जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
शिवसेना ठाकरे गटाकडून संशयाची सुरी गृह खात्याकडे वळवण्यात आल्यानंतर आता अंजली दमानिया यांनीही विनोद तावडे प्रकरणावरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Anjali Damania on Devendra Fadnavis : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारमधील थांबलेल्या हाॅटेलमधील एका खोलीतून निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नऊ लाख रुपये आणि कागदपत्रे जप्त केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी हल्लाबोल केल्यानंतर निवडणूक आयोगाकडून विनोद तावडे आणि नालासोपारा येथील भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केला आहे. उद्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यातील 288 विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. यापूर्वीच नोटकांड झाल्याने महाराष्ट्र भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून संशयाची सुरी गृह खात्याकडे वळवण्यात आल्यानंतर आता अंजली दमानिया यांनीही विनोद तावडे प्रकरणावरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दमानिया यांनी ट्विट करून जे खुर्चीसाठी एकमेकांचा गळा कापायला निघाले ते महाराष्ट्राच्या लोकांचे काय भलं करणार अशी विचारणा केली आहे.
अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार?
दमानिया यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी leak केली असेल तर अतिशय शरमेची बाब आहे. अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? जे खुर्चीसाठी एकमेकांचा गळा कापायला निघाले ते महाराष्ट्राच्या लोकांचे काय भलं करणार, पैसे वाटणे, मतं विकत घेणे आणि आता हे? आणि काय काय पहावे लागणार आहे. किळस येतेय या घाणीची.
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी leak केली असेल तर अतिशय शरमेची बाब आहे
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 19, 2024
अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार?
जे खुर्ची साठी एकमेकांचा गळा कापायला निघाले ते महाराष्ट्राच्या लोकांचे काय भलं करणार
पैसे वाटणे, मतं विकत घेणे आणि आता हे? आणि काय काय पहावे…
तावडेंना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला
दरम्यान, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तावडे हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन पोहोचल्याचा आरोप केला. नालासोपारा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि इतर कार्यकर्तेही त्यांच्यासोबत होते. हॉटेलमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. माहिती मिळताच हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर हेही हॉटेलवर पोहोचले. यावेळी बहुजन आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. क्षितिज ठाकूर हे नालासोपारा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार आहेत.
तावडे म्हणाले, मी कार्यकर्त्यांच्या बैठकीला गेलो होतो
विनोद तावडे म्हणाले की, नालासोपारा विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. निवडणुकीच्या आचारसंहितेबाबत 12 गोष्टी सांगण्यासाठी मी तिथे पोहोचलो होतो. समोरच्या पक्षांना वाटले की मी तिथे पैसे वाटायला आलो आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या आरोपांची चौकशी करावी. मी 40 वर्षांपासून पक्षात आहे. सगळे मला ओळखतात. निवडणूक आयोगाने निःपक्षपातीपणे तपास करावा, अशी माझी इच्छा आहे.
ठाकूर म्हणाले, हॉटेलचा सीसीटीव्ही बंद होता, आम्ही तो चालू केला
हितेंद्र ठाकूर म्हणाले की, विनोद तावडे मतदारांना पैसे वाटण्यासाठी येत असल्याची माहिती मला मिळाली होती. त्यांच्यासारखा राष्ट्रीय नेता एवढं छोटं काम करणार नाही असं मला वाटत होतं. हॉटेलमध्ये जाऊन त्यांना पाहिले असता तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. आमच्या विनंतीनंतर सीसीटीव्ही सुरू करण्यात आले. तावडे मतदारांना पैसे वाटून देत होते.
इतर महत्वाच्या बातम्या