच्या माध्यमातून हल्ला झाल्याचं प्रकरण राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारं ठरलंय खरं. मात्र या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात सर्वात आधी उपचार करणारे डॉ. पंकज करंडे तसेच नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे.
डॉ. करंडे यांच्या मते अनिल देशमुख यांना झालेली जखम खरचटने आणि त्यानंतर सूज येणे या श्रेणीची आहे. या जखमेचे निदान त्यांना सोमवारी झालं होतं. मात्र जेव्हा अनिल देशमुख उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पोहोचले होते. तेव्हा त्यांनी तीव्र डोकेदुखीची तक्रार केली होती. त्यामुळे अनिल देशमुख यांना काटोल मधील ग्रामीण रुग्णालयातून सिटीस्कॅन साठी नागपूरच्या मॅक्स रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे डॉ. करंडे म्हणाले.
एवढेच नाही तर अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत हल्ल्याच्या वेळेला दोन बाईकवर बसून चार हल्लेखोर आले होते असं म्हटलंय. मात्र पोलीस अधीक्षक यांनी तपासानंतर दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या आधी आणि घटनेनंतर अनेक तासापर्यंत जवळचा जो पहिला सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाला आहे, त्यामध्ये दोन बाईकवर चार लोक बसून जाताना दिसत नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील कथित हल्लेखोर नेमके कुठून आले होते आणि ते कुठे गेले असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिलेली इतर अनेक मुद्द्यांवरील माहिती या प्रकरणासंदर्भात नवे प्रश्न निर्माण करणारी आहे.
पोलिसांच्या तपासातून काय समोर?
- अनिल देशमुख यांच्या कारच्या समोरील काचेवर पडलेला दगड 8 किलोचा होता.
- त्या 8 किलोच्या दगडाचा व्यास आणि तुटलेल्या wind screen चे व्यास प्राथमिक दृष्ट्या साम्यता नाही.
- दगड wind screen तोडून बोनटवर पडला तरी बोनटवर कुठेही स्क्रॅच नाही, बोनट चेपलेले नाही.
- दुसरा दगड दीड ते दोन किलोचा आहे. तो समोरील सीटवर बसलेल्या अनिल देशमुख यांच्या पायाशी पडला. मात्र अनिल देशमुख यांच्या बाजूच्या काचेच्या खिडकीला कुठली ही तुटफूट झालेली नाही. त्यामुळे दुसरा दगड जो अनिल देशमुख यांना जखमी करून गेला, तो दगड कार मध्ये मागील सीटच्या खिडकीतून आत गेला का असा प्रश्न निर्माण झाला आहे. फॉरेन्सिक टीम त्याचा तपास करत आहे..
- विशेष म्हणजे कारच्या आतमध्ये तसेच बाहेरच्या बाजूला घटनास्थळी रस्त्यावरही रक्ताचा एक ही थेंब आढळलेला नाही.
- घटनास्थळापासून जवळच्या भारशिंगी गावापर्यंत कुठलाही सीसीटीव्ही नाही. पहिला सीसीटीव्ही जिथे आहे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेच्या पूर्वीपासून पुढील अनेक तासापर्यंत दोन बाईकवर चार लोक बसून जाताना दिसलेले नाही.
- अनिल देशमुख यांनी अद्याप त्यांची साक्ष दिलेली नाही.
- अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक ज्यांनी या प्रकरणी तक्रार दिलेली आहे. त्यांनीही अद्याप त्यांची साक्ष दिलेली नाही.
पोलिसांनी या प्रकरणी फॉरेन्सिक टीमची मदत घेतली असून त्यांच्या अहवालानुसार लवकरच या प्रकरणाची सत्यता समोर येईल असा विश्वासही व्यक्त केला आहे.